श्री मल्लेशम् यांचा जन्म आंध्रप्रदेशातील एका गरिब विणकर कुटुंबात झाला. त्यांना इयत्ता सहावी नंतर शिक्षण सोडावे लागले आणि मोठ्यांसोबत हातमाग विणकामाच्या कामात मदत करायला सुरुवात केली. मात्र शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी खाजगीरित्या ७ वी उत्तीर्ण केली आणि १० वी सुद्धा प्रयत्नपूर्वक तिसर्या प्रयत्नात पूर्ण केली.
पोचंपल्ली रेशीम साडी विणकामाच्या परंपरेमध्ये ‘आसू’ ही एक अनिवार्य आणि अत्यंत श्रमसाध्य प्रक्रिया असते. या प्रक्रियेत साडीवर डिझाईन तयार करण्यासाठी रेशीम धागा विशिष्ट पद्धतीने मांडला जातो, नंतर टाय-डायसाठी वापरला जातो. या प्रक्रियेस महिलांना सुमारे ५ तास लागतात आणि दिवसभरात केवळ दोन साड्यांसाठीच हे काम पूर्ण करता येते. या प्रक्रियेत महिलांना खांद्यावर ९००० वेळा धागा गुंडाळावा लागतो, त्यामुळे त्या सतत वेदनेत असायच्या. मल्लेशम् यांना आपल्या आईच्या या वेदनेची जाणीव होती आणि यामुळे साडी उत्पादनाचा वेग कमी होतो, याची खंत होती. त्यांनी ठरवलं की या ’आसू’ प्रक्रियेला यांत्रिक स्वरूप द्यायचं. त्यासाठी त्यांनी तीन वर्षे अथक परिश्रम घेतले. यात त्यांना नातेवाईक, मित्र आणि घरच्यांकडून उपहास सहन करावा लागला.
त्यांनी हैदराबादमध्ये रोजंदारीवर काम करून पैसे जमवले आणि आपल्या संकल्पनेवर काम करत राहिले. शेवटी त्यांनी ‘लक्ष्मी आसू मशीन’ तयार केलं. या मशीनमुळे एक दिवसात पाच साड्यांचे नमुने बनवता येतात आणि त्यासाठी सतत उपस्थिती आवश्यक नसते. यामुळे महिलांची दिवसभराची शारीरिक मेहनत वाचते आणि त्या कुटुंबासाठी दुसरी काही कमाई करू शकतात किंवा घराकडे लक्ष देऊ शकतात. मल्लेशम् यांनी या मशीनमध्ये इलेट्रॉनिक सुधारणा केल्या तरीही याचा दर गेली पाच वर्षे बदललेला नाही.
वेदनेची जाणीव झाली की त्यातून मुक्तिचा मार्ग समोर येत असतो ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
ऋणातून उतराई…
ही हृदयस्पर्शी घटना जरी १८७४ मधली असली, तरी तिचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने १९३० मध्ये …