लेख-समिक्षण

288 मतदारसंघासाठी 7,995 उमेदवारीअर्ज

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होते. अखेरपर्यंत महायुतीने व महाविकास आघाडीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 7,995 जणांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
दरम्यान, महायुतीने 285 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर महाविकास आघाडीने 281 जणांना उमेदवारी दिली आहे. यासह मनसे, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीसह इतर अनेक पक्षांनी राज्यात त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. महायुतीच्या जागावाटपात भारतीय जनता पार्टीने 152 जागा मिळवल्या आहेत. त्यापैकी 148 जागांवर त्यांनी स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर, त्यांनी चार जागा त्यांच्या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 80 जागा मिळाल्या असून त्यांनी दोन जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत. अजित पवारांना वाटाघाटीत केवळ 53 जागा मिळाल्या असून त्यांनी या सर्व जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने एकूण 283 जागांवर 288 उमेदवार दिले आहेत. पाच मतदारसंघात महायुतीचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. तर पाच मतदारसंघांमध्ये महायुतीने उमेदवार दिले आहेत की नाही हे कळू शकलेले नाही. मालेगाव मध्य मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही.
दुसर्‍या बाजूला, महाविकास आघाडीच्या जागावाटपातही सावळागोंधळ पाहायला मिळाला. अखेरच्या दिवसापर्यंत त्यांच्या जागावाटपावरील चर्चा चालूच होत्या. मविआच्या जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. कारण त्यांनी राज्यात तब्बल 104 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 90 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने 87 उमेदवार दिले आहेत. मविआने राज्यातील एकूण 277 जागांवर 282 उमेदवार दिले आहेत. पाच मतदारसंघांमध्ये मविआचेच प्रत्येकी दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इतर 10 मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार दिले आहेत की नाही, किंवा या जागांवर त्यांच्या मित्रपक्षांचा उमेदवार आहे का? हे कळू शकलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मलिक यांना अखेरच्या पाच मिनिटांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एबी फॉर्म दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार केल्याचे आरोप असल्यानं मलिक यांना उमेदवारी देण्यात येऊ नये भारतीय जनता पक्षाची भूमिका होती. पण प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचा दबाव झुगारल्याची चर्चा आहे. त्यांच्या सना मलिक या अणुशक्तीनगर मतदारसंघातून पहिल्यांदाच लढत आहेत. याआधी इथून नवाब मलिक विजयी झाले आहेत. पण यंदा नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ लेकीसाठी सोडला आहे. सना मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याबद्दलही शेलारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ’सना मलिक यांच्या बाबतीत तशी (नवाब मलिक यांच्या संदर्भात आली तशी) कोणतीही माहिती किंवा पुरावा समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे. याबद्दल अन्य प्रश्न उपस्थितच होत नाही,’ असे शेलार म्हणाले. त्याच वेळी आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांचा भारतीय जनता पार्टी प्रचार करणार नसल्याचे सांगितले.

Check Also

राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष

परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *