वन्यजीवाची शिकार करणं हा आपल्याकडे गंभीर गुन्हा मानला जातो. त्यासाठी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमात विविध अनुसूचींमध्ये वन्यजीवांचे वर्गीकरण केलं गेलंय. हे वर्गीकरण संबंधित प्राणीप्रजातीला असलेला विलुप्त होण्याचा धोका विचारात घेऊन करण्यात आलंय. वन्यजीवांना संरक्षण देणं हा त्यामागील हेतू असून, जंगलात जाऊन शिकार करणं किंवा मानवी वस्तीत शिरलेल्या वन्यजीवाला ठार मारणं हे दोन्ही गंभीर गुन्हे आहेत. उलटपक्षी, एखाद्या पाळीव जनावराने चरण्यासाठी वनक्षेत्राची हद्द ओलांडली आणि जंगली श्वापदाने त्याची शिकार केली, तर जनावराच्या मालकाला नुकसान भरपाई मिळवणं खूप अवघड होऊन बसतं. खरं तर प्राणी जंगली असो वा पाळीव, त्याला हद्दी कळत नाहीत. मग हा फरक कशामुळे? याचं उत्तर असं, की पाळीव प्राण्यावर लक्ष ठेवणं ही त्याला पाळणार्या माणसाची जबाबदारी आहे आणि माणसाला हद्दी समजतात. उलटपक्षी, वन्यजीव मानवी वस्तीत शिरला म्हणून त्याला मारलं तरी संबंधिताला शिक्षा होतेच. देशांच्या, राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या हद्दीही आपणच निर्माण केल्यात. वन्यजीवांचे अधिवास ठरलेले असले, तरी त्या जागेचा सातबारा त्यांच्या नावावर नसतो. आपापल्या वावरक्षेत्राचं, अधिवासाचं आणि कुटुंबाचं, विशेषतः पिलांचं रक्षण आपापल्या हद्दीत ते करतातच; पण त्यामागे जमिनीच्या मालकीचा आव नसतो. म्हणूनच प्रेमासाठी हद्द ओलांडणारा ‘जॉनी’ चर्चेचा विषय ठरतो. तो ‘प्रेमळ’ म्हणून ओळखला जात नसला तरी!
वाघाला ‘प्रेमळ’ म्हणण्याची चूक कुणीच करणार नाही. पण तोही प्रेमात पडतो. त्याची जोडीदारीण त्याच्यासाठी प्रेमाची खूण म्हणून जो विशिष्ट गंध उत्सर्जित करते, तो त्याला शंभर किलोमीटरपर्यंत जाणवतो आणि तो तिच्याकडे ओढला जातो. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट परिसरात राहणारा जॉनी मात्र आपल्या जोडीदार वाघिणीला शोधताना स्वतःच हरवला. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातून जॉनी ‘त्या’ वाघिणीच्या शोधासाठी निघाला आणि त्यासाठी निसर्गाने ठरवून दिलेली शंभर किलोमीटरची मर्यादाही त्याने ओलांडली. रोज सरासरी दहा किलोमीटर या वेगाने तीस दिवसांत त्याने तीनशे किलोमीटरचा टप्पा ओलांडला. हिवाळा हा सामान्यतः वाघांचा मीलनाचा हंगाम असतो. या काळात वाघांचा माणसांना थेट धोका नसतो. त्याचं लक्ष वाघिणीवर केंद्रित झालेलं असतं. स्वतःच्या ‘टेरिटरी’मध्ये जॉनीला त्याची जोडीदारीण भेटली नाही; पण म्हणून त्याने प्रवास थांबवला नाही. महाराष्ट्राची हद्द ओलांडून तो तेलंगणमध्ये गेला. ऑक्टोबरच्या तिसर्या आठवड्यात सुरू झालेला त्याचा प्रवास अजूनही संपलेला नाही, असं अभयारण्यातल्या अधिकार्यांचं म्हणणं आहे. अर्थातच, एवढ्या दिवसांत त्याला अन्नाची गरज लागलीच असणार आणि काही जनावरं मारून त्याने ती पूर्णही केली.
कदाचित त्यामुळेच जॉनीचा हा प्रवास केवळ वाघिणीच्या शोधार्थ नसावा, असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. स्वतःचं प्रभावक्षेत्र सोडता-सोडता त्याला भक्ष्य दिसलं असावं आणि त्याने हद्द ओलांडली असावी, असं म्हटलं जातंय. परंतु तो मजनू नाही; जॉनी आहे. वाघिणीच्या शोधार्थ तो उपाशीतापाशी फिरणार नाही. त्यामुळं त्याचा मुख्य उद्देश मादीचा शोध हाच असावा आणि भूक लागल्यामुळं त्याने वेळोवेळी शिकार केली असावी, असंही काहींना वाटतं. काहीही असो, वाघासारखा वाघही प्रेमात भावविव्हल होतो, हे अधिक महत्त्वाचं!
Check Also
जा एकदाची..!
जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …