लेख-समिक्षण

अद्वितीय काजोल

साधारणतः १९७०च्या दशकात जया भादुरी या मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत सहज अभिनयाचे उदाहरण म्हणून ओळखल्या जात असत. नव्वदीच्या दशकात या धाटणीमध्ये तनुजांची कन्या काजोल दाखल झाली. पन्नाशी पार करणारी काजोल आजही तशीच आहे, आरशाने काय सांगितले याकडे फारसे लक्ष न देणारी. ती एकमेवाद्वितीय आहे. काजोल भारतात इतर कुठल्याही अभिनेत्यापेक्षा जास्त भूमिका नाकारते. काजोलचा जिवलग मित्र करण जोहर सांगतो की, काजोल कधीच दिखाव्यासाठी काही करत नाही. ती वाईट वागत नाही. ती जशी आहे तशीच आहे, कोणासाठी बदलण्यास तयार नसलेली ! ऑनस्क्रीन असतानाची तिची सहजता हाच तिचा मोठा गुण आहे. बोलके डोळे, आकर्षक चेहरा आणि सहजसुंदर अभिनय यामुळे काजोलला आतापर्यंत सहा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाले असून त्यात एक सर्वोत्तम खलनायिकेचा पुरस्कार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या तीन दशकांत अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या, परंतु काही मोजया कलाकारांनीच प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप उमटवली. या यादीत अग्रस्थानी येणारे नाव म्हणजे काजोल.केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे, तर एका सशक्त व्यक्तिमत्त्वाच्या कलाकार म्हणून ती आज सिनेवर्तुळापासून दूर गेलेली असूनही लोकप्रिय आहे. ५ ऑगस्ट १९७४ रोजी मुंबईत जन्मलेल्या काजोलचा कलाक्षेत्राशी जिव्हाळ्याचा संबंध होता. तिची आई तनुजा या हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर अभिनेत्री आणि वडील शोमू मुखर्जी हे नामवंत चित्रपट निर्माते होते. अशा कलावंत घराण्यात जन्मल्याने अभिनयाची आवड आणि कला तिच्या रक्तातच होती.
बालपणीच ती आईसोबत अनेकदा चित्रपटांच्या शूटिंगला जात असे. त्या वातावरणाचा तिला नकळत परिणाम झाला आणि अभिनयाची मोहिनी तिच्या मनावर चढली. संत जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना देखील ती सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत असे. पण तिची खरी दिशा शालेय जीवन पूर्ण होण्याआधीच ठरली होती.
वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी काजोलने १९९२ मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटातून पदार्पण केले. कमल सदाना सोबतची तिची ही जोडी ताजी होती, अभिनयही उत्साही होता, मात्र चित्रपटाचे पटकथा आणि दिग्दर्शनातील त्रुटीमुळे तो बॉस ऑफिसवर अपयशी ठरला. परंतु हा अनुभव तिच्यासाठी केवळ सुरुवात होती.
यानंतर १९९३ मध्ये तिच्या कारकीर्दीत पहिला मोठा टप्पा आला, तो म्हणजे अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘बाजीगर’. हा चित्रपट शाहरुख खानच्या गूढ खलनायकाच्या भूमिकेमुळे गाजला, पण त्यात काजोलची नायिका म्हणून उपस्थिती प्रेक्षकांना भावली. संपूर्ण कथानक शाहरुखकडे झुकलेले असतानाही काजोलच्या सहज, नैसर्गिक अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘बाजीगर’च्या यशानंतर ती एका रात्रीत घराघरात ओळखली जाऊ लागली.
१९९४ हे वर्ष तिच्यासाठी मिश्र परिणाम घेऊन आले. ‘उधार की जिंदगी’ हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या अपयशी ठरला, पण तिच्या अभिनयासाठी ‘बाँबे फिल्म जर्नलिस्टस असोसिएशन’ने तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार दिला. याच काळात ‘ये दिल्लगी’मध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खानसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आणि काजोलचे नाव हिंदी सिनेसृष्टीतील टॉप टेन अभिनेत्रींच्या यादीत पक्के झाले.
१९९५ मध्ये यश चोप्रांच्या बॅनरखाली आलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ने काजोलला खर्‍या अर्थाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. शाहरुख खानसोबतची तिची जोडी, अतिशय सिंपल, पण जिवंत अभिनय आणि सिमरनची तितकीच गोड व्यक्तिरेखा या सर्वांमुळे हा चित्रपट जसा आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे, तशीच सिमरनही! या भूमिकेसाठी काजोलला प्रथमच फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेत्री’ पुरस्कार मिळाला.
१९९७ मध्ये काजोलने ‘गुप्त’ या थरारपटात खलनायिका साकारून सर्वांना चकित केले. या भूमिकेसाठीही तिला ‘फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायिका’ पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रथमच एखाद्या अभिनेत्रीला खलनायकाच्या भूमिकेसाठी हा सन्मान मिळाला. या कामगिरीने काजोल केवळ रोमँटिक व्यक्तिरेखांपुरती मर्यादित नाही, तर चतुरस्र अभिनय सादर करू शकते. १९९८ मध्ये आलेल्या ‘दुपट्टा’ चित्रपटात तिने पहिल्यांदाच दुहेरी भूमिका (डबल रोल) साकारली. हे तिच्या अभिनयातील आणखी एक नवे पाऊल होते.
१९९८-९९ हा तिच्या कारकीर्दीचा सुवर्णकाळ मानला जातो. ‘कुछ कुछ होता है’सारखा सुपरहिट चित्रपट तिने शाहरुख खानसोबत केला आणि यासाठी पुन्हा ‘फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री’ पुरस्कारावर आपली छाप उमटवली. तिची लाजरी, प्रेमात पडणारी पण आत्मविश्वासपूर्ण नायिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली.
१९९९ मध्ये तिचा कामाचा वेग कमी झाला, पण प्रेक्षकांच्या मनातील तिची जागा कायम राहिली. २००१ मध्ये काजोलने ‘कभी खुशी कभी ग़म’ या मल्टिस्टारर चित्रपटात अंजलीची भूमिका साकारली. या चित्रपटातील तिचा बिनधास्त गोड आणि भावनिक अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाला भावला. हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटानंतर मात्र काजोलने चित्रपटसृष्टीपासून थोडा विराम घेतला.
या काळातच तिने अभिनेता अजय देवगणसोबत लग्न केले. दोघे १९९९ मध्ये ‘होगी प्यार की जीत’ आणि ‘प्यार तो होना ही था’मुळे एकत्र आले होते. लग्नानंतर तिने वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत केले आणि चित्रपटांची संख्या कमी केली. २००३ मध्ये न्यासा नावाच्या गोड चिमुकलीला काजोलजने जन्म दिला आणि त्यानंतर ती काही काळ आईपणाच्या भूमिकेत रमून गेली.
२००६ मध्ये काजोलने यशराज फिल्म्सच्या ‘फना’मधून पुनरागमन केले. आमिर खानसोबतची तिची केमिस्ट्री, एक आंधळी मुलगी म्हणून तिचा भावनिक अभिनय आणि चित्रपटातील उत्कंठावर्धक कथा या सर्वामुळे ‘फना’ व्यावसायिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी ठरला. या भूमिकेसाठी काजोलला पुन्हा ‘फिल्मफेअर’ मिळाला.
यानंतर २०१० मध्ये ‘माय नेम इज खान’ या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत अभिनय केला. धार्मिक पूर्वग्रह आणि मानवी संवेदनांवर आधारित या चित्रपटात तिचा अभिनय समीक्षकांनीही कौतुकाने गौरवला. या भूमिकेसाठीही तिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले.
काजोलने नेहमीच आपली भूमिका निवडताना गुणवत्ता महत्वाची मानली. ‘वी आर फॅमिली’ (२०१०)मध्ये ती एका गंभीर आजाराशी झुंजणार्‍या आईच्या भूमिकेत दिसली. २०१५ मध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’मधून पुन्हा एकदा काजोल शाहरुखसोबत झळकली. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला, पण समीक्षकांकडून त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. २०१८ मध्ये ‘हेलिकॉप्टर ईला’मध्ये तिने एकल आईची भूमिका साकारली. हा चित्रपट बॉस ऑफिसवर मध्यम यशस्वी ठरला, पण तिच्या अभिनयाची प्रामाणिकता प्रेक्षकांना जाणवली.
चित्रपटसृष्टीत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आगमनानंतर काजोलने ओटीटी माध्यमालाही स्वीकारले. २०२२ मध्ये ती ‘द ट्रायल’ या वेब सिरीजमधून ती एका वकील आणि गृहिणीच्या भूमिकेत दिसली. यातील तिचा परिपक्व अभिनय प्रेक्षकांना भावला.
काजोलच्या अभिनयातील सर्वात मोठी ताकद म्हणजे तिचा नैसर्गिकपणा. ती कधीही अतिरेकी भावभावना वापरत नाही, तर साध्या संवादातून किंवा नजरेतूनच व्यक्तिरेखेची भावना पोहोचवते. तिच्या बोलक्या डोळ्यांतील भाव, सहज हसू आणि ऊर्जा प्रेक्षकांना मनापासून आवडते. शाहरुख खानसोबतची तिची जोडी इतकी लोकप्रिय ठरली की त्यांना ‘बॉलीवूडची गोल्डन पेअर’ म्हटले जाते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी ग़म’, ‘माय नेम इज खान’ आणि ‘दिलवाले’ ‡ या पाच चित्रपटांनी त्यांच्या जोडीची जादू पिढ्यान् पिढ्यांपर्यंत पोहोचवली. काजोलला आतापर्यंत सहा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात पाच सर्वोत्तम अभिनेत्री आणि एक सर्वोत्तम खलनायिकेचा पुरस्कार आहे. २०११ मध्ये भारत सरकारने तिला ‘पद्मश्री’ सन्मान दिला. २०२२ मध्ये तिला जागतिक भारतीय चित्रपट मंचावर ‘आयकॉनिक अभिनेत्री’ म्हणून गौरवण्यात आले.
चित्रपटांबाहेरचे आयुष्यही काजोल अतिशय आनंदाने एंजॉय करत आहे. काजोलला वाचनाचा छंद आहे. ती कुटुंबकेंद्री असून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. शिक्षण आणि महिला सक्षमीकरण यांसाठी कार्य करणार्‍या अनेक स्वयंसेवी संस्थांशी काजोलने स्वतःला जोडून घेतले आहे.
आज, ५१ वर्षांच्या वयातही काजोलचा आत्मविश्वास, तिचे तेज आणि प्रेक्षकांशी असलेला भावनिक बंध तितकाच कायम आहे. विविध टीव्ही शो, टॉक शो किंवा ओटीटीवर जेव्हा जेव्हा काजोलचे दर्शन होते, तेव्हा हसणारी, नटखटपणा करणारी काजोल सर्वांनाच आवडून जाते. – सोनम परब

Check Also

किस्सा अशोक-सचिन मैत्रीचा

मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर …