लेख-समिक्षण

दक्षिणेत भाजपा अडचणीत?

भाजपमध्ये सध्या अध्यक्षपदावरून प्रचंड हालचाल सुरू आहे. मात्र यासोबतच पक्ष ‘मिशन साऊथ’ म्हणजेच दक्षिण भारतातील विस्ताराबाबतही दीर्घकाळापासून गंभीर आहे. काही महिन्यांतील राजकीय घडामोडी पाहता तज्ज्ञांच्या मते भाजपचं हे स्वप्न हळूहळू धोयात सापडतंय. याला कारणीभूत असलेल्या घटनांची सुरुवात कर्नाटकमधून सत्ता गमावण्यापासून झाली आणि त्यानंतर तेलंगणामध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने प्रश्न उपस्थित झाले. विशेष चिंता यासाठी आहे की २०२६ च्या सुरुवातीला ज्या पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत, त्यापैकी तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी ही तीन राज्यं दक्षिण भारतातील आहेत.
तामिळनाडू व पुडुचेरीमध्ये भाजपला युतीच्या माध्यमातून काही शयता आहेत, पण केरळमध्ये पक्षाचं खाता उघडणं हेच मोठं आव्हान आहे. भाजपची सध्याची सर्वात मोठी चिंता कर्नाटक आणि आंध्र प्रदेशबाबत आहे. कर्नाटकमध्ये पक्ष अनेक वेळा सत्तेत होता आणि आंध्र विभाजनानंतर तयार झालेल्या तेलंगणामध्येही भाजपने वेगाने विस्तार केला. मात्र आता या दोन्ही राज्यांमध्ये पक्षसंघटनेत गंभीर नाराजी पसरलेली आहे.
कर्नाटकमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि त्यांच्या विरोधकांमध्ये थेट संघर्ष सुरू आहे. तेलंगणामध्ये नवीन अध्यक्षाच्या नियुक्तीनंतर असमाधान व्यक्त करत एका आमदाराने थेट पक्षच सोडून दिला. एकेकाळी भाजपचं सर्वात मजबूत बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ता काढून घेतली. तेलंगणामध्येही विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे अपयश आले.
आंध्र प्रदेशमध्ये भाजपला तेलुगुदेशम पार्टीसोबतच्या युतीमुळे काही फायदा झाला, पण पक्षाची स्वतंत्र ताकद अत्यंत मर्यादित राहिली. तामिळनाडूत युतीच्या साहाय्याने भाजपचं मतदान टक्केवारीत थोडं वाढलं असलं तरी स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात अपयश आलं आहे. केरळमधील परिस्थिती अधिकच कठीण आहे. तिथं प्रत्येक निवडणुकीत भाजप फक्त खाता उघडण्याच्या प्रयत्नांपर्यंत मर्यादित राहतो. या राज्यांमध्ये भाजपला वैचारिक पातळीवर स्वीकारार्हता मिळवणं अजूनही फार मोठं आव्हान आहे.
लोकसभा निवडणुकीचे आकडे देखील याच वास्तवाचं प्रतिबिंब आहेत. संपूर्ण दक्षिण भारतात १४१ लोकसभा जागांपैकी भाजप फक्त २९ जागांवरच मर्यादित राहिला. यामध्ये कर्नाटकमधून १७, तेलंगणामधून ८, आंध्र प्रदेशमधून युतीच्या आधारावर ३ आणि केवळ केरळमधून अभिनेते सुरेश गोपी यांच्या लोकप्रियतेमुळे मिळालेली १ जागा होती.
हे सर्व आकडे ‘मिशन साऊथ’साठी एक कठोर रिअ‍ॅलिटी चेक आहेत. पक्षाने काही प्रमाणात विस्तार केला असला तरी अंतर्गत कलह आणि स्थानिक नेतृत्वामधील संघर्ष भाजपसाठी मोठी अडचण बनले आहेत. राजकीय तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे की भाजपला २०२६ आणि २०२९ च्या निवडणुकांमध्ये दक्षिण भारतातून निर्णायक यश हवं असेल तर सर्वप्रथम त्यांना आपल्या दक्षिण भारतातील संघटनेमध्ये एकजूट निर्माण करावी लागेल. स्थानिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि अंतर्गत भांडणं थांबवावी लागतील. अन्यथा उत्तर भारतात जसं यश मिळालं तसं दक्षिण भारतात मिळवणं अजून खूप दूरचं स्वप्न राहील. – के. श्रीनिवासन

Check Also

‘ट्रुथ सोशल’ च्या अंतरंगात….

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात वारंवार चर्चेत येणारे एक खास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे …