झोपल्यावर दिसतं ते स्वप्न नसतं, तर झोप उडवतं ते स्वप्न असतं, अशा आशयाचे अनेक सुविचार सोशल मीडियावर आपण रोज वाचत असतो. पण त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळं झोप हेच एक स्वप्न झालंय आणि त्यामुळं स्वप्नांना झोप आलीये, हे आपल्या गावी तरी आहे का? दोन दिवसांपूर्वी अलिगडच्या शाळेतला एक व्हिडिओ बातमीचा विषय झाला होता. प्राथमिक शिक्षिका वर्गात चटईवर गाढ झोपलीये आणि चिमुकली मुलं हातपंख्यानं तिला वारा घालतायत, हे दाखवून देणार्या त्या व्हिडिओवरून बरंच महाभारत झालं. शिक्षिकेचं वर्तन निर्विवाद चुकीचंच आहे; पण भोवताली मुलांचा चिवचिवाट सुरू असताना तिला लागलेल्या गहिर्या झोपेचा हेवा वाटल्यावाचून राहत नाही. ही शांत झोप आपल्याकडून कुणी चोरून नेली, या प्रश्नाचं ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी’ असं उत्तर देणारं संशोधन समोर आलंय आणि तेच खरं तर झोप उडवणारं आहे. ‘डिजिटल स्वप्नव्यत्यय’ हा शब्द तर हादरवून टाकणारा आहे. आपण जोपर्यंत जागे असतो, तोपर्यंतच सेलफोन हातात ठेवू शकतो. एकदा झोपलो, की त्याचा आणि आपला संबंध संपला, असं वाटत असेल तर तो शुद्ध भ्रम आहे. सोशल मीडियाचा प्रभाव आपल्या जागृतावस्थेच्या पलीकडे जाणारा आहे. त्याच्यामुळे आपल्या झोपेचे तास कमी झालेत, हे तर खरं आहेच. शिवाय आपल्या झोपेची गुणवत्ताही कमी झाली असून, स्वप्नांवरही त्याचा अत्यंत नकारात्मक परिणाम होतोय.
ऑस्ट्रेलियाच्या फ्लिडंर्स विद्यापीठाच्या संशोधकांनी ही संकल्पना सोपी करून सांगितलीय. समजा, आपलं मन म्हणजे स्वच्छ पाण्याचं सरोवर आहे. आपल्या विचारांचं आणि आकांक्षांचं स्पष्ट प्रतिबिंब त्यात पडलंय. पाणी स्थिर असल्यामुळं आपल्याला आपले विचार आणि आकांक्षा सुस्पष्ट दिसतायत. आता अशी कल्पना करा, की त्या सरोवरात कुणीतरी दगड मारला आणि पाण्यात तरंग निर्माण झाले. आता आपल्याला आपले विचारही स्पष्ट दिसत नाहीयेत आणि उद्दिष्टही! दिवसभर सोशल मीडिया आपल्या मनाच्या सरोवरात अशी ‘दगडफेक’ करत राहतो आणि त्यामुळं उठणारे तरंग घेऊनच आपण झोपी जातो. जे लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात त्यांना झोपेचा त्रास तर जाणवतोच; शिवाय भयानक स्वप्नं पडण्याचं प्रमाण वाढतं, असं संशोधकांना दिसून आलं. स्वप्नं हे आपल्या गहिर्या इच्छा आणि भीतीचं प्रकटीकरण असतं. मेंदूच्या सातत्यपूर्ण अनुभवातून या भावना जागृतावस्थेपासून निद्रावस्थेपर्यंत पाठलाग करत असतात. जागृतावस्थेतील भावनिक उलथापालथींचा प्रतिध्वनी स्वप्नातून ऐकू येतो. अनुभव जसाच्या तसा येत नसला, तरी विचारांची दिशा तीच असते. म्हणजेच, दैनंदिन स्वप्न हे जागृतावस्थेतील अनुभवांचं ‘एक्स्टेन्शन’ असतं… स्वरूप बदललेलं.
इथे स्वप्नाचा अर्थ ‘ध्येय’ असा घेतला, तरी परिणाम तोच होतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे, या म्हणीबरोबरच उत्कट इच्छाशक्ती आपला जीवनमार्ग बनते, हेही वास्तव आहे. ‘डिजिटल स्वप्नव्यत्यय’ तिथेही आड येतो. तरंग निर्माण करतो. आपल्या इच्छा-आकांक्षांचं स्पष्ट रूप आपल्याला पाहू देत नाही. पाठलाग करावा, असं स्वप्न पाहायचं असेल, तर झोपेची गुणवत्ता सुधारली पाहिजे, असं संशोधकांनी म्हटलंय. पण दिवसाचा पहिला आणि अखेरचा किरणसुद्धा स्क्रीनमधूनच डोळ्यावर पडत असल्यामुळं झोप हेच स्वप्न ठरलंय.-अपर्णा देवकर
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …