‘गॉड ऑफ केऑस’ शब्द ऐकल्यावर त्यातल्या त्यात बरं वाटलं. ‘केऑस’ या शब्दाला मराठीत अनागोंदी, अंदाधुंदी, सावळा गोंधळ, बजबजबुरी असे अनेक प्रतिशब्द आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, असं वातावरण. अशा स्थितीचं प्रतिनिधित्व करणारी एक देवता इजिप्शियन संस्कृतीत आहे आणि ग्रीक भाषेत तिला ‘अपेप’ किंवा ‘अपेपी’ म्हणतात, ही माहिती सध्या मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण प्रमुख राजकीय पक्षांची संख्या चारवरून सहावर गेल्यापासूनच ‘केऑस’ हा मराठी माणसाचा हक्काचा सोबती झालाय. त्यातच लहानमोठ्या ‘आवाजी’ पक्षही जेव्हा शड्डू ठोकू लागतात, तेव्हा निवडणूकपूर्व सर्वेक्षणं करणार्या कंपन्यांचीसुद्धा भयंकर कोंडी होते. उलटसुलट सर्वेक्षणं येऊ लागल्यापासून मराठी माणसाला ऐन उत्सवी वातावरणात अन्न गोड लागेनासं झालंय. पक्षांतराची साथ पुन्हा सुरू झालीये. कोण, कधी, कुठून, कुठे जाणार आणि त्याचा परिणाम काय होणार, याची गणितं मांडून भलेभले राजकीय पंडित बुचकळ्यात पडलेत. पडद्यामागच्या हालचालींचा अंदाज घेता-घेता त्यांच्या मेंदूच्या क्षमतेवर पडदा पडायची वेळ आलीये. अशा वेळी खरंच ‘गॉड ऑफ केऑस’ अवतरावा आणि त्याने हा गुंता सोडवून सगळं ठीकठाक करावं अशी सार्वत्रिक धारणा आहे. परंतु प्राप्त माहितीनुसार, जो ‘गॉड ऑफ केऑस’ येतोय, तो डोक्यातला गुंता संपवणारा नसून वाढवणारा आहे. आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर घोंगावणार्या एका संकटाला हे नाव दिलं गेलंय.
आयुष्य किती क्षणभंगुर आणि आपण पळत्याच्या पाठी किती लागतो, हे अशी संकटं समोर आल्यावर समजतं. सत्तेसाठी पाठशिवणीचा जो खेळ चाललाय, तो तर फारच बालिश वाटतो. अवकाशातला एखादा लघुग्रह येऊन पृथ्वीला धडकणार आणि आपण सगळेच नष्ट होणार, असं समजल्यावर आपली औकात समजते. भले ही घटना घडो वा न घडो… पण अशाच एका घटनेमुळं डायनॉसॉर या पृथ्वीवरून गायब झाले होते. ‘गॉड ऑफ केऑस’ अर्थात ‘अपेफिस’ नावाचा लघुग्रह 2029 च्या सुमारास पृथ्वीच्या अगदी जवळून म्हणजे 20 हजार मैलांवरून जाणारंय. आपण भूस्थिरकक्षेत सोडलेले अनेक उपग्रह त्यापेक्षा अधिक अंतरावर आहेत. यावेळी तो आपल्याला भीती दाखवून निघूनही जाईल; पण 2036 मध्ये तो पुन्हा पृथ्वीच्या जवळ येईल. 2029 मध्ये तो पृथ्वीला धडकण्याची शक्यता 2.7 टक्के एवढीच आहे; पण 2036 मध्ये ही शक्यता 72 टक्के आहे, असं सांगितलं जातंय. सुमारे 370 मीटर व्यासाचा हा लघुग्रह असून, तो पृथ्वीवर आदळलाच तर आपले सगळे खटाटोप एका क्षणात मातीमोल ठरून आपण सारे अनंतात विलीन होऊ शकतो.
पृथ्वीचा नाश होईल, असा इशारा देणारी अनेक संकटं आजवर जवळ येऊन टळली आहेत. परंतु काही संकटं पृथ्वीला झेलावी लागलीयेत. सैबेरियात 1908 मध्ये असाच एक लघुग्रह येऊन आदळला होता. त्यामुळं झालेल्या हवाई स्फोटात सुमारे 2200 क्षेत्रातलं जंगल क्षणार्धात जळून खाक झालं होतं. सुमारे 8 कोटी झाडं जळून गेली होती. त्यामुळं ‘अपेफिस’चं संकट अगदीच दुर्लक्ष करण्याजोगं नाही, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आपण मात्र अमरपट्टा घेऊन आल्याप्रमाणं छोट्या-छोट्या गोष्टींचा पाठलाग करत असतो.
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …