मुलांनी चूक केल्यानंतर राग येणे स्वाभाविक आहे. पण त्या रागाला नियंत्रित करणे आणि ती चूक योग्य प्रकारे सुधारणे तितकेच कठीण पण आवश्यक आहे. बरेचसे पालक मुलांनी चूक केल्यानंतर कुठलाही विचार न करता एकदम त्यांच्या अंगावर ओरडतात. इतकेच नाही तर अपशब्दांचा वापरही करतात. वास्तविक पाहता,
मुलांना वाढवणे, त्यांचे पालनपोषण करणे ही एक संयमाची परीक्षाच असते. यावेळी कुठलीही गोष्ट समजावून सांगताना शब्दांचा आणि वाक्यांचा उपयोग अतिशय विचारपूर्वक पद्धतीने केला गेला पाहिजे.
बरेचदा पालकांच्या बोलण्याचा अर्थ मुले अतिशय चुकीचा काढतात आणि त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान दुखावला जातो. अशा गोष्टी सतत घडत गेल्या तर मुले आणि पालकांमध्ये दरी निर्माण होत जाते. म्हणूनच, रागाच्या वेळी मुलांशी बोलताना काही सर्वसामान्य शब्दांचा आवर्जून टाळावा.
बरेचसे पालक आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करत असतात. अशा वेळी आपल्या मुलामध्येही काही विशिष्ट गुण आहेत आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वालाही काही मर्यादा आहेत, ही मूलभूत गोष्टच ते विसरतात. हे सत्य समजून घेऊन मुलांना ‘तू राजूसारखा का बनत नाहीस’ किंवा ‘तो बघ पहिला आला, तुला अभ्यास करायला नको’ अशा प्रकारचे शब्द वापरू नयेत. मुलांचे गुण समजून घेऊन त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे म्हणजे मुलांची गुणवत्ता आपोआप आकार घेऊ लागते.
रागाच्या भरात बरेचदा मुलांना धमक्या दिल्या जातात. ‘तू अमूक करणे बंद केले नाहीस तर तुला बाथरूममध्ये कोंडून घालीन’ किंवा जेवायला देणार नाही, खेळायला बाहेर पाठवणार नाही’ अशा प्रकारच्या धमक्यांमुळे दोन परिणाम होतात. एक तर मुले नको इतकी घाबरट होतात किंवा अतिशय कोडगी बनतात. ‘तू कुठलीही शिक्षा दे मी ऐकणार नाही’ असा एक हेका त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि ही स्थिती भविष्यात जास्त घातक ठरू शकते.
मुलांना रागवताना ‘तू किती मूर्ख आहेस, तुला एवढेही समजत नाही का’ असेही वाक्य बरेचदा पालकांकडून बोलले जाते. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. स्वतःबद्दलचा एक न्यूनगंड कायम त्यांच्या मनात राहतो. याचा त्रास त्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. असे बोलण्याऐवजी तेच काम तू योग्य प्रकारे कसे करू शकशील याची माहिती शांतपणे दिली तर मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि पुढच्या वेळी ओरडण्याची वेळही येणार नाही.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …