ऑनलाईन शॉपिंग आजच्या काळात आपल्या दैनंदिन सवयीचा भाग बनली आहे. आता लोक केवळ फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर थेट सोशल मीडियाच्या जाहिरातींवरूनही खरेदी करत आहेत. पण जसे हे सगळे सोपे आणि आकर्षक वाटते, तसेच ते धोका निर्माण करणारेही असते. अनेक बनावट वेबसाईटस् अगदी खर्यासारख्या दिसतात. आकर्षक डिझाईन, कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय आणि मोठ्या सूट अशा गोष्टींचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करतात. पण एकदा का तुम्ही ऑर्डर दिली तर फारतर निकृष्ट दर्जाचा माल घरी येतो किंवा काही वेळा वस्तू येतच नाही. अशाच चार बनावट वेबसाईट्सबद्दल येथे माहिती दिली आहे, ज्या टाळणेच शहाणपणाचे आहे.
थोडयात काय लक्षात ठेवावे?
ऑनलाईन शॉपिंग करताना अधिकृत वेबसाईट तपासा, डोमेन नाव वाचा आणि फार मोठ्या सूटच्या आमिषाला बळी पडू नका. कॅश ऑन डिलिव्हरी असली तरी काळजी घ्या. योग्य माहिती घेतल्याशिवाय कोणतीही खरेदी करू नका, अन्यथा फसवणूक होण्याचा धोका वाढतो.
इन्स्टाग्रामवर जस्ट कॉटन या नावाने जाहिराती पाहिल्या असतील, जिथे ते फक्त ९९९ रुपयांत ङ्गप्रिमियम एथनिकवेअर’ देण्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात ऑर्डर दिल्यानंतर जुने पडदे, साधा पायजमे किंवा वापरलेले कपडे येतात. ना परतावा, ना रिफंड आणि ना कोणतेही कस्टमर सपोर्ट. हे लोक कॅश ऑन डिलिव्हरीचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करतात, पण एकदा वस्तू डिलिव्हर झाली की मग तुमच्या तक्रारींना कुणीही उत्तर देत नाही.
फॅब इंडिया डॉट क्लब (नाव खरे, वेबसाईट बनावट)
ही वेबसाईट खर्या फॅबइंडिया या ब्रँडची हुबेहुब नक्कल आहे. डिझाईन, फॉन्ट आणि लेआऊट अगदी मूळ वेबसाईटसारखे भासते. पण फॅब इंडिया डॉट क्लब हे डोमेन नाव पाहताच संशय घ्यायला हवा. या वेबसाईटवर दिलेली ऑर्डर कधी पोहोचत नाही किंवा आलीच तर नकली, खराब झालेला माल मिळतो. अशा वेबसाईट्स मूळ ब्रँडच्या नावाचा गैरवापर करून लोकांना फसवतात. म्हणून खरेदी करताना वेबसाईटचे अधिकृत डोमेन बारकाईने तपासा.
परफेक्टएक्स डॉट इन आणि विडगेटशंट डॉट कॉम
या वेबसाईट्स पॉवर बँक, हेडफोन, चार्जर यांसारख्या इलेट्रॉनिक वस्तूंवर भलामोठे डिस्काउंट दाखवतात. पण एकदा का तुम्ही पैसे भरले, की ना ऑर्डर येते, ना ट्रॅकिंग अपडेट मिळते आणि ना कोणत्याही ग्राहक सेवा केंद्राकडून उत्तर. या वेबसाईट्स सतत नाव आणि डोमेन बदलत राहतात, त्यामुळे त्यांना पकडणे कठीण होते. म्हणूनच एखादी ऑफर खूपच स्वस्त वाटत असली तरी आधी त्या संकेतस्थळाविषयीची माहिती, लोकांचे रिव्ह्यूज वाचा.
बनावट स्नीकर स्टोअर्स
जर गुगलवर एखादी जाहिरात ८० टक्के सूटवर ब्रँडेड बूट विक्री दाखवत असेल, तर सावध व्हा. या वेबसाईट्स नकली किंवा वापरलेले जुने बूट पाठवतात किंवा कधी कधी काहीच पाठवत नाहीत. विशेष म्हणजे अशा साईट्सवर रिटर्न पॉलिसी नसते आणि दिलेल्या कॉन्टॅट डिटेल्स पूर्णपणे फसव्या असतात. फक्त स्वस्त वाटते म्हणून अशा जाळ्यात अडकू नका.
Check Also
परफेक्ट आयलिड मेकअपसाठी
डोळे हा चेहर्याचे सौंदर्य खुलवणारा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. मेकअप करतानाही डोळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अपेक्षित …