लेख-समिक्षण

‘पिरियड शेमिंग’ चा डाग

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या राज्यातील ठाणे जिल्ह्यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींशी करण्यात आलेली वर्तणूक ही अमानवी आणि घृणास्पद आहे. मासिक पाळीविषयीची लाज ही मासिक पाळीला एक अनावश्यक शारीरिक घटना मानण्याच्या सामाजिक धारणेचा परिणाम आहे. वास्तविक पाहता तो शरीरधर्म आहे. असे असूनही मासिक पाळीकडे नकारात्मक प्रक्रिया म्हणून पाहिले जाणे, ही घृणास्पद आणि वीट आणणारी मानसिकता आहे.
अलीकडेच महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुयातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून चिंताजनक बातमी समोर आली. या शाळेच्या बाथरूमच्या भिंतींवर आणि मजल्यावर लागलेले रक्ताचे डाग प्रोजेटरवर दाखवण्यात आले आणि विद्यार्थिनींना विचारण्यात आले की त्यांना मासिक पाळी सुरू झाली आहे का ? भिंतींवर रक्त कसे लागले? त्यानंतर काही शिक्षिकांना मासिक पाळी सुरू असलेल्या मुलींच्या हातांचे ठसे घेण्यास सांगण्यात आले आणि ज्या मुलींना मासिक पाळी सुरू नव्हती त्यांना महिला कर्मचार्‍यांनी बाथरूममध्ये नेऊन तपासणीसाठी त्यांचे कपडे उतरवण्यास सांगितले. ही घटना अमानवीय नाही का? या विद्यार्थिनी आयुष्यभर ही वेदना आणि अपमान विसरू शकतील का? अखेर मासिक पाळीविषयी अशा प्रकारची लाजिरवाणी वर्तणूक का केली जाते? ही समस्या फक्त भारतापुरतीच आहे का, की जगभरातील मुली मासिक पाळीशी संबंधित असलेल्या जुन्या विचारसरणीमुळे मानसिक त्रास सहन करत आहेत?
मासिक पाळीविषयीची लाज ही मासिक पाळीला एक अनावश्यक शारीरिक घटना मानण्याच्या सामाजिक धारणेचा परिणाम आहे. वास्तविक पाहता तो शरीरधर्म आहे. असे असूनही मासिक पाळीकडे नकारात्मक प्रक्रिया म्हणून पाहिले जाणे, ही घृणास्पद आणि वीट आणणारी मानसिकता आहे. इ.स. ७० च्या सुमारास रोमन विचारवंत प्लिनी द एल्डर यांनी म्हटले होते की, मासिक पाळी ‘सर्वात विचित्र परिणामांची उत्पादक’ आहे. त्यांनी लिहिले होते की, जर मासिक पाळी असलेल्या महिलेने पिकांना स्पर्श केला तर ती कोमेजतील आणि नष्ट होतील, मधमाशा आपले पोळे सोडून जातील.’ हा अवैज्ञानिक दावा समाजात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात स्वीकारला गेला आणि शतके उलटल्यानंतरही ही विचारसरणी वेगवेगळ्या रूपात टिकून आहे.
२० व्या आणि २१ व्या शतकात मासिक पाळीवर झालेल्या चर्चांनी या मुद्द्यावरील लाजरेपणा आणखी दृढ केला आहे. परिणामी, आज असंख्य महिलांना मासिक पाळी आल्यास संकोच वाटतो. परिणामी, त्या ही बाब जास्तीत जास्त लपवता कशी येईल याकडे लक्ष देतात. १९५० मध्ये एका महिलाविषयक मासिकाने एका कंपनीच्या नव्या पॅक केलेल्या सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात लिहिले होते की— ‘इतया कुशलतेने आकार दिला आहे की हे नॅपकिन बॉससारखे दिसत नाहीत. त्यामुळे अतिबारकाईने पाहणार्‍यांनाही आत काय आहे हे कळणार नाही.’ ही जाहिरात समाजातील ‘मासिक पाळी लपवली पाहिजे’ या मानसिकतेची संदेशवाहक होती.
जगातील कदाचित फार कमी देश असे असतील, जिथे मासिक पाळीवर सहज आणि सामान्य संवाद होतो. वर्षानुवर्षापासून आपल्याकडे मुलींना मासिक पाळीबाबत गप्प राहण्याची शिकवण दिली जाते. यामुळे मासिक पाळीबद्दल बोलणे सामाजिक दृष्ट्या अस्वीकारार्ह ठरत गेले. याबाबत करण्यात आलेल्या अनेक पाहण्यांमधूनही असे दिसून आले आहे की, बहुतांश लोक मासिक पाळीबाबत बोलताना सहजतेने वागत नाहीत. पीरियड शेमिंग (मासिक पाळीबद्दल लाज आणणे) ही एक अपमानजनक वृत्ती म्हणून कायम आहे.हे दुर्दैवी नाही का? आरोग्यदायी प्रजनन प्रणालीसाठी महिलांना संकोच वाटणे, टीका सहन करावी लागणे हे कोणत्या प्रगतीशीलतेचे लक्षण आहे?
मासिक पाळी आणि त्यासंबंधी चर्चा याविषयी बोलताना सामाजिक दुटप्पीपणा स्पष्ट दिसतो. आपण महिलांच्या प्रजनन क्षमतेला फार महत्त्व देतो; पण त्याच वेळी आपण गंभीर प्रजनन आरोग्याच्या समस्यांबाबत बोलणे टाळतो. ऑस्ट्रेलियामध्ये २०१९ मध्ये प्राईम टाईम टीव्हीवर एका कंपनीची जाहिरात प्रसारित झाली. त्यात सॅनिटरी पॅडमध्ये रक्त दाखवण्यात आले होते. यामुळे लोकांमध्ये संताप पसरला. जाहिरात मानक मंडळाला ५०० पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात असा दावा करण्यात आला की ही जाहिरात आक्षेपार्ह, अश्लील आणि ‘कुटुंबासह पाहण्यास अयोग्य’ होती. या तक्रारींवरुन असे दिसून येते की, मासिक पाळी हा केवळ भारतात किंवा विकसनशील देशांमध्येच नव्हे तर जगभरात – अगदी प्रगत देशांमध्येही- एक वर्जित विषय आहे.
‘जर्नल ऑफ रिप्रॉडटिव्ह अँड इन्फंट सायकोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गर्ल्स एसपीरियन्सेस ऑफ मीनार्क अँड मेन्स्ट्रुएशन’ या संशोधनाने ब्रिटनमधील किशोरवयीन मुलींचा अभ्यास केला. उत्तरदात्यांनी मोठ्या प्रमाणावर नकारात्मक विचार मांडले आणि त्यांच्या वर्णनांमध्ये मासिक पाळीला लाजिरवाणी आणि अशी गोष्ट म्हणून सादर केले गेले. तसेच त्याबद्दल सार्वजनिक किंवा खाजगीरित्या चर्चा करू नये, असे म्हटले.
‘ऑन फीमेल बॉडी एसपीरियन्स : थ्रोईंग लाईक अ गर्ल अँड अदर एसेज’ या पुस्तकाच्या लेखिका आयरिस मॅरियन यंग यांनी या गोपनीयतेच्या सांस्कृतिक आदेशाला ‘मेनस्ट्रुअल लोसेट’ असे संबोधले आहे. यंग लिहितात ‘मासिक पाळीबाबतच्या आपल्या सुरुवातीच्या जागरूकतेपासून ते आपण रजोनिवृत्ती होईपर्यंत, आपण आपल्या मासिक पाळीच्या प्रक्रियांना लपवण्याच्या गरजेबद्दल सतत सजग असतो.’
यंग यांचा कटाक्ष हा मासिक पाळीबाबतच्या संकुचित विचारसरणीवर आणि तिच्याभोवती निर्माण झालेल्या वर्जना व निर्बंधांवर आहे. सांचेज एरिका यांनी त्यांच्या ‘ओपिनियन : मेन्स्ट्रुएशन स्टिग्मा इज अ फॉर्म ऑफ मिसोजिनी’ या संशोधनात स्पष्ट केले की, मासिक पाळीशी संबंधित कलंकाचा महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक स्थानावर नकारात्मक परिणाम होतो. त्यांनी युक्तिवाद केला की जोपर्यंत आपण ही धारणा सोडत नाही की मासिक पाळी लाजिरवाणी आहे, तोपर्यंत आपण महिलांविरुद्धचे घृणास्पद वर्तन संपवू शकणार नाही.-डॉ. ऋतू सारस्वत,महिला प्रश्नांच्या अभ्यासक

Check Also

भारत झुकेगा नही…

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळात भारत व अमेरिकेतील व्यापार आणि गाढ मैत्री ज्या …