लेख-समिक्षण

विनेश फोगट, पुनिया निवडणूक आखाड्यात उतरणार

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिलेली कुस्तीगीर विनेश फोगट आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. ते काँग्रेसच्या तिकिटावर हरयाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघांनीही बुधवारी सकाळी संसदेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांनी नंतर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशीही चर्चा केली. मात्र दोघांनीही चरखी दादरी व बादलीसह जे मतदारसंघ मागितले आहेत, तेथून त्यांना तिकिटे देणे अशक्य असल्याने काँग्रेसने त्यांना पर्यायी मतदारसंघ सुचविले आहेत.
हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने सोमवारी उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी बैठक बोलावली होती. दुसरीकडे आम आदमी पक्षाबरोबरच्या युतीलाही राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे. या वातावरणातच विनेश व पुनिया यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याने त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, पुनिया याला काँग्रेस पक्षसंघटनेतील एखादे महत्त्वाचे पद देण्याबाबतही चर्चा झाली. राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर दौर्‍यावर जाण्यापूर्वी या दोघांबरोबरचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
हरयाणात खेळाडूंना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची परंपरा जुनी आहे. सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत तीन खेळाडूंनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आपले राजकीय नशीब आजमावले होते. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते कुस्तीगीर बबिता फफोगट आणि योगेश्वर दत्त, तसेच हॉकीपटू संदीप सिंग यांचा समावेश होता. मात्र तिघांपैकी केवळ संदीप सिंग हेच विजयी झाले होते. सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून काँग्रेसचे उमेदवार असलेले माजी बॉक्सर बिजेंद्र सिंह यांचाही त्या वेळी पराभव झाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपतफर्फे बिजेंद्र सिंह यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. या खेळाडूंशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष रणवीरसिंह महेंद्र यांनीही सन 2019मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून चरखी दादरी जिल्ह्यातील बधरा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनाही जननायक जनता पक्षाच्या उमेदवार नयना चौटाला यांनी पराभूत केले होते.
भाजपने हरयाणाच्या 90 सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे लाडवा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तसेच पक्षात नुकत्याच सहभागी झालेल्या अनेकांना या यादीत स्थान मिळाले आहे. हरयाणा भाजपचे माजी अध्यक्ष ओम प्रकाश धनखड यांना बादली येथून, पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल विज यांना अंबाला कँट येथून उमेदवारी देण्यात आली. भाजपमध्ये नुकतेच सहभागी झालेले देवेंद्र सिंह बबली, संजय कबलाना आणि श्रुती चौधरी हे अनुक्रमे टोहाना, बेरी आणि तोशाम येथून निवडणूक लढवणार आहेत.

Check Also

राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष

परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *