लेख-समिक्षण

‘लापता लेडिज’ ऑस्कर मिळवेल?

चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या प्रत्येक कलाकारांचे ऑस्करची बाहुली मिळवण्याचे स्वप्न असते. कोडॅकच्या स्टुडिओत आयोजित भव्य दिव्य सोहळ्यात ‘ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकताना अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश असला तरी ऑस्कर पुरस्कार विजयाचे सुख फारसे पदरात पडलेले नाही. यावर्षी आमीरखान आणि किरण राव यांचा बहुचर्चित ‘लापता लेडीज’ चित्रपट भारताकडून ऑस्कर सोहळ्यासाठी पाठविला जाणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला गेला आहे. ‘ऑस्कर’मध्ये जय पराजय यांचे ठरलेले गणीत असते. ‘लापता लेडीज’च्या निमित्ताने भारतातील चांगल्या गोष्टी जगासमोर येतील. देशातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या चार गोष्टी ‘ऑस्कर’ निवड समितीच्या काळजाचा ठाव घेतील, ही सुखकारक बाब आहे
——————
चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या प्रत्येक कलाकारांचे ऑस्करची बाहुली मिळवण्याचे स्वप्न असते. कोडॅकच्या स्टुडिओत आयोजित भव्य दिव्य सोहळ्यात ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकताना अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश असला तरी ऑस्कर पुरस्कार विजयाचे सुख फारसे पदरात पडलेले नाही. वैयक्तिक पातळीवरच काही अंशी आनंद लाभला आहे. यावर्षी आमीरखान आणि किरण राव यांचा बहुचर्चित ‘लापता लेडीज’ चित्रपट भारताकडून ऑस्कर सोहळ्यासाठी पाठविला जाणार आहे. ‘लापता लेडीज’ हा बाहुलीवर मोहोर उमटवेल की नाही हे लवकरच समजेल. यासाठी आमीर खान आणि किरण राव यांना विशेष मेहनत घ्यावी लागेल.
जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार ऑस्कर सोहळ्यात ‘लापता लेडीज’ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने भारताकडून अधिकृतपणे या चित्रपटाला ‘ऑस्कर’ला पाठविणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयाचे स्वागत केले जात असताना दुसरा गट विरोधही करत आहे. अर्थात आमीर खान आणि किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ सर्वोत्तम चित्रपट असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. परंतु फेडरेशनने ज्या 29 भारतीय चित्रपटांची निवड केली, त्यात यापेक्षा अधिक सरस चित्रपट होते, असे काहींचे म्हणणे आहे. अर्थात भारताकडून ऑस्करला पाठविल्या जाणार्‍या चित्रपटांच्या निवडीबद्धल नेहमीच शंका निर्माण केली गेली आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या न्याय मंडळात एकही महिला नाही, तरीही एका महिलेने दिग्दर्शित केलेला, एका महिलेने लिहलेला आणि महिला केंद्रीत चित्रपटाची ऑस्करच्या परकी भाषेच्या श्रेणीसाठी अधिकृतरित्या निवड करणे ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. फिल्म फेडरेशनसमोर शेवटच्या फेरीत 29 चित्रपट होते. त्यात अ‍ॅनिमल, कल्की 2898, स्वातंत्र्य वीर सावरकर, आर्टिकल 370, गुड लक, सॅम बहादूर याच्यासह राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविलेला मल्याळम चित्रपट ओट्टम आणि कानमध्ये सन्मानित झालेला पायल कपाडियाचा ‘ऑल वो इमेजिन एज लाइट’ याचा समावेश होता. या चित्रपटांतून कोणाची निवड करावी असा प्रश्न उपस्थित राहणे स्वाभाविक आहे. शेवटी आसामी कलाकार जानू बरुआ यांच्या न्यायमंडळाने ‘लापता लेडीज’वर सहमती दर्शविली.
संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट निवडणे हे ज्युरीचे काम होते. प्रामुख्याने भारतीय चित्रपट हा सामाजिक व्यवस्था आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी असावा, असे गृहित धरले जाते. भारतीयत्व हा सर्वात मोठा मुद्दा असतो. लापता लेडीजने या बाबतीत आघाडी घेतली. पण ‘लापता लेडीज’मध्ये ऑस्कर जिंकण्याइतपत उजव्या बाजू आहेत का? यावरही चर्चा होत आहे. जगाच्या पाठीवर भारतीय सिनेमांचा बोलबाला होत असताना दुसरीकडे ऑस्कर जिंकणे सोडाच परंतु नामांकनही मिळत नसल्याचे पाहून सध्याच्या विरोधाला आणखीच बळ मिळते. जगातील सर्वात मोठी बॉलिवूड इंडस्ट्री असताना भारताची पिछेहाट ही निश्चितच क्लेषदायक आहे. मग भारताकडून चुकीचे चित्रपट पाठविले जात आहे का? किंवा भारतापेक्षा अन्य देशांचे चित्रपट सरस आहेत का ? हा देखील अभ्यासाचा विषय आहे. पण भारतात चांगले चित्रपट आणि निर्मात्यांचा अभाव नाही, परंतु निवडकर्त्यांचे निर्णय काहीवेळा चुकतात, हे तितकेच खरे.
आजघडीला जगभरातील कोणत्याही चित्रपट कलाकारांचे मूल्यांकन ऑस्कर सन्मानाने होते. म्हणूनच जगातील कलावंत ऑस्कर मिळवण्यासाठी धडपड करत असतात. भारताचे ऑस्कर सोहळ्याशी नाते जुनेच आहे. 1967 मध्ये भारताकडून ‘मदर इंडिया’ ऑस्करच्या 30 व्या सोहळ्यासाठी पाठविण्यात आला. भारताने ऑस्करच्या तिसाव्या सोहळ्यात सहभाग घेण्याचे कारण म्हणजे तोपर्यंत ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्तम परकी चित्रपट भाषा अशी श्रेणी नव्हती. तेव्हापासून आतापर्यंत भारताने ऑस्करला 57 चित्रपट पाठवले. परंतु एकदाही आपल्याला सर्वोत्तम चित्रपटाचा किताब मिळाला नाही. एवढेच नाही तर पुरस्कारासाठी भारताला केवळ तीनदा नामांकन मिळाले. मेहबूब खान यांचा मदर इंडिया, मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे (1988) आणि आशुतोष गोवारीकर-आमीरखानचा लगान (2001). ‘लगान’च्या नामांकनासाठी देखील आमीरखान आणि आशुतोष यांनी दोन महिने अमेरिकेत काढले आणि त्यांनी ऑस्करच्या न्यायाधीश मंडळांना चित्रपट दाखवत जोरदार दावा केला. आतापर्यंत ज्या भारतीयाला ऑस्करची बाहुलीचे भाग्य लाभले त्यात सत्यजित रे हे एकमेव निर्माते, दिग्दर्शक. त्यांच्या चित्रपटांना ऑस्कर मिळालेला नाही परंतु 1992 मध्ये जीवनगौरव श्रेणीत ऑस्कर देण्यात जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी 1983 मध्ये रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ चित्रपटातील सर्वोत्तम वेशभूषेसाठी भानू अथैया यांना ऑस्कर मिळाला. ऑस्करमध्ये भारताला 2009 मध्ये यश मिळाले. ‘स्लमडॉग मिल्येनिअर’चे गीत, संगीत आणि ध्वनी या श्रेणीत तीन भारतीयांना गुलजार, ए.आर. रेहमान आणि रसूल पुकुट्टी यांना ऑस्कर मिळाला. एक सर्वोत्तम लघुपट ‘द एलिफंट व्हिसपर्स’ला आणि दुसरे ‘आरआर्रआर’चे गीत ‘नाटू नाटू’ याच्यासाठी चंद्रबेस आणि एमएम किडवानी यांनी ऑस्करवर मोहोर उमटविली. या माध्यमातून प्रथमच मूळ भारतीय चित्रपटांना ऑस्कर मिळाल्याने या यशाचे महत्त्व आणखीच अधोरेखित होते.
सध्या लापता लेडीजचा विचार करू. आमीर खान आणि किरण राव यांचा हा उत्तम चित्रपट. दिग्दर्शन किरण राव यांनी केले. यात दोन नववधूंची सासरी जाताना अदलाबदल होते. या कहाणीच्या माध्यमातून महिलांच्या समस्या अणि स्वप्न हे चांगल्या रितीने मांडण्यात आले. चित्रपटात बेटी पढाव आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला गेला आहे. त्याचवेळी राजकारण, पोलिस ठाणे, शेतकर्‍यांच्या समस्या, ग्रामीण अर्थव्यवस्था अणि विविध चालीरिती यांचेही सादरीकरण करण्यात आले. जसे दिसते तसे नसते हे देखील दाखविले आहे. दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय, संगीत सर्वकाही चांगले आहे. लापता लेडीजमध्ये नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन आणि छाया कदम यांचा समावेश आहे. सर्वांचा अभिनय अतिशय उत्तम झाला आहे. रवी किशन यांचा पोलीस अधिकारी आणि छाया कदम यांचा अभिनय हा सर्वांनाच भावला आहे. तरीही हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रेक्षकांनीं आणि समीक्षकांनी त्याचे कौतुक करूनही तिकीटबारीवर फारसे यश मिळाले नाही. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर लापता लेडीजने छाप पाडली. प्रत्येकाने या चित्रपटाचे कौतुक केले. पटकथा स्नेहा देसाई यांनी लिहली असून त्यांनी लापता लेडीजच्या यशाबद्धल आनंद व्यक्त केला आहे. आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ऑस्करमध्ये अधिकृत प्रवेश मिळाल्याचे समजताच मला दोन मिनिटे विश्वासच बसला नाही. परंतु खरोखरच निवड झाली होती, असे देसाई म्हणतात. दिग्दर्शक किरण राव यांनी देखील आनंद व्यक्त करत म्हटले, हा बहुमान संपूर्ण टीमचा असून हे एकप्रकारे कष्टाचे फळ आहे. टीमने अथक परिश्रमातून जिद्दीने एका कथेला जीवंत केले आहे. चित्रपट हे नेहमीच संवाद प्रस्थापित करण्यासाठी, सीमेपलिकडे जाण्यासाठी आणि सकारात्मक भूमिका मांडण्यासाठी प्रेरित करणारे प्रभावी माध्यम राहिले आहे. जगभरातील प्रेक्षकांना लापता लेडीज पसंत पडेल, अशी आशा आहे. तूर्त ‘ऑस्कर’मध्ये जय पराजय यांचे ठरलेले गणीत असते. ‘लापता लेडीज’च्या निमित्ताने भारतातील चांगल्या गोष्टी जगासमोर येतील. देशातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या चार गोष्टी ‘ऑस्कर’ निवड समितीच्या काळजाचा ठाव घेतील, ही सुखकारक बाब आहे. – सुचित्रा दिवाकर

Check Also

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *