अंतराळ विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात जोमाने प्रगती करणार्या भारताचा क्रीडाक्षेत्रामधील दबदबाही गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. टी-20 विश्वचषक जिंकणार्या भारतीय क्रिकेट संघाने यावर नव्याने शिक्कामोर्तब केले आहे. क्रिकेटच्या खेळात सांघिक समन्वयाला अधिक महत्त्व आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर रोहितसेनेने मिळवलेली पकड विलक्षण आहे. त्याला जोड लाभली ती राहुल द्रविडसारख्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाची. त्यामुळे भारतीय संघ अजेयस्थितीत पोहोचला आहे. द्रविड, रोहित आणि विराट या तिघांनीही या विजयानंतर टी-20मधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ते पाहता येणार्या काळासाठी नवा संघ तयार करण्याची पायाभरणी आता करावी लागणार आहे.
बार्बाडोस येथील केनसिंग्टन ओव्हल मैदानावर पाऊस पडण्यापूर्वीच भारतीय खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रूचा महापूर आला. कारण भारताने 2007 नंतर पहिल्यांदा 17 वर्षाच्या खंडानंतर टी-20 चे विश्वकरंडक जिंकला होता. अंतीम सामन्याच्या वेळी खेळाडूंचेच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. लढत एवढी रंजक झाली की कोण जिंकेल, हे शेवटच्या षटकांपर्यंत कोणीही सांगू शकत नव्हते. अखेर टीम इंडियाने शेवटच्या षटकात अचाट कामगिरी करत विश्वचषकावर नाव कोरले.
भारताने शेवटचा विश्वचषक 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय श्रेणीत जिंकला होता. 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वकरंडकात भारताने हुकुमत गाजवली. धोनीसेनेने विश्वचषक जिंकण्याचा दुष्काळ संपविला. अर्थात विश्वविजेता होण्याचा नारळ कपिल देव यांच्या संघाने फोडला होता. 1983 मध्ये विंडिजला पराभूत करत भारताने पहिल्यांदा विश्वकरंडक जिंकला. यंदाच्या टी-20 स्पर्धेत भारतीय संघ हा एखाद्या जगजेत्याप्रमाणे खेळली आणि अपराजित राहत विजेता ठरला. अंतीम सामन्यापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघे देखील अजिंक्यच राहिला होता. अॅडन मारक्रमच्या नेतृत्वाखाली संघाने ‘चोकर्स’चा डाग काढण्याची प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि तसा दबावही त्यांच्यावर हेाता. अंतिम सामन्यापर्यंत हे विशेषण बर्यापैकी हटले होते. अर्थात दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन होण्याकडे वाटचालही केली होती. भारतीय संघाला कमी धावसंख्येवर रोखण्यात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना यश आले आणि नंतर तडाखेबंद फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची हवाही काढली होती. 24 चेंडूत 26 धावा असताना आणि सहा फलंदाज शाबूत असताना भारतीय संघाच्या हातातून सामना निसटण्याची स्थिती निर्माण झाली. पण भारतीय खेळाडूच्या सांघिक खेळीने कमाल केली अणि सूर्यकुमार यादवने घेतलेला अप्रतिम झेल ऐतिहासिक ठरला. शेवटच्या दोन षटकांत अचूक मारा केल्याने भारतीय संघ विजयाचा झेंडा फडकावू शकला. गेल्यावर्षी घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या आयसीसी विश्वकरंडकातही भारताने चांगली कामगिरी. रोहित शर्मा यांच्या हाती धुरा ठेवण्याचा सात महिन्यापूंर्वी निर्णय घेताना प्रशिक्षक द्रविड अणि शर्मा यांनी यंदाची टी-20 स्पर्धा त्यांच्याच शैलीत खेळण्याचा निर्धार केला होता. प्रसंगी आक्रमक प्रसंगी संयमी.
अशावेळी विश्वचषकातील सामन्यात विराट कोहलीची बॅट न तळपल्याने आणि त्याला सतत पहिल्या फळीला पाठविले जात असल्याबद्दल टीका केली जात हेती. परंतु द्रविड आणि रोहित यांना विराटची क्षमता ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी टीकेचा विचार न करता त्याच्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास शेवटच्या सामन्यात सार्थकी लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना संघाची पडझड होताना त्याच्या फलंदाजीमुळे चांगली धावसंख्या उभारता आली. भारताचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर विराटने अक्षर पटेलबरोबर संयमी फलंदाजी करत डाव सावरला आणि धावंसख्या दीडशेच्या वर नेण्यास मदत केली. ही धावसंख्या आव्हान देण्याच्या स्थितीत होती. विराटने 76 धावा काढताना सहा चौकार आणि दोन षटकार लगावले होते.
आता भिस्त होती ती गोलंदाजांवर. भारताचा गोलंदाज जसप्रित बुमरा आणि अर्शदीप सिंह यांच्या गोलंदाजीचे तर सर्वत्र कौतुक होत होते. परंतु यातही हार्दिक पंड्याने चांगले यश मिळवले. त्याच्या हाती शेवटचे षटक सोपविले तेव्हा दक्षिण आफ्रिकेला 16 धावा करायच्या होत्या. त्याच्यासमोर डेव्हिड मिलर होता. तो आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. शेवटच्या षटकाची जबाबदारी घेताना अर्थातच हार्दिकचे हृदय धडधडले असेल. कारण याच षटकात विश्वविजेता ठरणार होता. तत्पूर्वी अक्षर पटेलने एकाच षटकात 24 धावा दिल्याने भारतीय संघाच्या हातून सामना गेल्याचेच चित्र निर्माण झाले होते. परंतु सूर्यकुमार यादवने पंड्याची गोलंदाजी यशस्वी ठरविली. मिलरने पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सीमापारही जात होता, त्याचवेळी सूर्यकुमारने लिलया पद्धतीने चेंडू पकडला आणि तो सीमेच्या आत फेकत त्यावर पुन्हा झडप घातली. याच क्षणाने सामन्याचे रुप पालटले आणि भारताकडे विश्वविजेतेपद येण्याचे चिन्हे दिसू लागले.
राहुल द्रविडच्या कार्यकाळातील ही शेवटची स्पर्धा होती आणि ती स्मरणीय करण्याचे काम रोहितच्या टीमने केले. द्रविड हे खेळाडू म्हणून संघाला विश्वकरंडक जिंकून देण्याचे स्वप्न साकार करु शकले नाही, परंतु प्रशिक्षक म्हणून त्यांनी राहिलेले स्वप्न पूर्ण केले. या यशात राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर या त्रिकुटाचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या तिघांच्या घनिष्ठ संबंधातून संघाची बांधणी, विचार आणि ध्येय गाठण्यात एकवाक्यता राहिली. द्रविड आणि रोहित यांना हवे असणारे खेळाडू आगरकरने उपलब्ध करुन दिले. शिवाय द्रविडचा प्रत्येक खेळाडूशी असणारा ताळमेळ हा या यशाचा परिपाक आहे. मध्यंतरी रोहित आणि हार्दिकमध्ये ताणाताणी सुरू असल्याच्या बातम्या येत असताना द्रविड यांनी संघात एकसंधपणा वाढीस लावला. परिणामी संघाने विजयपथाकडे वाटचाल केली.
राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांचे संघाला विश्वविजेते होण्यात महत्त्वाचे योगदान असले तरी त्यांनी आपल्यासमवेतच्या खेळाडूंनाच सहायक कर्मचारी म्हणून नियुक्त केले. विक्रम राठोड, प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि अजित आगरकर यांनी तत्कालिन काळात संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे निवडकर्ता आणि संघाचे कर्मचारी यांच्यात ताळमेळ राहिला आणि संघाला ध्येय गाठण्यात यश आले. द्रविड यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच आयसीसी ट्रॉफी असून त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात भारताने कसोटी चॅम्पियनशीप, एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतीम सामन्यापर्यंत धडक मारली. ही एक अलौकिक कामगिरी राहिली आहे. द्रविड यांच्यानंतर विराट अणि रोहितने टी-20 मधून निवृत्ती स्वीकारली आहे. रविंद्र जडेजाने देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. अशावेळी नव्या प्रशिक्षकाला आपल्या दृष्टीकोनानुसार या श्रेणीतील नवा संघ तयार करण्याची मोठी संधी मिळणार आहे.-नितीन कुलकर्णी , क्रीडा अभ्यासक
Check Also
राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …