लेख-समिक्षण

हट्ट नडला

आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आम्हीच सरकार स्थापन करणार, माझ्याकडे अमुक समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला आहे, पण मी सांगणार नाही, सत्तेत सहभागी होणार, आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढच्या निवडणुकीत आमचाच मुख्यमंत्री होणार, आता ताकद दाखवून द्या, सुपडा साफ झाला पाहिजे, ही गेल्या काही महिन्यांपासून सतत कानावर धडकणारी विधाने आहेत. अशी विधाने करणार्‍या नेत्यांचा मतदारांनी विधानसभेच्या या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकला आहे. उमेदवार निवडून आणण्याइतपत शक्ती नसलेल्या, पण प्रमुख उमेदवारांची समीकरणे बिघडवू शकणार्‍या पक्षांची नेहमीच चलती असते. महाराष्ट्रात गेल्या काही निवडणुकांपासून अशा तथाकथित किंगमेकर नेकर नेत्यांची संख्या वाढली आहे. विधानसभेच्या या निवडणुकीत मतदारांनी अशा किंगमेकरना शांतपणे बाजूला सारून भानावर येण्याचा सल्ला दिला आहे.
महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यामुळे या नेत्यांची बार्गेनिंग पॉवर शून्य झाली आहे. मतदारांच्या जिवावर अशा नेत्यांचे पीक फोफावले आहे. स्वतःचे उमेदवार उभे करण्याचा, त्यांना निवडून आणण्यासाठी निवडणूक लढवण्याचा हक्क प्रत्येक पक्षाला लोकशाहीने दिलेला आहे. मात्र असे किंगमेकर हे वेषांतर करून मैदानातच उतरत होते, उतरले होते; म्हणजे विकासकामांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार्‍या या नेत्यांचा हेतू लक्षात येत नसे. एकदा सत्ता द्या, मग अमुक करतो, तमुक करतो, सत्तेत सहभागी होणार आदी गर्जना या नेत्यांकडून केल्या गेल्या. आपल्या पक्षाचा एकही उमेदवार विजयी होण्याची शाश्वती नसताना नेत्यांकडून मोठी आश्वासने कशाच्या आधारावर दिली गेली होती, हा खरा प्रश्न आहे. आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढील निवडणुकीत आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, अशी गर्जना करणारा पक्ष एकही जागा जिंकू शकत नाही, याला काय म्हणावे?
अमुक समाजाला आरक्षण देण्यासाठीचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, मात्र मी तो सांगणार नाही, अशी अनेक विधाने गेल्या काही महिन्यांपासून लोकांच्या कानावर धडकत होती. अशी विधाने, गर्जना करून आपण किंगमेकर ठरणार, अशा थाटात वावरणार्‍या काही पक्षांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, अशी दर्पोक्ती करणार्‍या पक्षाच्या प्रमुखालाच मतदारांनी पराभवाची धूळ चारली आहे. बहुतांश राजकीय पक्ष, नेत्यांचा कल ध्रुवीकरणाकडे झुकू लागला आहे. निवडणूक होते, सत्तेचे राजकारण होते, मात्र समाजातील वातावरण कलुषित होत आहे. अशा परिस्थितीत तथाकथित किंगमेकरचीही भर पडली आहे. नसलेल्या बळावर कोणाला तरी धडा शिकवण्याची भाषा करणार्‍यांना मतदारांनी बाजूला सारले आहे. यापासून हे किंगमेकर धडा घेणार का, हा खरा प्रश्न आहे.– प्रकाश जाधव

Check Also

खेळू नका!

खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्‍याचदा यामागे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *