शहरामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की रस्त्यात, पदपथावर, टेकड्यांवर, डोंगरावर, मोकळ्या जागेत, नदीत व इतरत्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पुढे त्या कचर्याचे ढीग साचलेले दिसतात. कचरावेचक स्वतःचे आरोग्य आणि आयुष्य धोयात टाकून हाच कचरा साफ करताना दिसतात. यांची समाजात केवळ ‘कचरावाला’ किंवा ‘कचरा कामगार’ एवढीच एक दुर्दैवी ओळख. मग तो दारूच पितो, तो बेवडाच आहे, तो तंबाखूच खातो, तो कामचुकार आहे, तो घाणेरडा आहे. त्या उपर तो कचरा उचलतो म्हणजे काय फुकटात उचलत नाही, चांगला पगार घेतो की! त्याला असे एक ना अनेक टोमणे समाजाकडून ऐकायला मिळतच असतात. त्यांना वेगवेगळ्या स्तरावर वेतन मिळत असले आणि राहणीमान जरी भिन्न दिसत असली तरी कोणत्याही आरोग्याच्या फारशा अशा सुविधा उपलब्ध नसताना ही मंडळी अक्षरशः सहा-सात तास आपली ड्युटी करत असतात. अत्यंत घाणीत आणि धोकादायक वातावरणाच्या सातत्याने संपर्कात असल्याने अनेक प्रकारच्या व्याधी जडून त्यांचे आयुष्य देखील कमी होते. दिवसभर अक्षरशः सात-आठ तास काम केल्याने दुर्गंधीने दम्यासारखे विकार, त्वचेचे विकार, कचर्याच्या पाट्यांची ओझी वाहात करावी लागणारी पायपीट यामुळे शरीरावर, पायावर येणारा ताण, अंगदुखी, पायदुखी, कंबरदुखी, फुफ्फुसाचे विकार, डोळ्यांची जळजळ अशा एकना अनेक विकारांनी हे स्वच्छता कामगार ग्रासलेले असतात. विचार करा, उद्या या सफाई कामगारांनी संप केला, कामे करायची नाही असे ठरवले तर या कचर्यात कोण हात घालून कामे करणार आहे ? दोन दिवसांत आपल्याच घरासमोर, पदपथावर, रस्त्यात, मोकळ्या जागी, सार्वजनिक ठिकाणी कचर्याचे प्रचंड ढीग साठून रोगराई पसरेल. एक अस्वच्छता हजारो रोगांना आमंत्रण देत असते. हजारो रोग लाखोंचे बळी घेत असतात. आज हे कचरावेचक आहेत म्हणून अनेक रोगांपासून, रोगराईपासून आपण दूर आहोत. खरे तर यांना कचरावाले, कामगार, कचरा उचलणारे वगैरे शब्द वापरणे अयोग्य वाटते. हे खर्या अर्थाने स्वच्छता दूत आहेत. त्यांना त्यांच्या सुविधा मिळणे, त्यांचे आरोग्य, कुटुंब, मुलांचे शिक्षण, त्यांची वस्ती यावर लक्ष केंद्रित करून त्यांचे राहणीमान सुधारण्याकरता प्रशासनाचा व नागरिकांचा जास्तीत जास्त कल असावा. त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या वेदना जाणून घेत विचार होणे गरजेचे आहे. असे झाले तरच स्वच्छता दूतांना योग्य असा न्याय मिळेल. याचा समाजातील सर्वच घटकांनी गांभीर्याने विचार करावा.- किर्ती कदम
Check Also
‘ट्रुथ सोशल’ च्या अंतरंगात….
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात वारंवार चर्चेत येणारे एक खास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे …