लेख-समिक्षण

दिव्यांगपणावर जिद्दीने मात

मूळचे पुण्यातील असलेले डॉ. बोत्रे सध्या राजस्थानातील पिलानी येथील ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’च्या अखत्यारितील सिरी या संस्थेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. भाऊसाहेब यांचे बालपण पुण्यातील रामवाडी वसाहतीत गेले. अवघे एक वर्षाचे असताना त्यांना ताप आल्याचे निमित्त झाले आणि दोन्ही पायांना पोलिओने ग्रासले. त्यानंतरही त्यांच्या आईने त्यांना शाळेत घातले. त्यांना दहावीत 82 टक्के गुण मिळाले होते. प्राथमिक शाळेत असताना ते मुलांच्या पाठंगुळी बसून शाळेत जात असत. मात्र, मोठे झाल्यावर त्यांना कुबड्यांवर चालता येत नव्हते. त्यामुळे ते दोन्ही हातांवरच चालत असत. दहावीनंतर त्यांनी वाडिया महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. इलेक्ट्रॉनिक्स विषयात ते तत्कालीन पुणे विद्यापीठात पहिले आले होते. त्यांनी पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) पूर्ण केले.
या शिक्षणासाठी विद्यापीठाचे शुल्क भरण्याचीही त्यांची परिस्थिती नव्हती. समाजातून झालेल्या मदतीमुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय आला नाही. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विद्याशाखेत डॉ. दमयंती घारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएच.डी’देखील संपादित केली. ‘आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क आणि गॅस सेन्सर अ‍ॅरे’च्या आधारे ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ तयार करून अन्नपदार्थांचा ताजेपणा, गुणवत्ता तपासणारे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न भाऊसाहेब यांनी केला. या संशोधनातून संगणकाला कोणत्याही अन्नपदार्थाचे गंध किंवा वास ओळखण्याचे सामर्थ्य येईल, यासंबंधीचे संशोधन त्यांनी केले. 2005मध्ये बोस्टन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाऊसाहेब यांनी त्यांच्या संशोधनाची मांडणी केली होती. त्यांना केंद्रीय विज्ञान संशोधन केंद्राची सीनिअर रिसर्च फेलोशिप त्यांना मिळाली. ‘फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ सेन्सर्स’च्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेत त्याच्या सादरीकरणाला पहिला आणि बेंगळुरूच्या स्पर्धेत कृत्रिम गंधसंवेदना पद्धतीबाबतच्या प्रबंधाला दुसरा पुरस्कार मिळाला होता.
बोस्टन परिषदेत सहभागानंतर त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. दिव्यांगांनी सरकारी आणि गैरसरकारी संस्थांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष 2021-22चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
डॉ. बोत्रे यांनी उतार रस्ते, उड्डाणपूल, डोंगरी भागातून दिव्यांगांना चढ-उतार करण्यासाठी इलेक्ट्रिकसोबतच हँड पायडल यंत्र विकसित केले आहे. यासह ‘ई-असिस्ट ट्रायसिकल’चे एक प्रोटोटाइप विकसित केले आहे.
जिद्दीने प्रयत्न केले तर अपंगात्वावरही मात करुन नेत्रदिपक कामगीरी करता येेते ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *