अग्निला साक्षी ठेवून घेतलेल्या सात फेर्यांनंतर बनलेले पती-पत्नी हे जीवनसाथी म्हणवले जातात. पण त्यांच्यातील नातेसंबंधांना असंख्य पदर असतात. ते बहुतांश वेळा उंबरठ्याआडच असतात. त्यांचा बोभाटा केला जात नाही. पण सिनेदिग्दर्शक-कथाकारांनी या हळूवार नात्यातील कंगोरे चित्रपटांच्या माध्यमातून विविध रुपांत मांडले आणि पाहता पाहता याच कथानकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती लाभली. कधी पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज झाले, कधी त्यांच्या नात्यात तिसर्या व्यक्तीच्या अस्तित्वामुळे कथानक गुंफले गेले, तर कधी या नाजूक नात्यात कुटुंबीयांच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण झाले, तर कधी अपत्यांवरुन भांडण झाले; पण जवळपास पती-पत्नीतील नात्यांचे सर्व रंग रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आले.- सोनम परब
सिनेमाच्या प्रेक्षकांनी सर्वाधिक कोणत्या विषयांवर आधारित चित्रपटांना पसंती दिली असे विचारले गेले, तर दोनच विषय असे आहेत, ज्यावर कोणीही असहमत होणार नाही. एक म्हणजे प्रेम आणि दुसरे म्हणजे पती-पत्नी यांचे संबंध. हे दोन्ही विषय मानवी जीवनाशी निगडीत असून, त्यांच्या कथानकांमध्ये वैविध्य उदंड आहे. यामध्येही सर्वाधिक जिवंतपणा पती-पत्नींमधील संबंधांवर आधारित कथांमध्ये आढळतो. कारण या नात्यात अनेक रंग असतात. या नात्याचे कथानक अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या प्रकारे साकारले गेले. कधी पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज झाले, कधी त्यांच्या नात्यात तिसर्या व्यक्तीच्या अस्तित्वामुळे कथानक गुंफले गेले, तर कधी या नाजूक नात्यात कुटुंबीयांच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण झाले, तर कधी अपत्यांवरुन भांडण झाले; पण जवळपास पती-पत्नीतील नात्यांचे सर्व रंग रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आले.
या विषयावर इतके चित्रपट बनले की त्यांची गणती करणे शय नाही. कारण हे नाते प्रत्येक कथानकात कोणत्या ना कोणत्या रुपाचे नक्कीच असते. म्हणूनच हा विषय कधीच जुना झाला नाही. प्रत्येक काळात या विषयावर काही ना काही असे चित्रपट नक्कीच आले, जे संस्मरणीय ठरले. यामध्ये सर्वात प्रभावशाली चित्रपट म्हणून १९८२ मध्ये आलेल्या महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’ या चित्रपटाला मानले जाते. या चित्रपटात शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील आणि राज किरण प्रमुख भूमिकेत होते. गुलजार यांच्या ‘आंधी’ या चित्रपटाची कथा देखील पती-पत्नीच्या नात्याशी निगडीत होती. या चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमीसह आणि पती-पत्नीच्या नात्यावरील ओळखले जाणारे चित्रपट मानले जाते. त्यानंतर १९८० ते २००० या दोन दशकांमध्ये ‘पहेली’, ‘चलते-चलते’ आणि ‘साथिया’ यांसारखे अनेक चित्रपट आले, जे स्त्री-पुरुष संबंधांच्या जुन्या विषयावर आधारित आधुनिक चित्रपट होते. याच विषयावर काही प्रयोगशील चित्रपट देखील तयार करण्यात आले. यामध्ये ‘तनु वेड्स मनु’, ‘रब ने बना दी जोडी’, ‘नमस्ते लंडन’, ‘शादी के साइड इफेट्स’, ‘चलते-चलते’, ‘दम लगा के हईशा’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘गहराइयां’ आणि ‘सिलसिला’ यांचा समावेश करता येईल. यामध्ये ‘तनु वेड्स मनु’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता.
रोमँटिक हिरो शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा ‘रब ने बना दी जोडी’ हा चित्रपट पती-पत्नीच्या नात्याची एक वेगळी गोष्ट सांगून गेला. पती-पत्नी दोघे एकमेकांसाठी कसे बनलेले असतात, यावर हा सिनेमा भाष्य करुन गेला. एक भारतीय मुलगा आणि लंडनच्या मुलीच्या प्रेमकथेवर आधारित ‘नमस्ते लंडन’ हा देखील तसाच चित्रपट होता. अशा चित्रपटांच्या दरम्यान ‘शादी के साईड इफेट्स’ हा एक नवा प्रयोग होता. हा चित्रपट अशा पती-पत्नीच्या कथानकावर आधारित आहे, जे आपल्या लग्नाच्या गुंतागुंतीतच अडकलेले असतात. अशा विषयात ‘दम लगा के हईशा’ चे कथानक अगदी नवे होते, जे जाड्या बायको आणि दुबळ्या नवर्याच्या गोष्टीवर आधारित आहे. त्यांच्यात खूप भांडणं होतात, पण शेवटी ते एकत्र येतात. या विषयावर यश चोप्रा यांनी ‘सिलसिला’ तयार केला होता. हा चित्रपट अमिताभ बच्चन, रेखा आणि जया भादुरी या त्रिकोणाशी जोडला गेला. या चित्रपटात नात्यातील शंकेला स्थान होते. ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात माया (राणी मुखर्जी) आणि देव (शाहरुख खान) आपापल्या वैवाहिक आयुष्याला कंटाळलेले असतात. त्यातून त्यांचे मनोमिलन होते आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात.
पती-पत्नीचे नाते पवित्र आणि प्रेमाने भरलेले असते. पण अनेकदा हे नाते गैरसमज आणि विश्वासाच्या अभावामुळे कमकुवत होते. भांडणे वाढतात आणि गोष्ट थेट घटस्फोटापर्यंत पोहोचते. दिग्दर्शकांनी हे त्यांच्या-त्यांच्या पद्धतीने मांडले. ‘तलाक’ (१९५८) हा पती-पत्नीमधील गैरसमजावर आधारित पहिला चित्रपट होता. हा महेश कौल दिग्दर्शित आणि राजेंद्र कुमारचा पहिला चित्रपट होता. यामध्ये कामिनी कदम मुख्य भूमिकेत होत्या. याच शीर्षकावर आधारित अनेक चित्रपट तयार झाले, जसे ‘तलाक तलाक तलाक!’ बी. आर. चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांनी ‘निकाह’ आणि ‘पति पत्नी और वो’ यांसारखे चित्रपट तयार केले. परंतु त्यांनी काही चित्रपटांच्या कथानकात विनोदी स्पर्श देखील ठेवला. अशा नात्यांमधील तणाव दर्शविणार्या चित्रपटांमध्ये ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘अभिमान’ देखील आहे.
अजीज मिर्झा दिग्दर्शित ‘चलते-चलते’ (२००३) मध्ये शाहरुख खान आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट प्रियकर-प्रेयसी ते पती-पत्नी बनण्यापासून त्यांच्यात निर्माण होणार्या गैरसमजामुळे उद्भवलेल्या वादावर आधारित आहे. सन २००५ मध्ये आलेला ‘मैं, मेरी पत्नी और वो’ हा चित्रपट लग्नाआधी रंग-रूप आणि उंची याबाबत समाजामध्ये पसरलेल्या चुकीच्या समजुतींवर आधारित आहे. या चित्रपटात मध्यमवर्गीय भारतीयांची मानसिकता सुरेखपणे दाखवण्यात आली आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ (२०१५) या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात आर. माधवन आणि कंगना रनौत होते. हा चित्रपट लग्नानंतरच्या चार वर्षांमधील तनु आणि मनु यांच्या नात्यावर आधारित आहे. दोघांमध्ये प्रत्येक गोष्टीवर वाद होतो, दोघे घटस्फोट घेतात. त्यानंतर मनु, तनुच्या हुबेहूब कुसुमच्या प्रेमात पडतो आणि कथा नव्या वळणावर जाते. दक्षिणेत तयार झालेल्या काही हिंदी चित्रपटांमध्ये ‘जुदाई’ आणि ‘एक ही भूल’ देखील अशाच विषयावर आधारित होते.
वैवाहिक नात्याचा सर्वात कमजोर भाग म्हणजे फसवणूक किंवा प्रतारणा. यामागे अनेक कारणे लपलेली असतात. हिंदी सिनेसृष्टीत विवाहबाह्य संबंधावर आधारित अनेक चित्रपट तयार झाले आहेत. सलमान खान, करिश्मा कपूर आणि सुष्मिता सेन यांचा ‘बीवी नंबर १’ या चित्रपटातही विवाहबाह्य संबंधाचे वळण होते, तसेच ड्रामा सोबत कॉमेडी देखील होती. अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रूज यांचा ‘रुस्तम’ हा चित्रपट प्रेमातील फसवणुकीच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा एका नेव्ही ऑफिसरभोवती फिरते. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्या कारवा यांचा ‘गहराइयां’ हा चित्रपट प्रेम नव्हे तर फसवणूक आणि विवाहबाह्य संबंधावर आधारित आहे.
अनन्या पांडे, भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यन यांचा ‘पति, पत्नी और वो’ या चित्रपटाची कथा देखील प्रेमातील फसवणूक आणि धोक्यावर आधारित आहे. जेव्हा पत्नी आणि गर्लफ्रेंडला नवर्याच्या फसवणुकीचा पत्ता लागतो तेव्हा कथेमध्ये वळण येते . अशाच विषयावर तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी यांचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट प्रेक्षकांनी पसंत केला. हा चित्रपट प्रेम, फसवणूक आणि गुंतागुंतीच्या नात्यांना नवे रूप देऊन दाखवतो. राणी मुखर्जीचा पदार्पणाचा चित्रपट ‘राजा की आएगी बारात’ (१९९७) याची कथाही फसवणुकीचा मुद्दा ठळकपणाने मांडणारी होती. यातील मुलीने त्याला थप्पड मारली होती यासाठी तिच्यावर यातील खलनायक बलात्कार करतो. नंतर कोर्ट त्याचा निर्णय घेतो की त्या मुलाने पीडितेसोबत लग्न करावे. सन २००१ मध्ये आलेल्या ‘दामन’ या चित्रपटाची कथा वैवाहिक बलात्कार या पैलूंवर आधारित आहे.
घरगुती हिंसाचारावर आधारित चित्रपटांमध्ये ‘प्रोवोड’ (२००६) हा चित्रपट उत्कृष्ट मानला जातो. ऐश्वर्या राय, नवीन अँड्र्यूज, मिरांडा रिचर्डसन, नंदिता दास यांच्या या चित्रपटाची कथा करनजीत अहलुवालिया यांच्या प्रत्यक्ष जीवनावर आधारित आहे, ज्यांनी पतीकडून १० वर्षेहोणार्या अत्याचारांना कंटाळून त्याचा खून केला. अशा चित्रपटांमध्ये अनुभव सिन्हा यांचा ‘थप्पड’ (२०२०) देखील आहे, ज्यामध्ये तापसी पन्नूच्या अभिनयाचे कौतुक झाले. या चित्रपटात पुरुष आणि स्त्री यांच्यात खरेच समानतेचे नाते आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.