परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी परभणीत जाऊन सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सूर्यवंशीचा मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केला.
परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरूने विटंबना केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांकडून आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जाळपोळ आणि दगडफफेकीच्या घटना घडल्या, त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलकांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुणदेखील होता. मात्र त्यांचा कोठडीतच मृत्यू झाला. सोमनाथ यांचा कोठडीत मृत्यू झाल्याने वातावरण चांगलेच तापले, याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करत मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली आहे, असा गंभीर आरोप केला. खा.राहुल म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली, त्यांची हत्या झाली. मी सूर्यवंशी कुटुंबाला भेटलो. त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला, व्हिडीओ दाखवले. 99 टक्के नाही तर 100 टक्के पोलिसांनीच सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली. या तरुणाला केवळ यासाठी मारले की तो एक दलित तरुण आहे, आणि तो संविधानाचे रक्षण करत होता, असा आरोपही त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आरएसएसची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधारा आहे. ज्या लोकांनी हे केले आहे, त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. मी यावर समाधानी नाही, या लोकांना मारण्यात आलं, हत्या केली. हे राजकारण नाही, तर न्यायाची गोष्ट आहे. लवकरात लवकर कारवाई करावी. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा कोठडीत झालेला आहे. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली. मात्र, या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत खोटे बोलले. सोमनाथ सूर्यवंशी संविधानाचे रक्षण करत होता, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी हे समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांनी राजकीय स्वरूपाचे आरोप केले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कोणी दोषी असल्यास त्यांना सोडले जाणार नाही. कठोरात कठोर कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.
Check Also
एका पर्वाची अखेर
भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली …