लेख-समिक्षण

समाजशीलतेचा ‘चिमुकला’ आदर्श

अनेकदा मोठा सामाजिक बदल घडवण्यासाठी मोठ्या वयाची, मोठ्या पदाची किंवा प्रचंड संसाधनांची गरज असते, असा समज असतो. पण काही वेळा केवळ संवेदनशील मन, निस्वार्थी विचार आणि जिद्द पुरेशी ठरते. पुण्यातील तीन तरुण मुलींनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. ‘प्रोजेट नर्चर’ ही अशा तीन अभ्यासू आणि सेवाभावी किशोरींची एक लहानशी पण प्रभावी स्वयंसेवी संस्था सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
विहा आशिष भट्टाड (संस्थापक), आर्या मेहुल शहा आणि अनैशा प्रतीक गोल्छा (सह-संस्थापक) ‡ या तिघींनी मिळून स्थापन केलेल्या प्रोजेट नर्चरने नुकतीच २१ जुलै ते २७ जुलै या कालावधीत पुण्यात ‘दान मोहीम’ राबवली. या मोहिमेत त्यांना गुडविल इंडिया फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचा उद्देश गरजूंना कपडे, खेळणी, चादरी, शाली, भांडी, घरगुती उपकरणे, पादत्राणे आणि पुस्तके अशा आवश्यक वस्तूंचे संकलन करून त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा होता.
या मोहिमेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे या तीन शाळकरी मुलींचे समर्पण. शालेय जीवनात अभ्यास, धमाल, खेळ यापलीकडे जात या मुलींनी शाळा आणि अभ्यास सांभाळूनही संध्याकाळी एकत्र येऊन लोकांनी दिलेल्या वस्तूंची वर्गवारी करणे, स्वच्छ करणे आणि त्यांना व्यवस्थित पॅक करून वितरणासाठी तयार करणे हे काम अत्यंत शिस्तबद्धपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडले. रोज संध्याकाळी त्यांच्या संकलन केंद्रावर लोकांची गर्दी होत असे आणि त्या प्रत्येकाच्या दानवस्तू अगदी काळजीपूर्वक हाताळत असत.
या उपक्रमाला पुण्यातील नागरिक, गृहनिर्माण सोसायट्या, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी केवळ वस्तू देतानाच या तीन तरुण संस्थापकांचे कौतुकही केले. त्यांच्या समर्पणाने लोकांना भारावून टाकले.
या मोहिमेत जमा झालेल्या वस्तूंची आता गरजेनुसार दुरुस्ती करून त्या गुडविल इंडिया फाउंडेशनच्या नेटवर्कमार्फत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.
या संपूर्ण कार्यामध्ये कुठलाही प्रौढ मार्गदर्शक नसूनही या तीन जणी स्वतःच सर्व कामं नियोजनपूर्वक पार पाडतात.
आजच्या पिढीकडे पाहून अनेकदा ‘उद्याचा भारत कसा असेल’ याची काळजी काहींना वाटते. त्या काळजीला या तीन मुलींनी आपल्या समर्पित सामाजिक कार्यातून सकारात्मक उत्तर दिलं आहे. त्या फक्त मदतीचा हात देत नसून इतरांनाही प्रेरित करत आहेत. अशाच प्रकारचे अनेक उपक्रम भविष्यात राबवण्याचा आणि अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. गरजूंच्या डोळ्यांतला आनंद कुठल्याही परीक्षेच्या गुणांपेक्षा मोठा आहे, हे शाश्वत सत्य या चिमुकल्यांना या वयात उमगलंय, याहून मोठं दुसरं काय?
– प्रसाद चांदेकर

Check Also

नैराश्याने मेंदूचे आकुंचन

निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू. मेंदू व पर्यायाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याकडे गांभीर्याने …