लेख-समिक्षण

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवले. यामध्ये शोमन राज कपूर यांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा आणि दूरदृष्टीचा, संवेदनशीलतेचा ठसा उमटवणार्‍या राज यांच्या चित्रपटांनी रसिकांचे केवळ मनोरंजन केले नाही, तर त्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडले. आपल्या विलक्षण अभिनयक्षमतेनं आणि उत्कट हावभावांनी या महान कलाकरानं वस्तुपाठ घालून दिला.
शोमन राज कपूर म्हणजे भारतीय सिनेसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न. निळ्याशार डोळ्यांचा, विलक्षण प्रतिभा असणारा, दूरदृष्टी असणारा, संवेदनशील आणि अफाट अभिनयक्षमता, निर्मिती-दिग्दर्शनाचे कौशल्य असणारा जगावेगळा कलावंत. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेते, चित्रपट निर्माते असणार्‍या राज कपूर यांनी आपल्या अभिनय कौशल्याने सर्व रसिक प्रेक्षकांना केवळ प्रभावितच केले नाही तर अंतर्मुखही केले आणि स्वप्नांच्या नव्या दुनियेची सफरही घडवून आणली. सिनेसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. यंदाचं वर्ष हे या शोमनच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. अलीकडेच इफ्फी 2024 च्या निमित्ताने राज कपूर यांचा नातू रणबीर याने आपल्या मुलाखतीत लाडक्या दादूंविषयी बोलताना अतिशय मार्मिक विवेचन केले. तो म्हणाला, राज कपूर यांचे चित्रपट सामाजिक समस्यांंवर भाष्य करणारे होेते तसेच सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करणारेही ! ‘आवारा’मध्ये जातीवादाचा मुद्दा मांडला गेला; तर ‘श्री 420’ मध्ये त्यांनी वंचितांच्या संघर्षावर लक्ष केंद्रित केले. ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये स्रीच्या व्यक्तिमत्वाच्या शुद्धतेचे आणि पवित्रतेचे दर्शन त्यांनी घडवले होते. 50 वर्षांपूर्वी बनलेल्या चित्रपटांमध्येही, राज कपूर यांनी जे कथानक मांडले ते आजच्या पिढीलाही प्रेरित करणारे आहे, तसेच वर्तमान समस्यांशी निगडीत आहे.
रणबीरने व्यक्त केलेले मनोगत अतिशय समर्पक आहे. राज कपूर यांनी आपल्या शानदार कारकिर्दीत ‘बरसात’, ‘श्री 420’, ‘संगम’, आवारा यांसारख्या एकाहून एक सरस चित्रपटांमधून त्यांनी बॉलिवूडपटांना खर्‍या अर्थाने सिनेमॅटिक चमक दिली. 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
राजसाहेबांवर चार्लीन चॅप्लीचा विलक्षण प्रभाव होता. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनयामध्ये चेहर्‍यावरील हावभाव किती महत्त्वाचे असतात आणि त्यांच्या आधारे किती सार्थपणाने भावना व्यक्त करता येतात याचा वस्तुपाठच जणू राज कपूर यांनी घालून दिला. ‘मेरा नाम जोकर’ सारख्या चित्रपटातील त्यांची भूमिका असेल किंवा ‘आवारा’मधील त्यांचा अभिनय असेल; प्रत्येक प्रसंगातील उत्कटता त्यांनी तितक्याच ताकदीने आपल्या हावभावातून मांडत प्रेक्षकांची मने जिंकली. ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं पाहताना त्या व्यक्तिरेखेच्या मनातलेे भाव, त्याला झालेलं प्रेमभंगाचं दुःख, फसवलं गेल्याची भावना हे सारे मनपटलावरील तरंग त्यांनी अप्रतिमपणाने सादर केले.
1930 च्या दशकात बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये आपला प्रवास सुरू केला. पृथ्वीराज कपूर आणि रामसरणी देवी कपूर यांच्या सहा मुलांमध्ये राज हे सर्वांत थोरले. 1935 मध्ये आलेल्या ‘इन्कलाब’ या हिंदी चित्रपटात ते पहिल्यांदा दिसले. त्यावेळी त्यांचे वय अवघे दहा वर्षेहोते. 1949 मध्ये आलेल्या ‘नील कमल’ मध्ये मधुबालासोबत मुख्य भूमिकेत झळकल्यानंतर त्यांना मोठा ब्रेक मिळाला. यानंतर मेहबूब खानच्या ‘अंदाज’ चित्रपटामध्ये दिलीप कुमार आणि नर्गिससोबत काम केले. अभिनेता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांना पहिले यश ‘बरसात’ आणखी एका मोठ्या ब्लॉकबस्टरमध्ये मिळाले.
1970 मध्य आलेल्या ‘मेरा नाम जोकर’ ची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्हींची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी सहा वर्षांहून अधिक काळ लागला. त्यांचा मुलगा ऋषी कपूर याने या चित्रपटात त्यांच्या पात्राची तरुण आवृत्ती साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आरके स्टुडिओचा ‘मेरा नाम जोकर’ 244 मिनिटांचा होता. दोन इंटरव्हल्सचा हा पहिलाच चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला असला तरी, नंतर तो भारतीय चित्रपटसृष्टीद्वारे निर्मित सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक बनला. आजही रसिक प्रेक्षकांच्या तो स्मरणात आहे. राज कपूर यांनी अनेक तंत्रज्ञांसोबत काम केल्यानंतर वयाच्या 24 व्या वर्षी 1948 मध्ये आरके स्टुडिओची स्थापना केली.
अनेकांना कदाचित माहीत नसेल, पण राज कपूर यांचे खरे नाव रणबीर राज कपूर असे होते. किदार शर्मा दिग्दर्शित ‘विष्कन्या’च्या सेटवर क्लॅप-बॉय म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली. आवारा हा तीन पिढ्यांना कास्ट करणारा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात कपूरांच्या तीन पिढ्या – दिवाण बशेश्वरनाथ (राज कपूरचे आजोबा), पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर झळकले. पुढील काळात रणधीर कपूरने ‘आज और कल’मध्ये त्याची पुनरावृत्ती केली.
राज कपूर हे केवळ अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्मातेच नव्हते तर त्या काळात सिनेमाच्या भविष्याचा वेध घेणारे महान कलावंत होते. राज कपूर यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, हा अभिनेता कधीही बेडवर झोपला नाही. त्याला जमिनीवर झोपायला आवडायचं. हॉटेलमध्ये राहूनही तो जमिनीवर झोपायचा. यासाठी त्याला एकदा हॉटेल व्यवस्थापकाने ताकीद दिली होती आणि तसे न करण्यास मनाई केली होती. ती न ऐकल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापकाने त्याच्यावर दंडही ठोठावला आणि त्याच्या सवयीमुळे तो पाच दिवस दंड भरत राहिला.
आणखी एक किस्सा सांगितला जातो. राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा हे दोघे दादा बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’च्या प्रीमियममध्ये पोहोचले होते. चित्रपट सुरू झाला आणि राज प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. चित्रपट संपल्यानंतर ते घरी परतताना पूर्ण शांत होते. घरी आल्यानंतरही त्यांची अस्वस्थता दूर झाली नाही. जेव्हा कृष्णा कपूरने कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राजसाहेब अश्रूभरल्या डोळ्यांनी म्हणाले की, कृष्णा, मी कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवत आहे? ज्यात फक्त नायिकेच्याभोवती नृत्य आहे. आपण काल पाहिला तो खरा सिनेमा ! जो चित्रपट समाजाला नवी दिशा देतो, समाजाचे वास्तव मांडतो तो खरा चित्रपट. असे चित्रपट बनवल्याशिवाय मला शांती मिळणार नाही. व्लादिमीर वायसोत्स्की यांच्या रशियन गाण्यात राज कपूर यांचे वर्णन भारतीय संस्कृतीचे सर्वात प्रसिद्ध प्रतीक म्हणून केले गेले आहे. सिनेमा हा समाजाचा आरसा असतो, असं म्हणतात. राजसाहेबांच्या चित्रपटांनी ही बाब सिद्ध केली.
राज कपूर यांचा संपूर्ण जीवनप्रवास पाहिल्यास हा कलाकार पूर्णतः सिनेमामय होता. ते सदैव सीन आणि कॅमेरा यांचा विचार करत असत. राज कपूर यांनी आपल्या आयुष्याच्या घटनांवर अनेक पटकथा लिहिल्या आणि चित्रपटासारखे ‘लार्जर दॅन लाइफ’ आयुष्यदेखील जगले. – मानवेंद्र उपाध्याय, सिनेसमीक्षक

Check Also

मलायका पुन्हा प्रेमात?

अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *