दसर्यानिमित्त रावणदहन झोकात झालं. उत्तर भारतात हा कार्यक्रम फार मोठा असतो. आपल्या राज्यात यंदा निवडणुकीच्या आधीचा दसरा असल्यामुळं रावणदहनापेक्षा जास्त लक्ष मेळाव्यांवर केंद्रित झालं होतं. त्यामुळं विरोधकांवर फेकलेले शाब्दिक बाण यंदा अधिक टोकदार झाले होते. असो, तर रावणदहन हा सोहळा वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. उत्तरेत सामान्यतः शारदीय नवरात्राला प्रारंभ झाल्यापासून रामलीलेचं मंचन सुरू होतं आणि विजयादशमीला रावणदहनाने त्याची सांगता होते. यादरम्यान काही रंजक किस्से घडतात, तर काही वेळा गंभीर अपघातही घडतात. यावर्षीच्या रामलीला गाजवल्या, त्या हरिद्वारच्या दोन कैद्यांनी. सीतामाईच्या शोधासाठी लंकेला निघालेल्या वानरांची भूमिका हे दोन कैदी करत होते. त्यातला एक कच्चा कैदी होता, तर दुसरा हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला. हे दोन ‘वानर’ सीतामाईला शोधण्यासाठी गेले, ते परत आलेच नाहीत. आता त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना दहा पथकं तयार करावी लागलीत. रामकथेत वेगळाच ट्विस्ट आणणार्या या ‘वानरां’चं प्लॅनिंग पक्कं होतं. हरिद्वारच्या तुरुंगात ‘हाय सिक्युरिटी सेल’ तयार करण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी बरीच बांधकाम सामग्री आणि अन्य साहित्य तिथे आणलं गेलं. त्यातल्याच शिडीचा वापर करून हे दोन कैदी पळून गेले, असं सांगितलं जातंय. गंमत म्हणजे, सीतामाईला शोधण्यासाठी गेलेल्या वानरांची बराच वेळ वाट बघितल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला.
तिकडे बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात आणखी एक विचित्र, पण गंभीर घटना घडली. सर्वाधिक जनसंपर्क असणारे खासदार म्हणून प्रसिद्ध असणारे राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव हे एका गावात रावणदहनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले. 55 फुटांचा अक्राळविक्राळ रावण तयार करण्यात आला होता. पप्पू यादव यांनी एका रॉकेटला बत्ती दिली; पण दुर्दैवानं ते रॉकेट उलट्या दिशेनं लावलेलं होतं. त्यामुळं अपघात होऊन पप्पू यादव यांच्या डोळ्याला दुखापत झाली. उत्तर प्रदेशच्या भदोही शहरात आणखी एक अजब घटना घडली. रामलीलामधील विनोदी कलावंताची एन्ट्री जेसीबीतून होईल, असं ठरलं होतं. रामलीला सुरू असताना जेसीबीच्या पुढील भागात बसवून त्या विनोदी कलावंताला मिरवत रंगमंचाजवळ आणलं गेलं. परंतु जेसीबी चालकाचा ताबा सुटला आणि रामलीला बघायला आलेल्यांच्या गर्दीत तो घुसला. मंडपात एकच गोंधळ उडाला. माणसं जीवाच्या आकांतानं सैरावैरा धावू लागली. या गोंधळात जेसीबीखाली चिरडून एकाचा मृत्यूही झाला. वास्तविक, बुलडोझर नावाच्या यंत्राची कामं ठरलेली आहेत. मात्र, प्रचंड शक्ती लाभलेलं हे यंत्र शक्तिप्रदर्शनासाठी वापरण्याची चढाओढ सर्वत्र दिसते. त्याचा परिणाम कधीतरी असा होतो.
दिल्लीच्या शहादरा भागात रामलीलाचे प्रयोग सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली. त्या दिवशी सीता स्वयंवराचा सीन होता. लक्ष्मणाने आपले संवाद म्हटले. आता प्रभू श्रीरामांनी संवाद घेणं आणि शिवधनुष्य उचलणं अपेक्षित होतं. त्याच वेळी श्रीरामांची भूमिका करणार्या कलावंताला हार्ट अॅटॅक आला आणि पडद्यामागे जाऊन तो कोसळला. रुग्णालयात भर्ती करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. ही एक घटना सोडल्यास बाकीच्या सर्व आपत्ती मानवनिर्मित आहेत. उत्सव-समारंभांत अतिरेकी धाडस आणि अतिआत्मविश्वास टाळला पाहिजे, हाच याचा धडा!
– अवंती कारखानीस
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …