लेख-समिक्षण

अविश्वसनीय कथेत गुरफटलेला मुंजा

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंजा’ हा हिंदी भाषेतील चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हॉरर कॉमेडी चित्रपट. असे असले तरी हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक मुंजाला सिरियसली घेत नाहीत, आणि हीच जमेची बाजू मुंजाच्या यशासाठी पथ्यावर पडणारी ठरली आहे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी आणि कौटुंबिक कलह असला तरी कोकणातला माणूस आपल्या संकटात सापडलेल्या माणसाला वाचण्यासाठी जीवाची बाजी लाऊन त्याला कसे वाचवतो, हा चित्रपट याचाही संदेश देतो.
——-
कोकणामध्ये बर्‍याच कथा दंतकथा आख्यायिका आजही प्रचलित आहेत. रात्रीस खेळ चाले ही मराठी दूरचित्रवाणीवरील मालिका यामधूनही याचे दर्शन प्रेक्षकांना घडले असेल. कोकणातील विविध ठिकाणी देवस्थानं मार्फत भूतबाधा झालेल्या माणसाच्या अंगातील भूत काढण्यासाठी 15 ते 20 वर्षातून एकदा आयोजित करण्यात येणारा धार्मिक विधी बारस, भूतबाधा, करणी, देवचार, चाळ, भगत, मानकरी अशा गोष्टी आजही अस्तित्वात आहेत. आधुनिक युगात या गोष्टी अंधशद्धा मानल्या गेल्या असल्या आणि त्याविरोधात कायदा केला गेला असला तरी कोकणात मात्र अशा दंतकथा आणि आख्यायिकांवर आजही डोळे झाकून विश्वास ठेवला जातो! जेव्हा या कथा आजी किंवा आजोबांच्या अडगळीत पडलेल्या, जपून ठेवलेल्या पेटार्‍यातून लिखित साहित्याच्या रूपाने समोर येतात आणि इतिहासाच्या पानापानातून डोकावतात किंवा जुन्या जाणत्या गावकर्‍यांच्या तोंडातून गजाली, गोष्टीतून बाहेर पडतात, तेव्हा मात्र या विश्वासाला आणखी बळकटी मिळते.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंजा’ हा हिंदी भाषेतील चित्रपट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला आहे. असे असले तरी हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक मुंजाला सिरियसली घेत नाहीत, आणि हीच जमेची बाजू मुंजाच्या यशासाठी पथ्यावर पडणारी ठरली आहे. हा चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हॉरर कॉमेडी चित्रपट. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील एक सुंदर गाव. या गावात असणारी वाडी म्हणजे चेटूकवाडी. ही वाडी किल्लावजा बेटावर असते आणि ती निर्मनुष्य, भीतीदायक असते. या चित्रपटातील नायक असतो बिट्टू आणि नायिका असते बेला. बिट्टू याला चेटूकवाडी मधील त्या रहस्यमय झाडाची आणि स्थळाची स्वप्ने पडू लागतात. नायक पुण्यात आई सोबत राहत असतो. त्याचे वडिलोपार्जित घर कोकणात चिपळूण मध्ये असते. तो बेलावर मनोमनी प्रेम करत असतो. पण बेला एका परदेशी युवकांवर प्रेम करत असते. बेला ही बिट्टू याला मित्र मानत असते. बिट्टू याचा एक मित्र विविध इव्हेंटचे शूटिंग करत असतो. एके दिवशी बेलाच्या झुंबा क्लास मध्ये बिट्टू आणि त्याचा मित्र, बेला हे एका शूट साठी गावी जाण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे बिट्टूची आई, आजी असे सर्वजण चिपळुणात जातात. बिट्टू याचा काका हा त्याचा आणि त्याच्या आईचा (मोना सिंगचां) तिरस्कार करत असतो. बिट्टू याच्या वडिलांचा मृत्यू तिच्यामुळे झाल्याचा तो जाहीरपणे बोलत असतो. कारण चेटूकवाडी मधील जागा बिट्टू याचे वडील विकणार असतात, त्यापूर्वी ते शापित झाड जाळण्यास जात असताना त्यांचा समुद्रात पडून बुडून मृत्यु होतो. चिपळुणातील घरी गेल्यावर बिट्टू आणि त्याच्या आईला बिट्टू याचे काका हा विषय कादून नको नको ते बोलतात. मग आपल्या वडिलांच्या मृत्यूचे खरे कारण माहित झाल्यावर बिट्टू त्या चेटूकवाडीकडे रागारागाने जातो. तेव्हा रात्र झालेली असते. तो जेव्हा त्या शापित झाडाजवळ येतो, तेव्हा झाडाच्या पानांची सळसळ त्याला ऐकू येते. त्यावेळी त्याला हा मुंजा दिसतो. इकडे बिट्टूच्या घरात त्याला शोद्यायला सर्वजण बाहेर पडतात. बिट्टूची आजीला तो कुठे गेलाय, हे समजल्यावर ती आपल्याकडील छडी घेऊन बाहेर पडते. जेव्हा आजी त्या झाडाजवळ येते तेव्हा तिला झाडावर मुंजा बसलेला दिसतो. हा मुंजा तिचा लहानपणी निधन पावलेला लहान भाऊ असतो. मुंजा बिटूवर हल्ला करून त्याला पकडतो. मात्र आजी आपल्याकडील छडीने प्रतिकार करत आपल्या नातवाला त्याच्या तावडीतून सोडवते. मात्र, पुन्हा त्या जागेतून बाहेर पडत असताना मुंजा हा आजी आणि नातवावर हल्ला करतो. या हल्ल्यात आजीचा मृत्यू होतो. मुंजा बिट्टूलाही सोडत नाही. हल्ला केल्यावर मुंजाचा हाताचा पंजा त्याच्या पाटीवर बसला असतो, त्याचा व्रण पाटीवर उमटला असतो.
आजीच्या मृत्युला त्याचा काका हा बिट्टू व त्याच्या आईला पुन्हा जबाबदार धरतो. यानंतर मात्र खरा खेळ सुरू होतो. आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी मुंजा बिट्टूला छळण्याचे काम सुरळीतपणे सुरूच ठेवतो. मुंजाच्या हाताचा पंजा बिट्टू याच्या पाटीवर उमटल्यांने सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी मुंजा विक्रम आणि वेताळ या गोष्टीप्रमाणे सारखा त्याचा पाठलाग करतो. कधी त्याच्या पाठीवर बसून तर कधी त्याच्या आसपास राहून अस्तित्व दाखवतो. आपले पहिले प्रेम मुनीला शोध, असा तगादा त्याने लावलेला असतो. त्यासाठीं तो एकदा त्याच्या ब्युटी पार्लर मध्ये जात एका मातेच्या बाळाचे अपहरण करून मारण्याचा असफल प्रयत्न ही करतो. मग बिट्टू गावाकडील चुलत बहिणीशी संपर्क साधून तिला मुनी विषयीची माहिती मिळवतो. त्याच्या त्या बहिणीला घरात मुनी हीचा एक जुना फोटो मिळतो. हा फोटो ती बिटूला पाठवते. तिचा चेहरा सेम टू सेम बेला सारखा असतो. मग बिटू आणि त्याचा मित्र बेलाच्या घरी जातात.
ही अक्का म्हणजे बिट्टू याच्या आजीची लहानपणाची मैत्रीण असते. तिथे मुंजा हा नायिका असलेल्या बेला हिला पाहतो आणि आता मला मुनी नको तर बेला हवी असे म्हणत पुन्हा बिट्टूच्या हात धुऊन पाठीमागे लागतो. बेला लगीन असे बोलत तो बिट्टूच्या मानगुटीवर बसतो. आपल्या दोघांचे लग्न लाऊन देण्यासाठी बिट्टूवर दबाव टाकतो. दरम्यान, बेला हीचा प्रियकर हा गावी बेला हिला शोधत येतो. समुद्र किनार्‍यावर त्या दोघांची भेट होत असल्याचे पाहून मुंजा जाम चिडतो आणि या प्रियकरावर जबर हल्ला करून पळ काढतो.
त्यानंतर बिट्टू आणि त्याचा मित्र हँड ऑफ गॉड हा कार्यक्रम करणार्‍या एका धुरंधर माणसाला भेटतात. तो माणसाच्या अंगातील भूत काढत असतो, असा त्याचा दावा असतो. त्याला हे दोघे एकांतात भेटतात. त्यावेळीं त्याचे उघड गुपित काय हे समजते. पण तो आपल्याला मुंजाला कसे वश करायाचे हे माहीत असल्याचे सांगतो, आणि त्याला पकडून खात्मा करण्यासाठी ते एक प्लॅन तयार करतात. तो प्लॅन काय असतो. तो वॉकआऊट होतो का, बेलाला वाचवण्यात शेवटी यश येते का, मुंजा आपली अतृप्त इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी होतो का, बिट्टूला आजीची ती छडी मिळाल्यावर नेमके काय होते, बेला तिच्या प्रियकरासोबत लग्न करते का, हे सारे रंगतदार आणि उत्कंठावर्धक नाट्य पडद्यावरच पाहणे इष्ट.
या चित्रपटातील सिनेमेट्रोग्राफी अप्रतिम आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य देखील या निमित्ताने पाहता येतं. समुद्र, नारळी, पोकळीच्या बागा, कोकणस्थ घरे, पायवाटा आदींचे चित्रण चांगल्या पद्धतीने केले आहे. मुंजा चित्रपट पाहताना क्षणाक्षणाला उत्कंठा, उत्सुकता वाढते. मात्र मधेच कुठेतरी हा चित्रपट आपली लय हरउन बसल्याचा भास होतो, असे जाणवते.
कथा, पटकथा, संवाद, अभिनय गीत – संगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणता येतील. चित्रपट हसत खेळत प्रेक्षकांची मनोरंजन करत असला तरी इतर हॉरर चित्रपटाप्रमाणे अंगावर काटा आणणारी भीती किंवा मनात घर करून राहणारे एखादया दृश्याचे भय अथवा एखादा हॉरर सीन पाहून बसणारी दातखेळी यात तितकीशी जाणवत नाही. म्हणूनच हा चित्रपट इतर हॉररपट पेक्षा ही प्रत्यक्ष वेगळा ठरतो. हा चित्रपट केवळ भुता खेतावर, दंतकथेवर आधारलेला नाही तर हा चित्रपट आजी आणि त्याच्या नातवाचे एकमेकाविषयी असणार्‍या जिव्हाळ्याचे, स्नेहाचे, माया अन् ममतेचे बंध उलगडत जातो. आपल्या मैत्रिणीवर एकतर्फी प्रेम करणारा नायक तिच्यासमोर आपले खरे प्रेम व्यक्त करूनही तिच्या मनाचा, इच्छेचा, निर्णयाचा आदरही करतो, हा चित्रपट हे दाखवतो. गावाकडील सर्वांग सुंदर निसर्गाच्या ओढीने येणारा परिवार, आपली कर्मभूमी वेगळी असली तरी जन्मभूमीला, वाढ वडिलांच्या स्थानाला न विसरणारा नायक यात दाखवलेला आहे, कोकणातील शिमगो उत्सवच्या निमित्ताने संकासुर (लोकसंस्कृती) याचेही दर्शन वां झलक या कलाकृतीतून पाहायला मिळते. कितीही वैचारिक मतभेद असले तरी आणि कौटुंबिक कलह असला तरी कोकणातला माणूस आपल्या संकटात सापडलेल्या माणसाला वाचण्यासाठी जीवाची बाजी लाऊन त्याला कसे वाचवतो, हा चित्रपट याचाही संदेश देतो. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. काही उदयोन्मुख कलाकारांना अजूनही आपला अभिनयाचा दर्जा उंचावता आला असता, तसा वाव ही चित्रपटातील प्रसंगात होता, असे वाटते. असो. एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला आहे. – महेश गावडे

Check Also

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *