अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात वारंवार चर्चेत येणारे एक खास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे ट्रुथ सोशल होय. ट्विटर, थ्रेड्स आणि फेसबुक यांसारखेच हेही एक सोशल मीडिया व्यासपीठ आहे, जिथे वापरकर्तेआपले विचार, पोस्ट किंवा प्रतिक्रिया शेअर करू शकतात. ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा किंवा निर्णयांचा उल्लेख होताच या प्लॅटफॉर्मचे नाव पुढे येते, कारण ट्रम्प प्रामुख्याने याच माध्यमातून संवाद साधतात. त्यांच्या या पोस्ट्सचे स्क्रीनशॉट नंतर इतर सोशल मीडिया माध्यमांवर, विशेषतः एसवर, मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
ट्रम्प यांनी हा प्लॅटफॉर्म आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळाच्या शेवटी सुरू केला. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी ट्रुथ सोशलचे अधिकृत उद्घाटन केले, कारण त्यांना त्या काळात फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही लोकप्रिय माध्यमांवरून बॅन करण्यात आले होते. हे प्लॅटफॉर्म ट्रम्प मीडिया अँड टेनॉलॉजी ग्रुप या त्यांच्या कंपनीमार्फत चालवले जाते. या कंपनीत डोनाल्ड ट्रम्प यांची थेट हिस्सेदारी सुमारे अठ्ठावन्न टक्क्यांच्या जवळपास आहे. ट्रुथ सोशलचे स्वरूप मायक्रोब्लॉगिंग प्रकारचे आहे, म्हणजे इथे लहानमोठ्या पोस्ट्स, प्रतिक्रिया, पुनर्प्रसारणे सहज करता येतात. इथे पोस्टला ट्रुथ, पुनर्प्रसारणाला रिट्रुथ आणि जाहिरातींना स्पॉन्सर्ड ट्रुथ असे नाव देण्यात आले आहे.
ट्रम्प हेच व्यासपीठ का वापरतात, यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. सर्वात पहिले म्हणजे त्यांना इथे पूर्ण स्वातंत्र्य मिळते. इतर सोशल मीडिया माध्यमांप्रमाणे येथे कोणत्याही प्रकारची काटेकोर तथ्य तपासणी किंवा नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांचे प्रत्येक विधान थेट त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचते. हा प्लॅटफॉर्म त्यांच्या स्वतःच्या कंपनीचा असल्यामुळे प्रत्येक पोस्टसोबत व्यासपीठालाही मोफत प्रसिद्धी मिळते आणि त्यांना स्वतःचा प्रचार सुलभतेने करता येतो. त्यांच्या समर्थकांची संख्या इथे लक्षणीय असल्यामुळे प्रत्येक संदेशाला वेगाने पोहोच मिळते.
अहवालांनुसार, सध्या ट्रुथ सोशलवर सुमारे पन्नास लाख मासिक सक्रिय वापरकर्तेआहेत. ही संख्या इतर प्रचंड लोकप्रिय सोशल मीडिया व्यासपीठांच्या तुलनेत कमी असली, तरी ट्रम्प समर्थकांसाठी हे महत्त्वाचे केंद्र आहे. काही अहवालांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की या व्यासपीठावर अँटीट्रम्प किंवा ट्रम्पविरोधी पोस्ट्सवर निर्बंध घालण्यात येतात. वापरकर्त्यांचा सक्रिय राहण्याचा कालावधी हळूहळू घटत असल्याचेही निरीक्षण आहे.
ट्रुथ सोशल अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे आणि दहा लाखांहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. तसेच हे वेबवरदेखील वापरता येते.
या व्यासपीठाची लोकप्रियता केवळ अमेरिकेपुरती मर्यादित राहिलेली नाही. मार्च महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रुथ सोशल जॉइन केले. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिले की, ट्रुथ सोशलमध्ये सहभागी होऊन त्यांना आनंद झाला आहे आणि या व्यासपीठावरून ते लोकांशी संवाद साधतील. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही या प्लॅटफॉर्मचे नाव चर्चेत आले.
ट्रुथ सोशलचे अस्तित्व म्हणजे आजच्या जागतिक राजकारणात सोशल मीडिया व्यासपीठांचा प्रभाव किती महत्त्वाचा बनला आहे, याचे जिवंत उदाहरण आहे. ट्रम्प यांच्यासाठी हे त्यांचे वैयक्तिक ट्विटरच ठरले आहे, जिथून ते आपले राजकीय संदेश, प्रचार आणि प्रतिक्रिया थेट जनतेपर्यंत पोहोचवतात. – सुचित्रा दिवाकर
Check Also
खर्या अर्थाने स्वच्छता दूत
शहरामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की रस्त्यात, पदपथावर, टेकड्यांवर, डोंगरावर, मोकळ्या जागेत, नदीत व इतरत्र …