लेख-समिक्षण

वृक्षारोपणाचा नको दिखावा

वृक्षारोपण हा आता उत्साही कार्यक्रम झाला आहे. ज्या उत्साहात वृक्षारोपण केले जाते तेवढे त्या रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. मग पुन्हा पुढच्या वर्षी उत्साहात वृक्षारोपण केले जाते. मानव इतर सजीवांपेक्षा बुध्दिमान असला तरी तोसुध्दा पर्यावरणाचाच एक घटक आहे. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ आहे. मानवाकडेच त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करणे व त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याचे जतन, संवर्धन करावे. वृक्षारोपण मोहिमेत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सहभाग वाढायला पाहिजे. ‘निसर्ग’ हा मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी, वनसंपत्ती यांना लाभलेले मोठे वरदान आहे. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणे होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुळे वसुंधरेचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे. पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेचा बचाव करण्यासाठी जागतिक पातळीसह देशस्तरावर पर्यावरणवादी चळवळीची व्याप्ती वाढीस लागणे गरजेचे आहे. बदलती जीवनशैली, वाढणारे शहरीकरण व त्यातून होणारी प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद वापर, बांधकामांसाठी टेकड्या – पर्वतांचे खोदकाम, नद्या-खाड्यांमधून होणारे रेती उत्खनन, जलवायू प्रदूषण, अणुचाचण्या, वाढत्या वाहनांमुळे होणारे वायू, ध्वनी प्रदूषण या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाचे बेसुमार नुकसान होत आहे. राज्य शासन, शिक्षण संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व अन्य विविध संस्था मोठा गाजावाजा करत दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबवितात. कागदोपत्री अहवालही रंगवले जातात. प्रत्यक्षात मात्र काही कालावधीनंतर ते वृक्ष जागेवर दिसतच नाहीत अथवा त्या वृक्षाची दुरवस्थाच झाल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. वृक्षारोपण मोहीम ही केवळ दिखावा करण्यासाठी राबविण्याची मानसिकता आता बदलण्याची नितांत गरज आहे. वृक्षारोपण मोहिमेत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तन, मन, धनाने भाग घ्यावा. ’एक मूल, एक झाड’ लावून त्याची निगा राखण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कडक कायदे करून जंगलामधील वृक्षतोड कुठल्याही परिस्थितीत रोखली पाहिजे. जंगलांच्या संवर्धनासाठी वन्यप्राण्यांचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करून ’वसुंधरा बचाव’ ही आता लोकचळवळ उभी राहिली आहे.- विशाखा पाध्ये

Check Also

‘ट्रुथ सोशल’ च्या अंतरंगात….

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात वारंवार चर्चेत येणारे एक खास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे …