विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी तरी सकाळपर्यंत महायुती आणि महाआघाडी यांच्यातील जागावाटपाचा घोळ संपेल असे वाटत होते. पण अक्षरशः उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी केवळ काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत हा घोळ संपलेला नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्याला एक तास शिल्लक असताना जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार महायुतीतील चार जागांचा आणि महाविकास आघाडीतील बारा जागांचा निर्णय होऊ शकलेला नव्हता. नेहमीच्या निवडणुकीत जो घोळ दिसतो तो दोन्ही युती आणि आघाड्यांमध्ये याही वेळी दिसला. अनेक ठिकाणी मित्रपक्षांनीच आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन हा गोंधळ वाढवून ठेवला आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही ठिकाणाहून आता मैत्रीपूर्ण लढतीही पाहायला मिळणार आहेत. मैत्रीपूर्ण लढत हा शब्दप्रयोग विनोदी आहे. आपसात राजकीय एकमत नसल्याचे हे निदर्शक आहे. पक्षातील उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांवर प्रदेश पातळीवरून नियंत्रण नसणे आणि कोणाचा कोणाला पायपोस नसणे याचेच हे लक्षण मानावे लागेल. जशी लोकसभा निवडणूक झाली तशी विधानसभेची तयारी दोन्ही बाजूंकडून सुरू झाली. निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चेच्या फेर्याही झाल्या. या प्रक्रियेला चार-पाच महिने होऊन गेले तरी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत या पक्षांचे उमेदवारीबाबत एकमत होत नसेल तर हे लोक नेमकी चर्चा कसली करत होते, असा प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहिला नसेल. प्रत्येक पक्ष आपल्याला अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असणार हे जरी खरे असले तरी, आज प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिमा, आपापल्या पक्षांची राजकीय ताकद आणि मतदारसंघात केला गेलेला निवडणूकपूर्व सर्व्हे अशा सगळ्या गोष्टी हाताशी असताना कुठल्याही राजकीय पक्षाला ठामपणे आपली उमेदवारी यादी निवडता आलेली नाही हे स्पष्ट दिसून आले आहे. समाजामध्ये निर्माण होणारी कटुता आणि वैमनस्य कमी करणे ही राजकारणातील धुरिणांची जबाबदारी असते, पण हे लोकच बेजबाबदारीचे दर्शन घडवत असतील तर ते अधिक वेदनादायी आहे. मतदारांनी ठाम निर्धाराने काही भूमिका घेणे गरजेचे आहे. जो उमेदवार सभ्यतेची मर्यादा बाळगतो, जो गुंडगिरी करत नाही आणि कुठल्याही गुंड प्रवृत्तीला पाठीशी घालत नाही अशाच उमेदवारांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असा निर्धार करून मतदारांनी मतपेटीतून तसा संदेश देणे आता काळाची गरज बनली आहे.– जयदिप नार्वेकर
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …