तुटलेल्या प्लॅस्टिकच्या बादल्या किंवा फाटलेले रबर-प्लॅस्टिकचे बूट दुरुस्त करणारे लोक अगदी परवा-परवापर्यंत दिसत होते. रस्त्याकडेला बसून हे लोक प्लास्टिकच्या वस्तूला पडलेल्या भेगांमध्ये गरम प्लॅस्टिक भरून देत असत. अगदीच वाया जाण्याऐवजी ती वस्तू आणखी काही दिवस उपयोगाला येत असे. लोखंडी हत्यारं शेगडीत गरम करून प्लॅस्टिकचे तुकडे तापवले जात असत आणि त्या रसायनाने वस्तूच्या ‘जखमा’ भरल्या जात असत. कल्पना करा, हेच टेक्निक आपल्याला झालेली जखम भरून काढण्यासाठी वापरलं तर..? आपण कुठे पडलो, खरचटलं, जखम झाली, खोक पडली तर डॉक्टर जखमेच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं मलमपट्टी करतात. खोक मोठी असेल तर टाके घालून ती शिवली जाते.
कालांतरानं खोक पडलेल्या जागेच्या दोन्ही बाजूंची त्वचा एकत्र येऊन ती एकजीव होऊन जाते. परंतु अशा प्रकारे जखम भरून यायला काही दिवसांचा अवधी जायला लागतो. त्याऐवजी आता आपल्याला फक्त कृत्रिम त्वचेचा एक तुकडा जखमेच्या जागी चिकटवावा लागेल. अवघ्या चार तासांत जखम भरून येईल आणि 24 तासांत आपण पूर्ववत कामाला लागू. वरवर विचार करता ही गोष्ट अशक्य वाटेल; पण लवकरच हे शक्य होणार आहे. शास्त्रज्ञांनी एक ‘हायड्रोजेल’ तयार केलंय. त्याला आपण कृत्रिम त्वचाही म्हणू शकतो. जखमेवर चिकटपट्टीसारखी ही त्वचा लावली, की ती मूळ त्वचेशी एकजीव होईल.
दोन नामांकित विद्यापीठांच्या संशोधकांनी एकत्र येऊन हे ‘हायड्रोजेल’ तयार केलंय. ते त्वचेशी एकजीव व्हावं, यासाठी त्यांनी केलेले प्रयोग यशस्वी झालेत. मानवी त्वचेमधील जटिल गुणधर्म आत्मसात करण्याइतकं प्रभावी जेल बनवणं सोपं काम निश्चितच नाही. आपली त्वचा अत्यंत लवचिक आणि तितकीच कणखर असते. जेलच्या माध्यमातून नॅनोशिट तयार करणं आणि त्वचेचे गुणधर्म त्यात विकसित करणं ही शास्त्रज्ञांची किमया आगामी काळात जखमांवरील उपचारांची व्याख्याच बदलून टाकू शकते. जखम झाल्यास ती आपोआप बरी करण्याचा नैसर्गिक गुणधर्म त्वचेत असतो. फक्त त्याची नैसर्गिक प्रक्रिया दीर्घकालीन असते. जखम झाल्यावर काही दिवसांनी त्या जागी अतिशय नरम, मुलायम अशी नवी त्वचा दिसू लागते आणि यथावकाश ती आजूबाजूच्या त्वचेशी एकजीव होते. हीच प्रक्रिया गतिमान करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. ‘हायड्रोजेल’चा वापर जखमेवर केल्यानंतर अवघ्या चार तासात जखम नव्वद टक्के बरी होणार असून, 24 तासांत ती नाहिशी होणार आहे. मानवी त्वचेतील जैविक ऊती म्हणजेच टिश्यूज् अत्यंत मजबूत असतात. त्वचा विणणारे हे धागेच असतात, असं म्हणता येईल.
आपल्याला जखम होते तेव्हा त्वचेच्या ऊतींचं नुकसान होतं, म्हणजेच हे धागे विस्कटतात; तुटतात. मलमपट्टी आणि औषधांनी डॉक्टर हे नुकसान भरून काढतात. त्याऐवजी आता हे जेल जखमेवर लावलं, की तयार होणारी कृत्रिम त्वचा थोड्याच वेळात नैसर्गिक त्वचेत बेमालूम मिसळून जाईल. जखमा बर्या करण्याबरोबरच या तंत्रज्ञानाचा उपयोग सॉफ्ट रोबोटिक्समध्ये तसेच प्रोस्थेटिक्समध्येही करता येणार आहे. आगीत होरपळलेले रुग्ण, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण आणि जुनाट जखमा असणार्या रुग्णांनाही ‘हायड्रोजेल’ ही संजीवनी ठरेल. जखमेवरची ही नवी ‘फुंकर’ निश्चितच गेमचेंजर ठरेल. -हिमांशु चौधरी
Check Also
परावलंबित्व नकोच!
‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी,’ अशी आपल्याकडे म्हण आहे. माणसाच्या ऐतखाऊ वृत्तीचं वर्णन या …