दहा ऑक्टोबर हा जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा एक विशेष दिवस आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे, तो ज्यांच्यासाठी साजरा केला जातो त्यातील बहुसंख्यांना त्याची कल्पनाच नसते आणि तो साजरा करणं आपल्यासाठीही आवश्यक आहे, याची कल्पना इतररांना नसते. 1992 पासून साजरा केला जाणारा हा दिवस म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिन. शरीराप्रमाणं मन हा डोळ्यांना न दिसणारा अवयव आजारी पडू शकतो, याची आपल्याला माहितीही नसते. अनेकांना आपलं मनःस्वास्थ्य बिघडलंय, याची जाणीवच होत नाही. स्पर्धा, धावाधाव, टार्गेट्स, ताणतणाव, अपेक्षाभंग आणि अनेकांच्या वाट्याला येणारा उपमर्द अशा प्रकारे चहूबाजूंनी मानसिक आजार आपल्यावर आक्रमण करत असतात. परंतु आपल्याला काहीतरी होतंय, या जाणिवेचं त्याच पायरीवर दमन केलं जातं. कधीकधी आपल्याला ते समजतसुद्धा नाही. समजलंच तर कुणाला सांगायची हिंमत होत नाही. जवळच्या मित्राला, मैत्रिणीला सांगणंही कमीपणाचं वाटतं. कारण ‘मनोरुग्ण म्हणजे वेडा’ हे समीकरण आपल्या मेंदूत घट्ट बसलेलं असतं आणि अशा व्यक्तींचं नाटका-सिनेमातून केलं जाणारं उथळ चित्रण पाहून या अवस्थेची टर उडवण्याकडेच अधिक कल असतो. अशा व्यक्तींचा समावेश ‘मनोरुग्ण’ या एकाच संवर्गात केला जात असला, तरी मानसिक आजारांचे असंख्य प्रकार आहेत आणि त्याची तीव्रताही कमी-जास्त असू शकते. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील एका गावातलं ताजं उदाहरण समोर आहे.
एकवीस वर्षांच्या एका युवतीवर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली. पोट दुखतंय, उलट्या होतायत, घनपदार्थ पोटात जात नाहीत, तरल पदार्थही बाहेर पडतायत, अशा तक्रारी होत्या. पोटाचा सीटी स्कॅन केल्यावर सगळेच हादरले. त्या युवतीच्या अन्नमार्गात सर्वत्र केसच केस दिसून आले. शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तिचं जठर आणि आतड्यांपर्यंत विखुरलेले तब्बल दोन किलो केस बाहेर काढले. पण मुळात केस पोटात गेलेच कसे? या प्रश्नाचं उत्तर भयावह आहे. त्या युवतीनं स्वतःचे केस उपटून खाल्ले होते. हा अतिशय विचित्र विकार तिला सोळा वर्षांपूर्वी, म्हणजे ती पाच वर्षांची असताना जडला होता. ‘ट्रायकोफेजिया’ असं या आजाराचं नाव. हा विकार झालेल्या व्यक्तीला आपलेच केस खाण्याची सवय जडते. ऐकूनच मळमळायला होतं; पण ते वास्तव आहे. पोटात आढळलेल्या गाठीवरून तिला ‘ट्रायकोफेजिया’ झाल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर तिचं अनेकदा समुपदेशन केलं गेलं. बर्याच प्रयत्नांनंतर तिने मान्य केलं, की वयाच्या पाचव्या वर्षीच ती स्वतःचे केस खाऊ लागली होती. बरेच दिवस घेतलेली वेदनाशामक औषधं परिणामशून्य ठरल्यानंतरच खरा आजार उघड झाला.
‘ट्रायकोफेजिया’सारखे अनेक मानसिक आजार दुर्लक्षित आहेत. ‘ट्रायकोफेजिया’ हा सामान्यतः एकटेपण आलेल्या मुलांना जडणारा आजार आहे. तणावात मुलं स्वतःचे केस उपटू लागतात आणि तणाव मर्यादेबाहेर गेल्यास केस खाऊही लागतात. संबंधित मुलगी अभ्यासात हुशार होती आणि ती केस खाताना कुटुंबीयांना कधी दिसलीच नाही. एकटेपण, घबराट, बेचैनी, असह्य तणाव आणि मग असा एखादा आजार… हे आजकाल कधीही, कुणालाही होऊ शकतंं. आपल्याला मनोविकार कधी होणारच नाही ही अंधश्रद्धा… कुठल्याही घराचा दरवाजा तो कधीही ठोठावू शकतो.
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …