विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघांडीने 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेतून मविआकडून विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली. ज्यात 5 मोठ्या आश्वासनांचा समावेश आहे. यातील पहिले आश्वासन राहुल गांधी यांनी जाहीर केले.महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी योजनेला उत्तर शोधण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेत आरएसएसवरही हल्ला चढविला.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. त्याला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला महायुती सरकार महिलांना बस प्रवासात 50 टक्क्यांची सवलत देत आहे. त्यामुळे महिलांना एसटी प्रवास करताना अर्धे तिकीट लागते. पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिलांना, मुलींना मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे.
शेतकर्यांसाठी महाविकास आघाडीने महत्त्वाची घोषणा केली आहे. मविआ सत्तेत आल्यास शेतकर्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेडीसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांपर्यंतची मदत करण्यात येणार आहे. राज्यात सरकार आल्यास जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवणार अशी घोषणा राहुल गांधींनी केली. कुटुंब रक्षण योजनेत 25 लाखांपर्यंत विमा देण्याची घोषणादेखील महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. महालक्ष्मी योजनेची घोषणा करताना राहुल गांधींनी महायुती सरकारवर तोफ डागली. राज्य सरकार अदानींसाठी काम करत आहे. महागाई, कराच्या स्वरुपात लोकांची अक्षरश: लूट सुरु आहे. त्या लुटीचा मोठा फटका सामान्यांना बसला आहे. त्यामुळेच त्यांना प्रवासात पूर्ण सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. सामान्य कुटुंबाच्या खिशावर 90 हजारांचा डल्ला मारला जात आहे. त्या बदल्यात महिलांना केवळ दीड हजार रुपये दिले जात आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी भाजप, आरएसएस यांच्यावर हल्ला चढवला. एका बाजूला इंडिया आघाडी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. तर दुसर्या बाजूला भाजप आणि आरएसएस आहे जे हे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट ते थेट बोलणार नाहीत. कारण त्याचे परिणाम भाजपला माहिती आहेत. त्यामुळेच ते छुप्या पद्धतीने संविधान कमकूवत करत आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशातील प्रत्येक व्यवस्थेत आज ते एक विशिष्ट विचारसरणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील कुलगुरूंची यादी काढा. गुणवत्तेच्या आधारावर नाही तर आरएसएसशी संबंधित हा एकमेव निकष लावला जातोय. निवडणूक आयोगावर दबाव टाकला जातो. ईडी, आयकर विभाग यांचा वापर करून सरकार पाडले जाते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पैसे देऊन आणि चोरी करून पाडण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. हे फक्त 3-4 अब्जाधीशांची मदत करण्यासाठी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडीची सभा सुरू होण्याआधी व्यासपीठावर कलाकारांच्या एका संचाने विविध गाणी सादर केली. यामध्ये जयोस्तुते गाण्याचाही समावेश होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. उपस्थितांनी कान टवकारले. जयोस्तुते गाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कायम टीका करत असतात. सावरकर यांना ब्रिटिशांकडे पेन्शन मिळायची. त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, याचा उल्लेख ते सातत्याने करतात. त्यावरुन भारतीय जनता पक्षाचे सगळेच नेते त्यांना लक्ष्य करतात. राहुल गांधींच्या सावरकर यांच्या विरोधातील विधानांमुळे अनेकदा वाद उफाळून आला. भाजपने त्यांच्याविरोधात आंदोलने केली आहेत. विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे राहुल यांना अनेकदा न्यायालयाची पायरीदेखील चढावी लागलेली आहे.
Check Also
राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …