लेख-समिक्षण

पोषणजादू

पोषण ट्रॅकरमध्ये आपलं स्वागत आहे, असा मेसेज आल्याचं पाहून ‘ती’ भेदरलीच. वास्तविक गर्भारपणाच्या किंवा स्तनदा माता असण्याच्या काळात आपल्या आणि बाळाच्या योग्य पोषणासाठी सरकारने चालवलेले प्रयत्न पाहून ‘ती’ आनंदी व्हायला हवी होती. मग नेमकं उलट का झालं? कारण ‘ती’ अविवाहित होती. हा मेसेज घरातल्यांनी पाहिल्यावर तर कल्लोळच झाला. आता आपल्याला कुठे तोंड दाखवायची सोय उरली नाही, या जाणिवेनं घरातले सगळेच हादरले. कुणाला विचारायला जावं, तरी आफत! ऐन दिवाळीत डोळ्यापुढे अंधार झाला. गावात फुटणारे फटाके त्रासदायक वाटू लागले. दिवाळीच्या शुभेच्छांसह ही कसली ‘गुड न्यूज’ आली, जिने फराळाची चवच घालवली? थोड्याच वेळात गावात आणखी एक ‘ती’ असल्याची माहिती मिळाली. तीही अविवाहित. दोन कुटुंबांमध्ये या मेसेजवरून संवाद झाला. काही वेळानं तिसरं कुटुंब या चर्चेत सहभागी झालं. बघता-बघता अशा मुलींची संख्या वाढत गेली, ज्या अविवाहित असतानाच माता झाल्या होत्या किंवा होणार होत्या. योग्य पोषण मिळण्यासाठी ताजं आणि गरम अन्न खावं, समुपदेशनासाठी आणि बालआरोग्य निरीक्षणासाठी अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा, अशा सूचना त्या गावातल्या तब्बल चाळीस मुलींना मिळाल्या होत्या. कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, असं म्हणावं तर मेसेज थेट सरकारी कचेरीतून आलेले. धक्क्यातून सावरल्यावर विचार आला, सरकारी कचेरीशीच कुणी खोडसाळपणा केला असेल तर?
उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जिल्ह्यातलं महलिया नावाचं हे गाव ऐन दिवाळीत वेगळ्याच धामधुमीत गुरफटून गेलं. ग्रामस्थांना प्रश्न पडत गेले, तसा गुंता सुटत गेला. घरात गर्भवती महिला किंवा स्तनदा माता आहे, ही माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या कचेरीला कोण देतं? हे सर्वेक्षण करण्याचं काम तर अंगणवाडी सेविकांचं. सबब, माहिती घेणार्‍या अंगणवाडी सेविकेची ही चूक असावी, अशा निष्कर्षाप्रत गावकरी पोहोचले. प्रत्यक्षात अविवाहित असणार्‍या; पण कागदावर गर्भवती दिसणार्‍या या मुलींनी मग अंगणवाडी सेविकेलाच हा प्रश्न विचारला. काही प्रश्नांना या सेविकेने उत्तरच दिलं नाही, तर काहीजणींशी ती असभ्य भाषेत बोलली. त्यामुळं वेगळाच संशय येऊ लागला. ही ‘चूक’ नसून ‘घोटाळा’ असावा असं अनेकांना वाटलं आणि तेच खरं निघालं. मुलींनी आणि पालकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे या प्रकाराची तक्रार केली आणि चौकशीची मागणी केली. चौकशीत लक्षात आलं, की अंगणवाडी सेविकेनं गर्भवती आणि स्तनदा मातांना मिळणार्‍या पोषण आहरात अपहार करण्यासाठी हे सगळं घडवून आणलं होतं. सहा महिन्यांपासून ती या मुलींच्या नावावर स्वतःच्या कुटुंबाचं ‘पोषण’ करत होती.
गावातल्या काही मुलींना तिने काही महिन्यांपूर्वी आधार कार्ड मागितलं. कारण विचारल्यावर सांगितलं, की आधार आणि मतदार ओळखपत्र ‘लिंक’ करायचं आहे. आधार कार्ड महिला आणि बालविकास विभागात नोंदवून घेतली आणि या मुली गर्भवती असल्याचं सांगितलं. प्रत्येक गर्भवतीला दरमहा एक किलो गहू, दीड किलो हरभर्‍याची डाळ आणि अर्धा लिटर तेल दिलं जातं. हा सगळा शिधा अंगणवाडी सेविकाच लंपास करत होती. योजना कुणासाठी आणि पोषण कुणाचं? आपल्याकडे हे वारंवार घडत असतं. फक्त ‘ट्रिक्स’ बदलतात.

Check Also

खेळू नका!

खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्‍याचदा यामागे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *