लेख-समिक्षण

यशोगाथा जगज्जेत्याची

डी. गुकेश या तरुण, तडफदार बुद्धीबळपटूने जागतिक अजिंक्यपद मिळवण्याचा महाविक्रम नुकताच नोंदवला. यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. वर्ल्ड चॅम्पियन होणारा तो सर्वात युवा बुद्धीबळपटू ठरला आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ही जगज्जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. गुकेश हा मुळचा चेन्नईचा आहे. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून त्याने बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली आणि 11 वर्षांनंतर आज तो जगज्जेता बनला आहे. हे यश नव्या पिढीतील प्रत्येक मुलामुलींसाठी प्रेरणादायी आहे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडता…’ ही म्हण मराठी माध्यमातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून शिकवली जाते; पण त्याचे प्रत्यक्ष जीवनात अनुकरण करुन किती मोठी झेप घेता येते, याचा आदर्श म्हणून गुकेशच्या यशोगाथेकडे पहावे लागेल.
डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी जन्माला आल्यामुळे गुकेशसाठी भवतालची सर्व परिस्थिती अनुकूल होती असे अनेकांना वाटू शकते. परंतु गुकेशला इथपर्यंत आणण्यासाठी त्याच्या पालकांनाही खूप त्याग करावा लागला. त्याची बुद्धीबळातील गती आणि चमक लक्षात आल्यानंतर वडिलांना नोकरी सोडावी लागली. याचे कारण परदेशात होणार्‍या स्पर्धांमुळे त्यांना रुग्णांना वेळ देता येणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे त्यांनी आपले क्लिनिक बंद केले. पण याचा परिणाम त्यांचे उत्पन्न मर्यादित होण्यात झाला. पर्यायाने गुकेशच्या टूर्नामेंटचा आणि कुटुंबाचा खर्चाचा भार आई पद्मा यांच्यावर पडला. परदेशात स्पर्धा खेळण्यासाठीचा प्रचंड खर्च पेलण्यासाठी पैशांची गरज असताना गुकेशला प्रायोजक मिळत नव्हते. अशा परिस्थितीत अनेकवेळा त्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कर्जही घ्यावे लागले. युरोपमधील स्पर्धेदरम्यान पैसे वाचवण्यासाठी तो वडिलांसोबत विमानतळावर झोपला होता.
गुकेशने आज बुद्धीबळातील अनभिषिक्त जगज्जेता म्हणून आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहित आपल्या मातापित्यांनी केलेल्या त्यागाचे, कष्टाचे पांग फेडले आहे हे खरे नाही काय?

Check Also

प्रेरणादायी संघर्षगाथा

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *