तुमच्या जवळपास आज उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन किंवा तत्सम एखादा कार्यक्रम आहे का? माहिती घेऊन सांगा. महाराष्ट्रातल्या निम्म्याहून अधिक लोकांचं उत्तर होकारार्थी येईल. साहजिक आहे. लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. मग असे कार्यक्रम करताच येणार नाहीत. तत्पूर्वी किमान कुदळ मारून घ्यावी, हा सुज्ञ विचार करून सर्वपक्षीय स्थानिक राजकारणी सध्या मतदारसंघाच्या दौर्यात व्यस्त आहेत. (आणि राज्यस्तरीय नेते यात्रांमध्ये!) नंतर कुदळ मारलेल्या जागी झुडपांचं रान माजलं तरी कुणी ढुंकून बघणार नाही; पण आत्ताची घडी महत्त्वाची. काम चाललंय, हे लोकांना आणि त्याहून अधिक मीडियाला दिसलं पाहिजे. पब्लिकला फारच अंडर एस्टिमेट करतात राव नेतेमंडळी..! ‘ये जो पब्लिक है, ये सब जानती है,’ हे रोटी सिनेमातलं गाणं 1974 मधलं. तिथंपासून आठ नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदीपर्यंत या पब्लिकनं बरंच काही बघितलंय, अनुभवलंय आणि स्वतःला ‘तयार’ केलंय. त्यामुळं लोक आपल्या कार्यक्रमासाठी गर्दी करतात, आपल्या भाषणाला टाळ्या वाजवतात, आपल्या जयजयकाराच्या घोषणा मनापासून देतात आणि आपल्या आश्वासनांनी रोमांचित होतात, हे गैरसमज नेतेमंडळींनी डोक्यातून काढलेलेच बरे..! बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विचारा. अर्थात, त्यांना त्यांच्या दौर्याची ‘इनसाइड स्टोरी’ समजली असेल तर! त्यांना बघायला, ऐकायला आणि त्यांच्या कामाचं कौतुक करायला एवढी माणसं जमली होती, असं त्यांना अजूनही वाटत असेल तर विषयच संपला!
झालं असं, की नितीशबाबू बिहारमधील सहरसाच्या दौर्यावर होते. तिथं एका मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर अमरपूरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. अनेक कामांचं भूमिपूजन एकाच वेळी केलं. कोनशिलेवरचा पडदा ओढल्यानंतर एका सरकारी प्रदर्शनाचंं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. वेगवेगळ्या सरकारी विभागांचे स्टॉल या प्रदर्शनात होते. त्यातच राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचाही स्टॉल होता, जिथं सगळ्यात जास्त गर्दी दिसली. एका बायोफ्लॉकमध्ये, म्हणजेच तात्पुरत्या तलावात त्यांच्या हस्ते मासे सोडण्यात आले. प्रदर्शन बघितल्यावर नितीशबाबू हेलिकॉप्टरमध्ये बसून हवेत झेपावले. त्यानंतर काही मिनिटांतच जमलेल्या गर्दीनं मत्स्यव्यवसाय विभागाच्या त्या बायोफ्लॉकवर ‘हल्लाबोल’ केला. आज फिशकरी खायचीच, असा निग्रह करूनच बहुतेक लोक आले होते. त्या बायोफ्लॉकमधलं पाणी ढवळून, सांडून आणि काहींनी तर त्यात उतरून ‘मासेमारी’ करायला सुरुवात केली. लहान पोरांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या हातात मासे दिसू लागले. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी हतबलपणे ही लुटालूट पाहत राहिले. एवढ्या प्रचंड गर्दीसमोर आणि हुल्लडबाजीसमोर त्यांची डाळ शिजेना. अखेर तो तात्पुरता तलाव पुरता रिकामा झाला आणि घरोघरी माशांच्या मेजवानीची तयारी सुरू झाली.
तात्पर्य, आपण एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतो, एखाद्या योजनेची पायाभरणी करतो म्हणजे लोकांसाठी गळ टाकतो आणि लोक माशांसारखे त्यात अडकतात, हा गैरसमज नेत्यांसाठी एकूणातच घातक! लोक आपल्याला बघायला येतात, हा भ्रम तर खूपच धोक्याचा! “आम्ही नितीशबाबूंना बघायला आलोच नव्हतो. आम्ही फक्त हेलिकॉप्टर बघायला आणि मासे न्यायला आलो होतो,” असं कार्यक्रमस्थळी जमलेल्या माणसांनी मीडियासमोर बेधडक सांगितलं. तेव्हा नेतेहो, सावध राहा! कार्यकर्तेतुमच्यावर जेसीबीतून फुलं उधळतील. गर्दी मात्र जेसीबी बघायला आलेली असेल!
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …