लेख-समिक्षण

संवेदनशील दिग्दर्शकाची जन्मशताब्दी

भारतीय सिनेमाच्या इतिहासात फारच कमी चित्रपट दिग्दर्शकांनी भांडवलशाही व्यवस्थेच्या पोकळपणाला आणि त्यातून जन्माला येणार्‍या अधोगामी मूल्यांना तीव्रतेने, जिव्हाळ्याने आणि कलात्मकतेने दाखवले आहे. या दुर्मिळ आणि संवेदनशील दिग्दर्शकांंमध्ये गुरुदत्त यांचे स्थान अग्रक्रमावर आहे. त्यांनी जे काही केले ते त्या काळात केवळ धाडसीच नव्हे, तर सामाजिक भान जागवणारे कार्य होते. त्या काळात भारत स्वतंत्र झाला होता आणि राष्ट्र उभं करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. समाज आणि सिनेमा या दोन्ही ठिकाणी आशाआकांक्षा, उमेद, आणि नव्या प्रवाहांचा उदय होत होता. या आनंददायी वातावरणातही गुरुदत्त यांनी आपल्या चित्रपटांद्वारे व्यवस्थेतील काळोख्या बाजूंना इतया प्रभावी पद्धतीने मांडले की त्यांचे चित्रपट आजही विचारप्रवृत्त करणारे ठरतात.
‘प्यासा’पासून सामाजिक कथानकांची सुरुवात
गुरुदत्त यांच्या सुरुवातीच्या ‘बाजी’, ‘जाल’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’ या चित्रपटांमध्ये व्यवस्थेवर भाष्य नव्हते. त्या काळात ते प्रेम आणि गुन्हेगारीच्या गुंतागुंतीत अडकलेल्या नायकाच्या वेदना मांडत होते. परंतु व्यवस्थेच्या जाळ्यात अडकलेल्या सामान्य माणसाच्या दु:खावर केंद्रित कथानकांनी रंगवलेले चित्रपट तोवर त्यांच्या कारकिर्दीत आले नव्हते. ही सुरुवात झाली ‘प्यासा’ या त्यांच्या दिग्दर्शित चित्रपटाने. या चित्रपटाच्या कथानकाने आणि त्यासाठी साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या गीतांनी केवळ सत्ताधार्‍यांना कटघर्‍यात उभं केलं नाही, तर व्यवस्थेतील शोकांतिका जिवंत आणि हृदयस्पर्शी रूपात प्रेक्षकांसमोर आणली.
जागरूकतेचे माध्यम बनलेली गाणी
‘प्यासा’ हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर समाजातील वेदनांवर सत्ताधार्‍यांची नजर वळवणारे एक शक्तिशाली माध्यम होता. या चित्रपटाचे कथानक जसे प्रभावी होते तसेच साहिर लुधियानवी यांचे गीतलेखन आत्म्याला हलवणारे होते. ‘जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहां हैं’ या गीताच्या अंतर्‍यातील ‘ज़रा मुल्क के रहबरों को बुलाओ, ये गलियाँ ये कूचे ये मंज़र दिखाओ’ या ओळींनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत अस्वस्थता पोहोचवली होती. त्यांनी या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, मी साहिर आणि गुरुदत्त यांच्या कार्याचा पाठपुरावा करत आहे. त्याच चित्रपटातील आणखी एक गीत ‘ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया, ये इन्सान के दुश्मन समाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो या है’ हे गीत रेड लाईट एरियामधील वास्तव अत्यंत हृदयस्पर्शी स्वरूपात मांडणारे होते. स्वातंत्र्य केवळ नावापुरते आहे, खरी समानता आणि माणुसकी अजून दूर आहे, याची जाणीव करुन देणारे होते. गुरुदत्त यांनी या चित्रपटांमधून ही बाब ठळकपणाने मांडली की, स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावरही खर्‍या अर्थाने समतेचा समाज निर्माण करण्यासाठी अधिक संघर्ष आवश्यक आहे.
पुढे ‘कागज के फूल’ मध्ये हे सामाजिक वास्तव अधिक सखोलतेने प्रकट झाले. या चित्रपटात त्यांनी भारतीय फिल्म इंडस्ट्रीच्या स्वार्थी आणि निर्दयी चेहर्‍याला उघडं पाडलं. गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे लेखक अबरार अल्वी यांनी ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ या दोन्ही चित्रपटांविषयी एका मुलाखतीत अनेक रोचक गोष्टी सांगितल्या होत्या.अल्वी यांच्या मते, त्यांचे मामा गुरुदत्त यांच्याच स्टुडिओत काम करत होते. एके दिवशी त्यांनी अबरार यांना गुरुदत्त यांच्या ऑफिसमध्ये नेले. तिथे गुरुदत्त यांचे सहाय्यक राज खोसला एका चित्रपटासाठी संवाद लिहीत होते. त्यांनी अबरार यांना विचारले की, तुम्ही हे संवाद सुधारू शकता का? त्यावर अबरार यांनी उत्तर दिलं की, कथा आणि पात्रांची पार्श्वभूमी माहित नसताना संवाद कसे दुरुस्त करता येतील? पात्र कोणत्या वर्गातून येतो हे समजलं तरच त्याची भाषा निश्चित करता येईल. ही गोष्ट गुरुदत्त यांनी बारकाईने ऐकली आणि त्याच दिवशी अबरार यांना कथा विभागात सामील करून घेतले.
अबरार अल्वी यांनी सांगितले की ‘बाजी’ आणि ‘जाल’सारख्या चित्रपटांतून पैसा येत होता, पण गुरुदत्त यांना या गुन्हे आणि रोमान्सच्या काल्पनिक कथांतून बाहेर काढायचं होतं. हे काम माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्या काळी गुरुदत्त यांचे फायनान्सर कपूर नावाचे एक गृहस्थ होते, ज्यांना असेच मसालेदार सिनेमा हवे असायचा. त्यांनी मला कथा विभागातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. पण गुरुदत्त यांनी माझी मूल्यं ओळखली होती म्हणून मी तिथेच राहिलो. त्याच सुमारास मुंबईत माझी गुलाबो नावाच्या वेश्येशी ओळख झाली. तिची कहाणी ऐकून मी भारावून गेलो. हीच कहाणी मी गुरुदत्त यांना सांगितली आणि पुढे ‘प्यासा’ चित्रपटात वहीदा रहमान यांनी ही व्यक्तिरेखा जबरदस्त साकारली. तेव्हापासून गुरुदत्त यांचा कल समाजप्रधान कथानकांकडे वळला.
प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनीही एकदा नमूद केले होते की, जर गुरुदत्त यांनी ‘प्यासा’चा शेवट आनंददायी केला नसता तर हा चित्रपट फ्लॉप झाला असता. गुरुदत्त यांनी नंतर शेवट बदलला आणि चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले. त्यानंतर त्यांनी ‘कागज के फूल’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अबरार अल्वी यांच्या मते, गुरुदत्त हे या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीतील खोटेपणाचे वास्तव दाखवू इच्छित होते. पण अबरार यांनी त्यांना अनेक वेळा हा चित्रपट न बनवण्याचा सल्ला दिला.
गुरुदत्त यांनी एकदा विचारले की, तुम्ही मला सतत ‘कागज के फूल’ चित्रपट बनवू नका असं का सांगता? त्यावर अबरार यांनी स्पष्ट सांगितले की, ही कथा उच्च वर्गासाठी आहे, सामान्य माणूस हा चित्रपट पाहायला येणार नाही. चित्रपट आपटेल. आणि अगदी तसंच घडलं. हा चित्रपट बॉस ऑफिसवर आपटला. काही काळासाठी गुरुदत्त निराश झाले, पण त्यांनी पुन्हा स्वतःला सावरत ‘चौदहवीं का चाँद’ आणि ‘साहिब बीवी और गुलाम’सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. गुरुदत्त हे प्रतिभावंत होते. केवळ ३९ वर्षांच्या वयात, १० ऑटोबर १९६४ रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
संगीताची विलक्षण समज
गुरुदत्त यांना संगीताची उत्कृष्ट जाण होती. प्रसिद्ध संगीतकार रवि यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘चौदहवीं का चाँद’ या चित्रपटाचं संगीतदायित्व त्यांनी मला दिलं होतं. गीतकार शकील बदायुनी यांनी गाणी लिहिली. इंडस्ट्रीत चर्चा झाली की, गुरुदत्त गाण्यांना सहज मंजूरी देत नाही. चित्रपटाचं शीर्षकगीत तयारच होत नव्हतं. एक दिवस अचानक माझ्या मनात आलं की, शीर्षकच मुखड्यात घ्यायचं. मी शकील साहेबांना बोलावलं आणि म्हणालो ‘चौदहवीं का चाँद हो’, शकील साहेबांनी पुढे जोडले ‘या आफताब हो, जो भी हो खुदा की कसम लाजवाब हो.’ अशा प्रकारे एक सुंदर गीत तयार झालं. मी ते गाणं आणि धून गुरुदत्त यांना ऐकवली. ते प्रत्येक गाण्याच्या संगीतावर मत देत. त्यांची संगीताची जाण जबरदस्त होती. आजही ‘प्यासा’ चित्रपटातील ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो या है’ हे गीत मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात गुणगुणत राहतं.
गुरुदत्त हे केवळ दिग्दर्शक नव्हते, तर ते संवेदनशील विचारवंत होते. त्यांनी भारतीय सिनेमा समाजाशी जोडला. त्यांनी स्वप्न आणि वास्तव यातील दरी सिनेमाच्या पडद्यावर मांडली. आज जेव्हा आपण त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरं करत आहोत, तेव्हा त्यांच्या सर्जनशीलतेची आठवण ही केवळ स्मरणरंजनासाठी नाही, तर नव्या पिढीला समाजभान असलेल्या सिनेमा निर्माणाची प्रेरणा देण्यासाठी असली पाहिजे. गुरुदत्त आजही आपल्या संवेदनेत जिवंत आहेत ‘अगर मिल भी जाए ये दुनिया, तो या है?’ या प्रश्नासोबत.- सोनम परब

Check Also

‘सैयारा’च्या यशाचे वेगळेपण

प्रकाश मंदावलेला, प्रेक्षकांच्या डोळ्यांत उत्कंठा. स्क्रीनवर पहिली फ्रेम झळकते एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर हलकासा पाऊस, …