कारगिल युद्धाचे नायक म्हणून ओळखल्या जाणार्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी तमाम तरुणांसह देशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या कारगिल युद्धातील जवानांचा ते चेहरा बनले होते. कारगिलमधील लढाईच्या काही महिने आधी कॅप्टन विक्रम बत्रा पालमपूरमधील त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मित्रांना न्यूगल कॅफेमध्ये पार्टी दिली. तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, आता तू लष्करात आहेस. काळजी घे. त्यावर विक्रम म्हणाले, काही काळजी करू नकोस. एकतर मी विजयी होऊन तिरंगा फडकावत परत येईन किंवा त्याच तिरंगात गुंडाळलेल्या स्थितीत परत येईन. पण परत येईन एवढं नक्की. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा करिश्माच असा होता की, त्यांच्या संपर्कात आलेला कोणीही मनुष्य त्यांना विसरू शकायचा नाही. त्यांनी 5140 शिखरावर ताबा मिळवल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना ’ये दिल माँगे मोअर’ असं म्हटलं होतं. या उद्गारांनी त्यांनी संपूर्ण देशाची मनंही काबीज केली.
विक्रम बत्रा लहानपणापासूनच साहसी व निर्भीड होते. एकदा त्यांनी स्कूलबसमधून पडलेल्या मुलीचा जीव वाचवला होता. ती मुलगी बसच्या दरवाज्यापाशी उभी होती आणि दार आतल्या बाजूने नीट बंद नव्हतं. एका वळणावर दरवाजा अचानक उघडला आणि ती मुलगी रस्त्यावर पडली. विक्रमनी क्षणभरही विचार न करता चालत्या बसमधून खाली उडी टाकून त्या मुलीला गंभीर इजा होण्यापासून वाचवलं होतं. इतकंच नव्हे तर तो त्या मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. दूरदर्शन वाहिनीवरून 1985 साली प्रसारित होणार्या ‘परमवीर चक्र’ या मालिकेमुळे विक्रम यांच्या मनात भारतीय सैन्यामध्ये जायची तीव्र इच्छा निर्माण झाली. हाँगकाँगमधील एका शिपिंग कंपनीत मर्चन्ट नेव्हीमध्ये विक्रम यांची निवड झाली होती, पण त्यांनी सैन्यात जायचा मार्ग स्वीकारला. 1994 सालच्या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्ये एनसीसी कॅडेट म्हणून सहभागी झाल्यानंतर विक्रम यांनी सैन्यातील करिअरचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली. वास्तविक त्याची निवड मर्चन्ट नेव्हीमध्ये झाली होती. तो चेन्नईला ट्रेनिंगसाठी जाणार होता. त्याच्या ट्रेनचं तिकीटही काढून झालं होतं. पण तिकडे जायच्या तीन दिवस आधी त्याने विचार बदलला. असं का करतोय, असं त्याच्या आईने विचारलं. तेव्हा तो म्हणाला, की आयुष्यात फक्त पैसाच सर्वस्व नसतो. मला काहीतरी मोठं करायचंय, सर्वांना आश्चर्य वाटेल असं, माझ्या देशाचं नाव मोठं होईल असं काहीतरी करायचंय.
विक्रम बत्रा यांच्या साहसी आणि निर्भिडपणामुळेच भारत कारगिल युध्दात विजय मिळवू शकला हे खरे नाही काय?
Check Also
प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …