दाढी ही निसर्गाने पुरुषाला दिलेली अशी भेट आहे, जी काहीजणांना हवीशी वाटते तर काहींना नकोशी. गंमत म्हणजे, दाढी आणि मिशी फक्त पुरुषांना लाभलेली असली, तरी मराठीत हे दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत. दाढीचा संबंध कधी धर्माशी जोडला जातो, कधी परंपरेशी तर कधी चेहर्याच्या उठावदारपणाशी. प्राचीन ऋषीमुनींच्या दाढीपासून आजच्या कॉर्पोरेट दाढीपर्यंत एक मोठी परंपरा पाहायला मिळते. अलीकडे दाढी वाढवण्याचा आणि तिला वेगवेगळे आकार देण्याचा ट्रेन्ड आहे. काही वर्षांपूर्वी कोरलेली दाढी आणि जास्तीत जास्त फ्रेंच कट हे दोनच प्रकार प्रचलित होते. आता चिन स्ट्रॅप दाढी, सोल पॅच दाढी, फेड दाढी, डकटेल दाढी असे अनेक प्रकार आले आहेत. चेहर्याला ‘फ्रेम’ करणं, जॉ-लाइनला उठाव देणं, टोकदार लूक देणं अशा अनेक कारणांसाठी दाढीचे वेगवेगळे प्रकार ‘रेकमेंड’ केले जातात. पूर्वी बर्याच कचेर्यांमध्ये गुळगुळीत दाढी करून येणं बंधनकारक असायचं. आता कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मस्त मेन्टेन केलेली दाढी चारचौघात उठून दिसायला मदत करते. दाढी धुणं, कंडिशन करणं, मॉइस्चराइज करणं यासाठी वेगवेगळी तेलं, जेल, बाम वगैरे उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर ‘बिअर्डलेस बॉयफ्रेन्ड की तमन्ना अब हमारे दिल में है,’ अशा घोषणा देत तरुणींनी मोर्चा काढणं सगळ्यांनाच धक्का देणारं होतं. इंदौरमधील ही घटना सध्या चर्चेत आहे.
‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ असा मजकूर लिहिलेले फलक घेऊन तरुणींनी मोर्चा काढला. ‘दाढी रखो या गर्लफ्रेंड… चॉइस तुम्हारी’ असाही मजकूर काही फलकांवर होता. मोर्चाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तरुणी नकली दाढ्या लावून घोषणाबाजी करत होत्या. दाढी राखण्याचा आणि मेन्टेन करण्याचा ट्रेन्ड असताना हा मोर्चा का निघाला, हे गौडबंगाल अनेकांना उलगडलेलं नाहीये. दाढी असलेल्या मुलाशी आम्ही मैत्री करणार नाही आणि प्रेमही करणार नाही, असा इशारा या मुली देत होत्या. अहो, हल्ली बहुतांश लग्नमंडपांमध्ये दाढीवाला नवरदेव बघायला मिळतो. पूर्वीसारखा गुळगुळीत दाढी करून, आयुष्यातलं एकमेव फेशियल करून अंतरपाटामागे उभा राहिलेला नवरदेव दुर्मिळ झालाय. तरुणींना हा ट्रेन्ड खरोखर नकोसा झालाय का? की या विचित्र मोर्चामागे आणखी काही कारण आहे? चर्चा सुरू झालीये. आपल्याकडे चर्चेला निमित्तच लागतं. ते द्यायला सोशल मीडिया समर्थ आहेच. शिवाय चर्चा झाली, की ती घडवून आणणारे आणखी फेमस होतात. म्हणजे, चर्चा घडवून आणायची आणि चर्चेत राहायचं, अशा वर्तुळाचा हा भाग असावा, असं अनेकांचं म्हणणं आहे.
या मोर्चाची अपेक्षेप्रमाणेच सर्व बाजूंनी चर्चा झाली. अपेक्षेप्रमाणं विरोध, निषेधही झाला. त्यामुळं या मुली आणखी चर्चेत आल्या. मुख्य म्हणजे, दाढी चर्चेत आली. पण एखाद्याने मोर्चेकर्यांचं ऐकून खरोखर गुळगुळीत दाढी केली आणि ‘आम्ही गंमत केली,’ असं त्याची गर्लफ्रेंड म्हणाली तर..? शिवाय, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. त्यामुळं दाढी राखणार्यांनी व्यक्तिगत मसलत करूनच निर्णय घेतलेला बरा! दाढीचा ज्योतिषशास्त्राशीही संबंध आहे म्हणे! त्याचंही एक गणित असल्याचं सांगितलं जातं. उगीच एखादा ग्रहाचा कोप कशाला ओढवून घ्यायचा?
Check Also
जा एकदाची..!
जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …