लेख-समिक्षण

ओटीटीमुळे कात टाकतेय बॉलिवूड

कोरोना काळानंतर मनोरंजनाच्या स्वरुपात बराच बदल झाला आहे. कोरोनाकाळात चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आणि तत्कालिन काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक ओटीटी प्लॅटफॉर्मने भागविली. एक-दीड वर्षेया माध्यमातून लोकांचे मनोरंजन झाले. कोरोना काळ संपला आणि टॉकीजचे दरवाजे पुन्हा उघडले. आता चित्रपटांचा जुना काळ परतला. प्रेक्षक पॉपकॉर्न खात टॉकीजकडे वळत आहेत. पुष्पा, अ‍ॅनिमलसारखे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. दुसरीकडे प्रेक्षकांचे ओटीटीवरचे प्रेम मात्र कमी झालेले नाही. कारण ओटीटीनेही कात टाकली असून वेब सिरीज आणि नव्याने प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांना टॉकीजवर झळकणार्‍या चित्रपटाप्रमाणेच दर्जा देत सुधारणा केली. काही प्रकरणात तर नियमित चित्रपटांपेक्षा ओटीटीवरचे चित्रपट सरस वाटत आहेत. म्हणून चित्रपट उद्योग देखील ओटीटीला शरण गेला आहे की काय, असे वाटू लागले आहे. एकेकाळी कलागुण असणार्‍या नव्या कलाकारांना पडद्यावर फारशी संधी मिळत नसे. खुप स्ट्रगल केल्यानंतरही कोठेतरी कोपर्‍यात सहायक कलाकाराची भूमिका वाटयाला यायची. पण आता ओटीटीसारखा प्लॅटफॉर्म नव्या कलाकारांना कलागुण दाखविण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेले कलाकार ओटीटीवर चमकत आहेत. ते आज ओटीटी स्टार बनले आहेत.
ओटीटीवर चमकणारे तारे
जयदीप अहलावत हा आजच्या घडीला ओटीटीवरील वेब मालिकेतला मोठा कलाकार. एकेकाळी ते बॉलिवूडमध्ये लहानसहान भूमिका करण्यापुरतीच मर्यादित राहत असत. अक्षयकुमार यांचा खट्टा मिठ्ठा आणि आलिया भट्ट यांचा ‘राजी’ मध्ये त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. पण ‘पाताल लोक’ वेब मालिकेतील दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. प्रतीक गांधी नावाच्या आणखी एका कलाकाराचा उल्लेख करता येईल. त्यांनी हर्षद मेहतावरील साकारलेली वेब मालिका ‘1992 द स्कॅम’ मध्ये आघाडीची भूमिका केली. या मालिकेतील भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. तत्पूर्वी ते गुजराती चित्रपट आणि नाटकरपुरतीच मर्यादित होते.
ओटीटीवर हीट, चित्रपटातही काम
‘मिर्झापूर’सारख्या गाजलेल्या वेब मालिकेत नकारात्मक भूमिका करणार्‍या दिव्येंशू शर्मा यांना ‘बत्ती गुल मीटर चालू’मध्ये श्रद्धा कपूरसमवेत प्रेमप्रसंग करण्याची संधी मिळाली. ‘मिर्झापूर’ मालिकेतील ‘मुन्ना भैय्या’ सर्वत्र गाजला आणि त्याची दखल बॉलिवूडने घेतली. विक्रांत मेसीने गेल्या दहा वर्षांत लहानसहान भूमिका केल्या. मात्र ‘मिर्झापूर’ मालिकेतील बबलू आणि ‘क्रिमिनल जस्टिस’मधील आदित्यची भूमिका सर्वत्र चर्चेली गेली. याचा फायदा मोठ्या पडद्यावरही काम मिळाले. मानवी गगरूने ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘आमरस’ आणि ‘पीके’मध्ये सहायक भूमिका केली होती. परंतु प्रेक्षकांनी ‘ट्रिपलिंग’मध्ये मानवीला पाहिले आणि तिच्या अभियनाचे कोडकौतुक झाले. तिला ‘शुभमंगल ज्यादा सावधान’सारख्या चित्रपटातही आघाडीची भूमिका मिळाली. वेब मालिका ‘फर्जी’ मध्ये शाहिद कपूरचा पार्टनर झालेला भुवन अरोराने साकारलेली फिरोजची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली. या भूमिकेने सर्वांवर छाप पाडली. सर्वाधिक स्ट्रिमिंग वेब मालिका म्हणून ‘फर्जी’ ओळखली जाते. टिव्ही मालिकेत दिसणारा करण टँकर हे नामांकित नाव, परंतु त्यांच्या करियरला दिशा मिळाली ती नीरज पांडे यांच्या ‘स्पेशल ऑप्स’ने.
नावाने नाही तर चेहर्‍याचे चाहते
वेब मालिका ‘क्लास’ मध्ये नीरजची भूमिका करणार्‍या गुरफतेह सिंह पीरजादाने वेगळी छाप पाडली. तत्पूर्वी गुरफतेह सिह पीरजादाला प्रेक्षकांनी ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गिल्टी’मध्ये पाहिले होते. परंतु ‘क्लास’ मध्ये त्यांची गंभीर भूमिका वेगळी ओळख निर्माण करून देणारी ठरली. वेब मालिका ‘ज्युबली’ने नवा कलाकार म्हणून सिद्धांत गुप्ताला जन्म दिला. दुसरीकडे नाट्यकलावंत असलेल्या जीम सर्भ याने चित्रपट आणि ओटीटीसह अन्य माध्यमांवरही छाप पाडली. शिवाय ‘पद्मावत’ आणि ‘मेड इन ऐवन’सारख्या चित्रपटांतही त्याने चांगले काम केले. प्रेक्षकांना या चेहर्‍याची ओळख होती, परंतु नाव फारसे चर्चेले गेले नव्हते. ओटीटीने दोन्ही ओळख मिळवून दिली.
चित्रपट उद्योगानेही स्वीकारले ओटीटीला
मनोरंजन क्षेत्रात दूरचित्रवाणीने पाऊल टाकले तेव्हा चित्रपटसृष्टीवर फार परिणाम झाला नाही. परंतु ओटीटीने चित्र बदलले. मोठ्या पडद्यावरील नामांकित कलाकारांनीही आपला मोर्चा ओटीटीकडे वळवला आहे. मालिका निर्मितीही बॉलिवूडचे कलाकार आणि निर्माते उतरले आहेत. संजय लीला भन्साळीनंतर अनेक दिग्दर्शकांनी ओटीटीचा रस्ता धरला असून आता एकही दिग्दर्शक त्यापासून अपवाद राहिलेला नाही. प्रेक्षक घरबसल्या मनोरंजनाला पसंती देत आहेत. बॉबी देवल, नसिरुद्दीन शाह, अर्शद वारसी, काजोल, अभिषेक बच्चन यासारख्या कलाकारांनी ओटीटीवर पदार्पण केले आहे. रवीना टंडनचे ओटीटीवरील पदार्पण ‘आरण्यक’ने झाले.
मोठ्या कलाकारांनाही मोह आवरता आला नाही
अजय देवगनचा रुद्र, रवीना टंडनचा आरण्यक, माधुरीचा ‘फेम गेम’, सुष्मिता सेनचा ‘आर्या-1, आर्या-2’ने या मंडळींना नव्या जगाचा मार्ग दाखविला. अजय देवगन हे ‘रुद्र:द एज ऑफ डार्कनेस’च्या प्रदर्शनासह प्रथमच ओटीटीत पाऊल टाकत आहेत. त्यांच्यासमवेत ईशा देवलही आहे. माधुरीदेखील ओटीटीवर आली आहे. ओटीटीवरचा वेब शो ‘फाइंडिंग अनामिका’ च्या माध्यमातून तिने ओटीटीवर पदार्पण केले. सोनाक्षी सिन्हाने ‘फॉलन’ मालिकेतून पाऊल टाकले. शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ने ओटीटीवर धमाल केली. अनिल कपूरने ‘द नाईट मॅनेजर’ या माध्यमातून नव्या व्यासपीठाची निवड केली.
टॉकीजमध्ये आणि ओटीटीवरही कमाल
मनोज वाजपेयी यांनी एकाहून एक सरस भूमिका बजावल्या आहेत. त्यांची वेब मालिका ‘द फॅमिली मॅन’ वेब मालिकेने त्यांना ओटीटीवरील मोठे स्टारपद मिळवून दिले. ‘द फॅमिली मॅन’, रे, गुलमोहर आणि बंदा यासारख्या शोमधून त्यांनी छाप पाडली. ‘सेकंड गेम्स’ च्या माध्यमातून सैफ अली खानने ओटीटीवर पदार्पण केले. त्याचवेळी काजोलने ‘द ट्रायल’ आणि ‘लस्ट स्टोरीज-2’ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकले. पंकज त्रिपाठी यांना मिर्झापूर, सेके्रड गेम्स आणि क्रिमिनल जस्टीसारख्या वेब मालिकेतील भूमिकेने ओळख मिळवून दिली. किआरा अडवानीने ‘लस्ट स्टोरीज’मधूनच नाव कमावले आहे.
चित्रपटात फ्लॉप ओटीटीवर हीट
अनेक वर्षेकाम करूनही चित्रपट उद्योगात खूप प्रसिद्धी मिळाली असे नाही. अनेक कलाकारांचा एखादाच चित्रपट चालतो आणि नंतर ते बाजूला पडतात. बॉबी देवल याचा उल्लेख करता येईल. पण ओटीटीवर बॉबीच्या आश्रम मालिकेने सर्व विक्रम मोडित काढले. अभिषेक बच्चनने ‘बॉब बिस्वास’, ‘दसवी’ आणि ‘द बिग बुल’ सारख्या चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण केली. जॅकलिन फर्नांडिसच्या ‘मिसेस सीरियल किलर’ने कमाल केली. आगामी काळातही ओटीटी व्यासपीठ हे मनोरंजन क्षेत्राच्या दुनियेत कसे स्वरुप धारण करते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.- सोनम परब

Check Also

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *