सिनेमा आणि संस्कृती या दोन गोष्टींचा प्रवास अगदीच हातात हात घालून नाही, पण एकमेकांना समांतर असा नक्कीच चालू असतो. समाज आणि संस्कृतीमधे या सर्व कालावधीत जी काही स्थित्यंतरे झाली त्याचं प्रतिबिंब नंतरच्या काळात आलेल्या सर्व चित्रपटांमधे अगदी जसंच्या तसं नसेल उतरलं तरी पण निदान रुढी, परंपरा, चालीरिती, रिवाज, फॅशन्स या सार्यांचं काळाच्या ओघात बदलत जाणारं रुप चित्रपटांमधून नक्कीच जाणवेल असं उमटत गेलं. हिंदी चित्रपटांच्या उदयापासून आतापर्यंतचा काळ पाहिला तरी गीतकारांनी हिंदी, उर्दु, पंजाबीशिवाय अनेक भाषा, बोली भाषेतील शब्दांचा वापर केला आहे. शिवाय लोकगीत आणि स्थानिक संगीताची नक्कल करत त्यात थोडेफार बदल करत प्रयोग केले आहेत.
————
भारतीय समाज एकसाची, एकरंगी कधीच नव्हता. अनेक धर्म आणि त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती सातत्याने या समाजात झिरपत राहिल्या. या संस्कृतींचे थर एकमेकांवर रचले गेले आणि त्यातून आजचा समाज घडत गेला. भारतीय संस्कृतींचे हे अनेक स्तर अभ्यासण्याची संधी सहज मिळू शकते ती फक्त हिंदी सिनेमांमधून. हिंदी सिनेमाच्या माध्यमातून भारतातल्या सर्व संस्कृतींमधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचं फार महत्वाचं दस्तावेजीकरण झालं आहे. हे वैशिष्ट्य फक्त भारतीय समाजाचे आणि भारतीय सिनेमांचेच.गझल, कव्वाल्या, मुशायरे, पर्दा, निकाह, तेहजिब, मुजरा, सुफी संगित हे आणि अशा तर्हेचे मुस्लिम संस्कृतिचे पडद्यावर वारंवार, गेली पन्नास दशकांहून जास्त काळ सातत्याने साकारले गेलेले घटक हिंदी सिनेमाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. तवायफ उमराव जानचा मुजरा आणि राजनर्तिका आम्रपालीचे नृत्य साकारणारा हिंदी सिनेमाच्या धमन्यांमधून वाहणारा संस्कृतीप्रवाह एकाच स्त्रोताशी नातं जोडणारा. मोगलेआझमच्या महालात बाळकृष्णाच्या पाळण्याला झोके देणार्या जोधाबाईच्या हाताला हात लावलेला अकबर आणि त्याच्या दरबारात मोहे पनघटपे गाणारी मधुबाला हिंदी सिनेमाचे प्रेक्षक असणार्या भारतीय समाजाला कधी वेगळे वाटूच शकले नाहीत.
त्या त्या दशकातले सिनेमे पाहिले की त्यावेळच्या एकंदर समाज मनोवृत्तीचे, त्यांच्या राहण्या, जेवण्या, रितीरिवाजांच्या, पेहरावाच्या संस्कृतीचे दर्शन घडते. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या धर्मांकडे बाकी समाजाची बघण्याची, बघण्याच्या बदलत गेलेल्या नजरियाची प्रक्रियाही निरखता येते. हिंदी सिनेमांचं हे सर्वात मोठं आणि देखणं वैशिष्ट्य की त्यात अनेक जिनसी संस्कृती एकजिनसीपणे सामावून जाऊ शकल्या. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी संस्कृती आपापल्या गुणवैशिष्ट्यांसह पडद्यावर साकारल्या. बॉलिवूडच्या प्रारंभापासूनच हिंदी चित्रपट गाण्यात विविध भाषेतील शब्दांचा, लोकगीतांचा आणि स्थानिक संगीताचा प्रयोग केला गेला आहे. आता प्रमाण कमी राहत असले तरी अनेक दशकांपूर्वी रचलेली गीते आजही प्रेक्षकांच्या मनाला रुंजी घालतात.
चित्रपट गीतांत केवळ कथेनुसार शब्दांचा वापर केला जात नाही तर या गीतांत अनेक अर्थही दडलेले असतात. कथानकाव्यतिरिक्त पार्श्वभूमीनुसार गीताची रचना केली जाते. हिंदी चित्रपटांच्या उदयापासून आतापर्यंतचा काळ पाहिला तरी गीतकारांनी हिंदी, उर्दु, पंजाबीशिवाय अनेक भाषा, बोली भाषेतील शब्दांचा वापर केला आहे. शिवाय लोकगीत आणि स्थानिक संगीताची नक्कल करत त्यात थोडेफार बदल करत प्रयोग केले आहेत. यात निर्मात्यांना यशही आले आहे.
लोकसंस्कृतीचे झलक दाखविणारी गीते
1981 मध्ये ‘लावारिस’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे वडिल हरिवंशराय बच्चन लिखित अवध लोकगीतापासून प्रेरणा घेत ‘मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है’ या गीताची रचना करण्यात आली. हे गीत प्रचंड गाजले आणि आजही लोकप्रिय आहे. यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’मध्ये ‘रंग बरसे भिगे चुनर वाली’ हे गाणे खूप गाजले. या गीताचे बोल, रचना आणि चित्रिकरणात लोकभाषा, लोकगीत अणि लोकरंगाचा चांगला प्रभाव दिसतो. आजही होळीच्या काळात हे सदाबहार गाणे वाजविले जाते.
ग्रामीण लोकसंस्कृतीची छाप
राजश्री प्रॉडक्शनचा ‘नदिया के पार’मध्ये पूर्वांचलमधील एक पारंपरिक ग्रामीण कुटुंबाचे कथानक आहे. या चित्रपटातील गीत ‘कौन दिसा मे लेक चला रे बटोहिया’, ‘जोगी जी धीरे धीरे’, ‘हमार भौजी’ हे गाणे तत्कालिन काळात लोकप्रिय ठरले. या चित्रपटातील सर्व गीत अवध अणि भोजपुरी गीतापासून प्रेरित होते. या चित्रपटातील गीतांत कोठे ना कोठे पूर्वांचलची संस्कृती आणि तेथील लोकगीतांचा गाभा दिसतो. राजकपूर यांचा चित्रपट ‘मेरा नाम जोकर’मधील गीत ‘अंग लग जा बलमा’ आणि ‘सावन भादो’मधील ‘कान मे झुमका चाल मे ठुमका’ या गीतात ग्रामीण भागातील बाज जाणवतो. नितीन बोस यांचा चित्रपट ‘गंगा जमुना’च्या गीतांवर उत्तर प्रदेश, बिहार बोली भाषेचा विशेषत: अवध, भोजपुरी आणि ब्रजची छाप जाणवते. ‘नैन लडि जइहै तो मनवा मे’, ‘ना मानू ना मानू ना मानू रे’, ‘ढूंढो ढूंढो रे साजना’, ‘दो हंसो का जोडा’, ‘तोरा मन बडा पापी’ यासारख्या गीतांचा अभ्यास केला तर त्यावर लोक संस्कृतीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.
अशा गीतांची लांबलचक यादी: लोकरंगात न्हाऊन निघालेल्या गीतांची लांबलचक यादी आहे. ‘बहारो के सपने’ चित्रपटातील ‘आजा पिया तोहे प्यार दूं’, ‘चुनरी संभाल गोरी उडी चली जाए’ या गीतात ब्रज लोकगीताचा प्रभाव जाणवतो. ‘मिलन’च्या चित्रपटातील गीतात ‘सावन का महीना पवन करे सोर’मध्ये ग्रामीण भागातील जीवन अणि तेथील साधेपणा अनुभवास येऊ शकतो. ‘पडोसन’ चित्रपटातील ‘इक चतुर नार’ तसेच ‘मेरे भोले बलम’ या गीतात लोक संस्कृतीची प्रचिती येते. ‘सरस्वतीचंद्र’मधील ‘मै तो भूल चली बाबुल का देस’ आणि ‘अनोखी रात’ मधील ‘ओह रे ताल मिले नदी के जल मे’ या गीतात तर लोकजीवनची झलक दिसते. राजकुमार आणि प्रिया राजवंश यांच्या ‘हीर रांझा’च्या गाण्यातील ‘तेर कुचे मे तेरा दीवाना’, ‘डोली चढके’, ‘नाचे अंग वे’ गीतात पंजाबच्या मातीचा गंध दरवळतो.
फारशी शब्दांचा वापर:
केवळ भारतीय भाषा, बोलीभाषाच नाही तर हिंदी चित्रपटांत अन्य भाषेचे देखील प्रयोग करण्यात आले आहेत. जे.पी. दत्ताचा ‘गुलामी’ चित्रपटातील गुलजार लिखित ‘जिहाल ए मिस्किन मुकन बरंजिश बेहाल, हिजरा बेचारा दिल है’ यात फारशी शब्दांचा अचूक वापर केला आहे. गीताच्या अगोदरचा मुखडा ‘जिहाल मिस्की’ हा शब्द पहिले कवी अमीर खुसरो यांच्या रचनेतून घेतला आहे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे जे ऐकायला श्रवणीय वाटते ते गाणे चांगले, मग ते कोणत्याही भाषेचे, बोली भाषेचे आणि संस्कृतीचे का असेना. त्याची झलक आपल्याला नेहमीच चित्रपट गीतांत दिसून येते.- सोनम परब
Check Also
लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …