2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये ‘मी पुन्हा येणार’, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस भाजपच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा आले आहेत. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून मला फडणवीस यांनी सहकार्य केले, असे शिंदे म्हणाले. त्यानंतर भाजप नेते अमित शहा यांनी फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचे सोपस्कार पूर्ण केले.
दोन दिवस माध्यमांशी न बोललेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे केलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. राज्याच्या प्रगतीत योगदान देता आले त्याचा आनंद आहे. मुख्यमंत्रिपदाबद्दल भाजप नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो शिवसेनेसाठी अंतिम असेल. आम्हाला तो निर्णय मान्य असेल. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेताना मनात कोणताही किंतु बाळगू नका, असे मी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले आहे. काल माझा पंतप्रधानांशी संवाद झाला. सत्ता स्थापन करताना शिवसेनेचे पूर्ण सहकार्य असेल. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप जो निर्णय घेईल त्याला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील मतदारांना धन्यवाद देतो. जनतेचे आभार मानतो. हा मोठा विजय अनेक वर्षांनंतर पाहायला मिळाला. महायुतीच्या विकासकामांवर लोकांनी विश्वास दाखविला. विकासकामे आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. मविआने थांबविलेल्या कामे महायुती सरकारने पुढे सुरू केली. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कामाची पोचपावती मिळाली. पायाला भिंगरी बांधून सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. मी स्वत:ला मुख्यमंत्री समजलो नाही. निवडणुकीच्या काळात 80 ते 90 सभा घेतल्या. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी पाठबळ दिले. मोठ्या प्रमाणात निधी दिला. समविचारी सरकार असते, त्यावेळी राज्याचा विकास गतिमान होतो. आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या सरकारने असे निर्णय घेतलेले नाहीत. पत्रकारांचेही प्रश्न सोडवले. राज्याला 1 नंबरला नेण्याचे काम केले. महाराष्ट्रातील जनतेचे प्रेम मिळाले. आणखी काम करायचे आहे, असे त्यांनी निरोपाचे भाषण केले.
शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावर दुसर्या दिवशी भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भाजपतर्फे शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली. त्याचबरोबर महत्त्वाची खाती देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, शिंदे यांनी ही ऑफर नाकारल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गुरूवारी बैठक झाली. बैठकीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीने दणदणीत विजय नोंदवला आहे. हा विजय जितका मोठा आहे, तितकाच मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेंस अधिक होता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर पेच सुटला आहे.
भाजपच्या नेतृत्वातील महायुती शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या साथीने सत्ता स्थापनेचा दावा करेल. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुळात कोणत्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा मान मिळणार, याबाबतही अजून संदिग्धता आहे. पाच वर्ष एकाच पक्षाकडे किंवा एकाच नेत्याकडे राहणार की वाटले जाणार, याचा फॉर्म्युलाही ठरलेला नाही. मंत्रिमंडळाचे संभाव्य विभाजन समोर आले आहे. यानुसार, मुख्यमंत्र्यांशिवाय 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक जागा जिंकणार्या भाजपच्या सर्वात जास्त आमदारांचा समावेश असेल. भाजपचे 10 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यात कॅबिनेट आणि राज्यमंत्री अशा दोघांचाही समावेश असेल.
Check Also
राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …