लेख-समिक्षण

हरहुन्नरी अतुल

आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन सर्वांनाच चटका लावून गेलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणार्‍या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर अभिनेता म्हणून घोडदौड सुरू असतानाच परचुरे यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केलं होतं. ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर येण्याची त्यांची जय्यत तयारी सुरू होती. या नाटकाची तालीम सुरू असतानाच त्यांना पोटाचा त्रास जाणवू लागला. पण ते बाहेर पडून ते पुन्हा रंगभूमीवर परततील असे वाटले होते. पण नियतीला ते मंजूर नव्हते !
बॉलीवूडच्या चंदेरी नगरीतील काही लोकप्रिय तारेतारकांना कर्करोग या दुर्धर व्याधीनं आपल्यापासून हिरावून नेल्याचं गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालं. सत्तरच्या दशकात अनेक चाहत्यांना आपल्या अदाकारीने वेड लावणार्‍या विनोद खन्ना यांना ब्लॅडरचा कर्करोग झाला होता. त्यातच प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी 70 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार अशी ख्याती असलेल्या राजेश खन्ना यांना 2011 मध्ये कर्करोग झाल्याचं निदान झालं. वर्षभरातच त्यांची कॅन्सरशी झुंज संपली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील सुंदर अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा कर्करोगाने बळी घेतला. नर्गिस यांना 1980 मध्ये पँक्रिअ‍ॅटिक कॅन्सरने पछाडलं होतं. न्यूयॉर्कमध्ये उपचारांनंतर त्या भारतात परतल्या. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर नर्गिस कोमात गेल्या. मुलगा संजय दत्तचं बॉलिवूड पदार्पण पाहण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे अभिनेता इरफान खान. त्याला न्यूरोएंडोक्राईन कॅन्सरने ग्रासलं होतं. या आजाराशी इरफानची झुंज अखेर अयशस्वी ठरली. कर्करोगाने बळी घेतलेला आणखी एक बॉलिवूड सेलिब्रेटी म्हणजे संगीतकार आदेश श्रीवास्तव. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर अवघ्या 40 दिवसांत त्यांचे प्राण गेले. मराठी मनोरंजनविश्वातही स्मिता तळवळकर, निळू फुले यांच्यानंतर गेल्या दोन-पाच वर्षांत नामवंत कलाकारांना कर्करोगाची लागण झाल्याचे समोर आले. शरद पोंक्षेंसारख्या कसदार अभिनेत्याचे केमोथेरपीनंतरचे रुप पाहून समस्त मराठी चाहते हादरले होते. पोंक्षेंनी निर्धाराने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर उपचार घेऊन मनोरंजनविश्वात कमबॅकही केले. त्यापाठोपाठ एके दिवशी अचानक अतुल परचुरे या हरहुन्नरी कलाकाराला कर्करोगाने गाठल्याचे समोर आले. बालकलाकार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणार्‍या अतुल परचुरेंना आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू असताना त्यांना कर्करोगाचं निदान झालं. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी याविषयीची माहिती दिली आणि ती व्हायरल झाल्यावर सर्वच मराठी रसिक हळहळले. विशेष म्हणजे शरद पोंक्षेंप्रमाणेच त्यांनाही चुकीच्या उपचारांमुळे या कर्करोगाचे निदान होण्यास उशिर झाला. यामुळे त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम झाले. पण त्यांनीही इच्छाशक्तीच्या जोरावर कर्करोगावर मात करून आपल्या कामकाजाला सुरुवात केली. ‘खरं खरं सांग’ या नाटकातून परचुरे यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांनी रंगभूमीवर पुनरागमनही केलं होतं. याशिवाय ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकात ते झळकणारही होते. पण या नाटकाच्या तालमीदरम्यान त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. यातूनही ते बाहेर पडून ते पुन्हा रंगभूमीवर परततील असे वाटले होते. पण नियतीला ते मंजूर नव्हते! त्यांच्या जाण्यामुळे एक मिश्किल, हसतमुख, हरहुन्नरी, दिलखुलास आणि कसदार अभिनयशैली असणारा उमदा कलावंत आपण गमावला आहे.
साधारणतः कलाकारांचा प्रवास हा अगोदर नाटक, मग टीव्ही मालिका आणि नंतर चित्रपट असा होतो. पण अतुल यांना अभिनय करण्याची पहिली संधी मिळाली ती टीव्हीसाठी. 70 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणार्‍या ‘किलबिल’ या कार्यक्रमातून ते टीव्हीवर झळकले. इयत्ता पाचवीत असताना व्ही. शांताराम यांच्या निर्मितीसंस्थेकडून ‘राजा रानी को चाहिए पसीना’ या सिनेमाची निर्मिती होत होती. सुलभा देशपांडे या सिनेमाच्या दिग्दर्शिका होत्या. दादरच्या छबिलदास शाळेत सिनेमासाठी ऑडीशन होतं. या सिनेमाच्या ऑडिशनमध्येही त्यांनी निवडही झाली आणि बालकलाकार म्हणून ते चंदेरी पडद्यावर झळकले. पुढे इयत्ता सातवीत असताना ‘बजरबट्टू’ या दोन अंकांच्या धमाल बालनाट्यात त्यांनी काम केलं. या बालनाट्याचे त्या वयात त्यांनी 100 प्रयोग केले. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘शेहजादा’ नाटकात विक्रम गोखले यांच्या सोबतीनं त्यांनी पहिलं पाऊल ठेवले. पुढे ‘टिळक आणि आगरकर’ सारखं महत्वाचं नाटकही त्यांनी केली. याखेरीज ‘वासूची सासू’, ‘टूरटूर’, ‘अफलातून’ ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रियतमा’, ’वा! गुरु’ यांसारख्या नाटकांमध्ये ते झळकले. कादंबरीकार जयवंत दळवी यांच्या ‘नातीगोती’तील परचुरेंनी साकारलेली बच्चू नावाच्या मतिमंद मुलाची व्यक्तिरेखा कमालीची गाजली. या भूमिकेनं मला नट म्हणून जितकं घडवलं आहे तितकंच मला एका ‘माणूस’ म्हणून घडवलं असं ते सांगत. या नाटकात त्यांना एकही पूर्ण वाक्य नव्हतं. परंतु मी संपूर्ण नाटक ते स्टेजवर असायचे.
अतुल परचुरेंनी साकारलेल्या व्यक्तिरेखा पाहिल्यास त्यामध्ये विनोदी धाटणीच्या भूमिकांची संख्या अधिक होती. विनोदी अभिनेत्याच्या साच्यात त्यांना बसवले गेले असले तरी त्यांचा विनोदही त्यांच्याप्रमाणेच सुसंस्कृतपणाच्या चौकटीतला होता. अंगविक्षेप करणे, वेडेवाकडे चाळे करणे अशा प्रकारच्या धाटणीत परचुरे कधी दिसले नाहीत. मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिकाविश्व अशा तिन्ही प्रांतात परचुरेंनी आपल्या नर्मविनोदी अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख मिळवली. विनोदी अभिनय प्रेक्षकांना भावण्यासाठी कलाकाराचे हावभावांचे, संवादफेकीचे टायमिंग अचूक असणे गरजेचे असते. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, दादा कोंडके यांसह अलीकडच्या काळातील सागर कारंडे, भरत गणेशपुरे, मकरंद अनासपुरे यांच्यासारख्या विनोदवीरांना मिळालेल्या लोकप्रियतेचे गमक त्यांच्या टायमिंगमध्ये होते. अतुल परचुरेंना हे टायमिंगचे गणित विलक्षण अवगत होते. त्यांच्या अनेक भूमिकांमध्ये संवादांपेक्षाही परचुरेंच्या निरागस चेहर्‍यावरील हावभाव पे्रक्षकांना हसवून जायचे.
कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या नाटकातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमधील त्यांची भूमिकाही सर्वांच्या लक्षात राहणारी होती. अलिबाबा आणि चाळीशीले चोर हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट होता. हिंदी चित्रपटांचा विचार करता ‘गोलमाल’, ‘बिल्लू बार्बर’ अशा चित्रपटांत असरानी, राजपाल यादव, अक्षय कुमार यांच्या गर्दीतही परचुरेंचा अभिनय लक्षवेधी ठरला. ‘द कपिल शर्मा’ शो या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. कपिल शर्माच्याच ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमात त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कॅन्सर काळातील आठवणी सांगितल्या होत्या. कलाकार म्हणून त्यांनी गाठलेल्या उंचीपेक्षाही त्यांचे व्यक्तिमत्व विचारसंपन्न आणि समृद्ध होते. सतत खेळकरपणाने, दिलखुलासपणाने आणि आपुलकीने सर्वांची चौकशी करणारा स्वभाव असल्याने मराठी सिनेसृष्टीत त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. कर्करोगाशी लढताना या मित्रपरिवाराने त्यांना मोलाची साथ दिली.
परचुरेंनी केलेल्या बर्‍याच भूमिका या काहीसा बावळटपणा दर्शवणार्‍या असल्या तरी वैयक्तिक आयुष्यात ते अत्यंत बुद्धीवान होते. अष्टपैलू अभिनेता म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते. त्याचबरोबर ते जिगरबाजही होते. त्यामुळेच कर्करोगाच्या राक्षसाला ते गाडतील असे वाटले होते. दुर्दैवाने तसे घडले नाही. -राजीव मुळ्ये, नाट्यलेखक-दिग्दर्शक

Check Also

तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *