मुलींच्या बाबतीत समाजाची मानसिकता अजूनही मागासलेलीच दिसून येते. त्याला समाजाचा कोणताही स्तर अपवाद नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती दिसून येत आहे. मानसिकतेची तीव्रता कमी-जास्त असू शकेल, एवढाच काय तो फरक. मुलगी झाली म्हणून तिचा जीव घेण्याच्या किंवा तिच्या आईचा मानसिक छळ करण्याच्या घटना समाजात अधून-मधून घडतात. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात अशीच एक घटना नुकतीच घडली. चौथी मुलगी झाली म्हणून वडिलांनी त्या लहानगीचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. मुलगी झाली म्हणून केल्या जाणार्या मानसिक छळाची तीव्रता त्या आईसाठी अनेकदा इतकी असह्य असू शकते की, आईच पोटच्या गोळ्याचा जीव घ्यायला प्रवृत्त होऊ शकते. अशा घटना कुठे ना कुठे घडतात. असे काही झाल्यावर समाज त्या आईला दोष देऊन मोकळा होतो. कोणतीही अप्रिय घटना घडली की, प्रतिक्रियांचा पूर हमखास ठरलेला. लोक संताप व्यक्त करतात, पण किती जण समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात ? घडणार्या अशा त-हेच्या प्रत्येक घटनेमागे ‘मुलगा हवा’ हेच कारण असेल का? सामाजिक असुरक्षितता, हुंड्यासारख्या कालबाह्य प्रथा, परंपरा तसेच विवाहपद्धतीचे बदलते खर्चिक स्वरूप ही त्यापैकी काही कारणे होत. मुलीचा विवाह वेळेत होईल का? झाला तर तो टिकेल का? मुलीचा घटस्फोट तर होणार नाही? अशा नव्या प्रश्नांची त्यात भर पडली आहे. त्या सर्व गोष्टींचा एकत्रित ताण मुलीच्या पालकांवर येत असावा का? अर्थात मुलगी नकोशी व्हावो, असा याचा अर्थ अजिबात नाही. दुष्कृत्यांची शिक्षा मिळायलाच हवी. त्या बरोबरीने समस्यांवर उत्तरे शोधण्याचे प्रयत्नदेखील व्हायला हवेत. हुंडाविरोधी कायदा आहे, पण छुप्या पध्दतीने समाजात ही रूढी पाळली जाते. पूर्वी एका दिवसात विवाह पार पडायचे. त्याची जागा आता काहो दिवसांनो आणि वाढीव खचांने घेतलेली पाहावयास मिळते. प्री आणि पोस्ट वेडिंग शूट, विवाहाचे किमान दोन दिवस, नंतर पूर्वापार पाळल्या जाणार्या प्रथा, असा अनेक खर्चिक गोष्टींचा त्यात समावेश होतो. शिवाय सामाजिक असुरक्षितता हा मुद्दा आहेच. या व अशाच काही कारणांमुळे ‘मुलगी नको’ असा लोकांचा ग्रह होत आहे. मुलींना संधी मिळाली वा दिली गेली तर त्या स्वतःला सिद्ध करतात, याची कितीतरी उदाहरणे समाजात आढळतात. मुलीही त्यांच्या पालकांचीही उत्तम काळजी घेतात. मुलींबाबतचे प्रतिकूल वातावरण बदलल्यास पालकांना मुलगी हवीशी वाटण्यास ते पोपक ठरेल.- किर्ती कदम
Check Also
जा एकदाची..!
जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …