मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये आठ काव्यसंग्रह, तीन कादंबर्या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांना मान्यता देण्यात आली आहे. एक जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान, प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून ही निवड करण्यात आली आहे. राजधानी नवी दिल्लीत आठ मार्च रोजी होणार असलेल्या समारंभात हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहे. ताम्रपट, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. सुधीर रसाळ यांचे शालेय शिक्षण छत्रपती संभाजी नगर येथील सरस्वती भवन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण मिलिंद महाविद्यालयात झाले. त्यांनी हैदराबाद येथील उस्मानियाँ विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए.ची पदवी प्रथमश्रेणीत मिळविली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने त्यांना ‘आधुनिक मराठी काव्यातील प्रतिमासृष्टी’ या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केलेली आहे. 37 वर्षे अध्यापन क्षेत्रात घालवल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय कला आणि शास्त्र महाविद्यालयात तीन वर्षे अधिव्याख्याता म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात तब्बल 34 वर्षे कार्यरत राहून मराठी भाषेचे अध्यापन केले.
डॉ. रसाळ यांनी साहित्यप्रकार ः स्वरूप आणि अध्यापन, गंगाधर गाडगीळांची निवडक समीक्षा तसेच दासोपंतविरचित गीतार्णव 18 वा अध्याय या पुस्तकांचे संपादन केले आहे. मर्ढेकरांची कविता ः जाणीवांचे अंतःस्वरूप, मर्ढेकरांची कविता ः आकलन आणि विश्लेषण, मर्ढेकरांचे कथात्म वाङ्मय, भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा, पार्थिवपूजक पु. शि. रेगे, विंदांचे गद्यरूप, नव्या वाटा शोधणारे कवी आदी पुस्तके गाजली होती. आजवर त्यांना 28 विविध पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु साहित्य अकादमीचा पुरस्कार म्हणजे मानाचा तुराच म्हणावा लागेल. यापूर्वी त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. रसाळ कुटुंब मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गांधेली येथील आहेत. त्यांचा जन्म वैजापूर येथे 10 ऑगस्ट 1934 रोजी झाला. त्यांच्या वडिलांकडे गांधेली गावची पाटीलकी व कुलकर्णी पद होते. त्यांनी कारकिर्दीमध्ये हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविले आहेत. मराठी वाङ्मयामध्ये ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे डॉ. रसाळ यांना पुरस्कार मिळाल्यानंतर साहित्य क्षेत्रातून स्वागत झाले आहे. — प्रसाद पाटील
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …