मुले ही देवाघरची फुले तर असतातच; पण उद्याच्या भविष्याचे निर्मातेही असतात. त्यामुळेच मुलांच्या चांगल्या आरोग्यासोबतच त्यांचे संगोपनही चांगले होणे गरजेचे आहे. चांगल्या संगोपनातूनच मुले त्यांच्या जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात. मुलाला शिकवलेल्या चांगल्या सवयी त्याने अंगिकारल्या तरच चांगले पालकत्वही यशस्वी होते. मूल ऐकत नाही, असे न सांगणारी आई शोधून सापडायची नाही. याचे कारण हट्टीपणा करण्याचेच ते वय असते. अशा वेळी मुलांनी तुमचे ऐकण्यासाठी त्यांच्याशी थोडे मनमोकळेपणाने बोलणेदेखील महत्त्वाचे आहे. अनेक मुले मोकळेपणाने पालकांसोबत बोलतात. काहींना अजिबात बोलायला आवडत नाही. अशी मुले आई-वडिलांशी कमी बोलतात. हळूहळू शांत होऊ लागतात.
आपली मुले अशी का वागतात, याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. मुलांना वेळ देणे आवश्यक आहे. पालकांनी तसे केले नाही तर मुले हळूहळू त्यांच्यापासून दूर जाऊ लागतील. मुले दिवसभरात अनेक गोष्टी पाहतात, ज्या त्यांना आई-वडिलांना सांगायच्या असतात. त्यामुळे पालकांनी मुलांसाठी वेळ काढावा. त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्या समस्या ऐकण्याचा प्रयत्न करावा. मुले प्रत्येक गोष्टीत खूप उत्साही असतात. त्यांना जरा वेगळी वाटणारी कोणतीही गोष्ट दिसली की त्यांच्या मनात त्याच्याशी संबंधित प्रश्न निर्माण होतात. मग ती त्यांच्या पालकांकडून या प्रश्नांची उत्तरे विचारतात, परंतु पालक अनेकदा मुलांच्या प्रश्नांवर चिडतात आणि त्यांना रागाने उत्तरही देतात. अशा स्वभावाचा मुलावर वाईट परिणाम होतो आणि तो हळूहळू शांत होतो.
पालकांनी मुलाच्या प्रत्येक गोष्टीत व्यत्यय आणून त्याला फटकारले तर त्याचा स्वभाव पालकांसाठी नकारात्मक होऊ शकतो. अशी मुले त्यांच्या पालकांशी काहीही बोलण्यास किंवा काही सांगण्यास घाबरतात. प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी त्यांचे पालन करावे असे वाटते; परंतु मुलांना धमकावून त्यांना नियंत्रित करू शकता, असे तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. अशा मुलामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. पालकांच्या अशा वागण्यामुळे मुलांमध्ये चिडचिड होते. ती पालकांचे ऐकत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलांसाठी कोणताही निर्णय घेत असाल तर त्यांना एकदा विचारा. यामुळे त्यांचे तुमच्यासोबतचे नाते घट्ट होईल.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …