निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळं ठिकठिकाणच्या प्रचारफलकांवर ‘मानवी वाघ’ बघायला मिळताहेत. बर्याच ठिकाणी नेत्याच्या फोटोला वाघाच्या किंवा सिंहाच्या चित्राची पार्श्वभूमी ग्राफिक्सच्या माध्यमातून केली जाते. नेत्यांची तुलना वाघाशी किंवा सिंहाशी करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. वाघ हा सर्वोच्च शिकारी म्हणजे ‘अपेक्स अॅनिमल’ म्हणून ओळखला जातो. म्हणजे जैवसाखळीचं सर्वोच्च टोक. आणि सिंह तर जंगलचा राजाच. या दोघांना संपूर्ण जंगल घाबरतं. जंगलचे राजे सुस्तावून बसलेले असतात तोपर्यंत इतर प्राण्यांचा जंगलात हलकल्लोळ सुरू असतो. पण वाघ-सिंह शिकारीसाठी बाहेर पडले, की सगळं जंगल चिडीचूप होतं म्हणे! माणसातले वाघ-सिंह बाहेर पडल्यावर रस्ते सामसूम झाल्याचं अजूनतरी पाहायला मिळालेलं नाही. आमच्याकडे दोन-तीन नवकवींच्या बाबतीत मात्र असं घडलेलं आम्ही पाहिलं आहे. (म्हणजे आपण कवी आहोत, असं त्याना वाटतं.) बाकी माणसाला बघून माणसं पळतात, म्हणून त्यांना वाघ-सिंहाची उपमा द्यावी, यासाठी कोणतंही संयुक्तिक कारण आजघडीला तरी सापडलेलं नाही. पण ताज्या सर्वेक्षणातून एक चमत्कारिक वास्तव मात्र संशोधकांना सापडलंय. जंगलातले प्राणी जितके वाघ-सिंहांना घाबरतात, त्यापेक्षा अधिक ते माणसाला घाबरतात असं हे संशोधन सांगतं. खरंतर वाघ-सिंहाची डरकाळी गगनभेदी असते. ती ऐकली तरी जंगलातल्या इतर प्राण्यांना धडकी भरते. माणसाचा आवाज त्यापेक्षा कितीतरी पटींनी लहान, तरी माणसाच्या आवाजाची प्राण्यांना डरकाळीपेक्षा जास्त भीती वाटते.
कॅनडातल्या वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्रज्ञ मायकेल क्लिचीं आणि त्यांच्या सहकार्यांनी आफ्रिकेच्या जंगलांमध्ये हे संशोधन केलं. जमिनीवरील सर्वांत खतरनाक शिकारी म्हणजे वाघ-सिंह. सामान्यतः जंगलातले सस्तन प्राणी आजारपणानं, वार्धक्यानं किंवा उपासमारीनं सहसा मरत नाहीत. कारण शिकारी प्राणी त्यांच्यावर ही वेळ येऊच देत नाहीत. तृणभक्षी प्राण्यांना छोटे शिकारी मारतात तर छोट्या शिकारी मोठ्या शिकार्याची शिकार बनतात. ही साखळी वाघ-सिंहांजवळ येऊन थांबते. त्यांना कुणी मारून खात नाही. सिंह हाच सर्वांत मोठा शिकारी असल्यामुळं इतर सर्व वन्यजीवांनी त्यांना घाबरून असावं, हा संकेत आहे. भीतीच्या वेळी ज्या प्रतिक्रिया वन्यजीवांमध्ये उमटतात, त्यांची नोंद शास्त्रज्ञांनी ठेवली. सिंहाची डरकाळी ऐकल्यावर प्राण्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, त्यापेक्षा माणसाचं बोलणं ऐकल्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया अधिक भीती व्यक्त करणार्या होत्या. म्हणजे वाघ-सिंहांचीही शिकार करणारा माणूस नावाचा प्राणी पृथ्वीतलावर आहे, हे एव्हाना जंगलातलं उघड गुपित झालेलं आहे. जो महाभयानक प्राणी सिंहांना घाबरत नाही, त्याला आपण सिंहापेक्षा अधिक घाबरलं पाहिजे, हा सुज्ञपणा जंगली प्राण्यांमध्ये दिसून आला. मानवी पोस्टर-टायगर्सनी या संशोधनाची दखल ताबडतोब घ्यावी.
या संशोधनासाठी तब्बल दहा हजार प्राण्यांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात आला. त्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करण्यात आले. त्यांचं पृथःकरण करून असा निष्कर्ष काढण्यात आला की, 95 टक्के वन्यजीव वाघसिंहांच्या गर्जनेपेक्षा माणसाच्या साध्या बोलण्याने अधिक भयग्रस्त होतात. वास्तविक, शिकार थांबवल्यास वन्यजीवही माणसाचे मित्र होतात, हा अनुभव. परंतु या संकल्पनेचं खंडन करणारं हे नवीन संशोधन म्हणजे माणसाच्या क्रौर्याचा ताजा पुरावा! बापरे! आपणच इतके भयानक; मग ‘आपल्यातले वाघ’ कसे असतील? नुसती कल्पनाच आपल्यालाही घाबरवणारी!
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …