सर्वसामान्य व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि इच्छाशक्तीच्या बळावर असामान्य बनू शकतो, हे चेन्नईच्या जे हजा फुन्यामिन यांनी दाखवून दिले आहे. तसे पाहिले तर सर्वच क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या व्यक्तींने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यशाची शिखरे गाठलेली असतात. मग ते बॉलिवूडचे बेताज बादशाह अमिताभ बच्चन असो की सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. जे हजा फुन्यामिन यांनी चेन्नईच्या रस्त्यावरून सामोसे विकत आज आलिशान वातानुकुलीत ऑफिसपर्यंत धडक मारली. जे हजा यांच्या सामोसाने केवळ चेन्नईकरांना वेड लावले नाही तर विमानात फिरणार्या उच्चभ्रू मंडळींनाही ते कुरकुरीत सामोसे खावेसे वाटतात.
पुडूपेठ येथे सामोसासारख्या खुशखुशीत पदार्थाची विक्री करत आता पंचतारांकित हॉटलपासून विमानातील केटरिंगपर्यंत मजल मारणारे चेन्नईचे जे हजा फुन्यामिन यांच्या जिद्दीची कहाणी कौतुकास्पद आहे. चेन्नईच्या रस्त्यावरील सामोसे विकणारा फेरीवाला ते काहीकोटींची उलाढाल असणार्या कंपनीचा मालक अशी वाटचाल करणारे जे हजा हे आज बडे उद्योगपती मानले जातात.
हफा फुडस अँड फ्रोजन फुडसचे मालक असणार्या हजा यांची सहावीला असतानाच शाळा सुटली. लहानपणापासूनच ते चेन्नईच्या रस्त्यावर सामोसा विक्री करू लागले. सामोसाची कहानी 1990 च्या दशकात सुरू झाली. हजा यांची आई घरी मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार करत असे. शाळा सुटल्यानंतर हजा आणि त्यांचे मोठे बंधू हे कांद्याचे सामोसे पुडुपेठ येथील चहाच्या गाड्यावर विकायचे. त्यावेळी एक सामोसा 25 पैशाला होता. एकावेळी त्यांचे 300 सामोसे विकले जात होते. हजा यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने या व्यवसायात मदत केली. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2006 मध्ये हजा यांना एक फोन आला आणि तो फोन त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. एका कंपनीने त्यांना दररोज पाच हजार सामोसे देण्याची ऑफर दिली. आज ते एक यशस्वी उद्योजक मानले जातात. हफा फुडसचे रेडिमेड पदार्थ किंवा रेडी टू कूक हे पदार्थ कमालीचे लोकप्रिय ठरले. सामोसाप्रमाणेच पॅटिस, कटलेट यासारखे फास्टफूड तयार करून त्यांनी ग्राहकांना अवीट चवीचा आनंद दिला. उच्च वर्गातील ग्राहकांसाठी तयार केलेल्या रेडी टू स्नॅक्स पदार्थांनाही मागणी येऊ लागली. कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रत्येक वर्गातील ग्राहक त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी ठरले. चेन्नईच्या उत्तरेला असलेल्या रेड हिल्स येथे त्यांचा कारखाना असून त्याठिकाणाहून ते कंपनीवर देखरेख ठेवतात.
गुणवत्ता आणि मेहनतीच्या जोरावर समोसे विकणारा व्यक्तीही यशाचे शिखर गाठू शकतो हे वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …