लेख-समिक्षण

बेसनाचा सौंदर्यमहिमा

जुन्या काळात जेव्हा साबण उपलब्धच नव्हते तेव्हा लोक डाळीचे पीठ अंगाला लावून अंघोळ करत होते आणि आता सुध्दा अगदी आधुनिक काळातही डाळीच्या पीठाचा साबणासारखाच नव्हे तर इतर अनेक प्रकारांनी सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर केला जातो. डाळीचे पीठ म्हणजे हरभर्‍याच्या डाळीचे पीठ ज्याला सध्या बेसन पीठ म्हणण्याची पध्दत आहे. बेसन पीठाचे दुधात मिश्रण करुन ते मिश्रण चेहर्‍याला लावल्यास चेहरा विलक्षण तजेलदार दिसतो. हे मिश्रण करताना त्यात थोडी हळद मिसळावी. हे मिश्रण चेहर्‍याला 20 मिनिटे लावून ठेवावे आणि नंतर कोमट पाण्याने धुवावे.
अशा प्रकारचे मिश्रण वर्षानुवर्षेवापरले जात आहे. परंतु आता बेसन पीठाच्या वापराचे अधिक संशोधन करुन त्याला अधिक शास्त्रीय रुप दिले जात आहे. बेसन पीठ दुधाच्या ऐवजी गुलाब पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण चेहर्‍याला लावले तर त्याचा गुण अधिक चांगला येतो, असे अलीकडच्या प्रयोगात आढळले आहे. मात्र हे मिश्रण कोरड्या त्वचेच्या लोकांनी वापरायचे नाही. तेलकट त्वचेच्या लोकांनी ते वापरले की, तेलकटपणा कमी होतो.
कोरड्या त्वचेच्या लोकांना तेलकटपणा कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा अशा लोकांनी बेसन पीठ आणि मध यांचे मिश्रण करावे. त्यात थोडे दूध आणि किंचित हळद पावडर टाकावी. आठवड्यातून एकदा हे मिश्रण चेहर्‍याला 20 मिनिटांसाठी लावावे. त्यामुळे त्वचा ओलसर होते. उन्हामुळे पडणारे काळे डाग कमी करण्यासाठी बेसनपीठ आणि बदामाच्या बियांची पावडर यांचे मिश्रण करावे. ते दुधात कालवावे आणि त्यात चार थेंब लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चेहर्‍यावर 30 मिनिटे ठेवावे. उन्हामुळे पडलेले चेहर्‍यावरचे काळे डाग नाहीसे होतात.

Check Also

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *