बॉलिवूडच्या आजवरच्या प्रवासामध्ये बालचित्रपटांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. चित्रपटातील नायकांचे बालपण प्रभावीपणे रेखाटले जाते, मात्र एकप्रकारे नायकाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी लहान मुलांच्या पात्रांचा उपयोग केला जातो. कृष्णधवलपासून ते आतापर्यंतच्या काळात असंख्य बालचित्रपट येऊन गेले. किंबहुना मोठ्या कलाकारांचा समावेश असलेल्या बाल चित्रपटांनी काहीवेळा यशही मिळवले, परंतु ते मर्यादित राहिले. काहींची गाणी गाजली तर काहींवेळा व्यक्तिरेखा. पण त्याची व्याप्ती वाढली नाही. आजकालची किशोरवयीन मुले मागच्या पिढीच्या तुलनेत एक पाऊल पुढे असताना त्यांच्याविषयी फारसे पडद्यावर येत नाही.
——-
चित्रपटातील कथानक वेगवेगळ्या धाटणीचे असतात. पण चित्रपटांचा स्वत:चा एक ट्रेंड असतो, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडत असेल तर त्यानंतरचे चित्रपट देखील त्याच प्रकारचे झळकतात आणि त्याचे कथानक देखील त्याच्याशी मिळतेजुळते असते. खलनायकाचा बदला घेणारा चित्रपट हिट झाला की त्याच प्रकारच्या चित्रपटांची अक्षरश: रांग लागते. म्हणजे शोले चित्रपट सुपरडुपर ठरल्यानंतर दरोडेखोरांवरच्या चित्रपटांची लाटच आली. मात्र मुलांच्या चित्रपटांबाबत असे म्हणता येंणार नाही आणि तसे चित्रही निर्माण झाले नाही. मुलांवर तयार होणार्या चित्रपटांची संख्या खूपच कमी आहे आणि तशी दिसते. वर्षभरात एखादा चित्रपट मुलांच्या केंद्रीत असतो. कारण या चित्रपटांची अल्प कमाई. चित्रपट निर्माते खर्चाच्या तुलनेत अनेक पटीने वसुल करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कमाईचा हा फॉर्म्युला मुलांच्या चित्रपटाला लागू होत नाही किंवा फीट बसत नाही.
दृश्य असले तरी संपूर्ण चित्रपट नाही
या कारणांमुळे कथानकात लहान मुलांशी संबंधित प्रसंग, दृश्य असतात, परंतु संपूर्ण चित्रपट लहान मुलांसाठी असतोच असे नाही. हिंदी चित्रपटाला शंभर वर्ष पूर्ण झाले असले तरी लहान मुलांचे चित्रपटा अजूनही बाल्यावस्थेतच आहेत, असे म्हणावे लागेल. कारण लहान मुलांच्या चित्रपटांचा मुद्दा हा विषयाशी असतो. मुलांच्या मानसिक पातळीवर जावून त्यांचे मनोरंजन करणारा चित्रपट तयार व्हावा अशी अपेक्षा असते. तसेच त्यांच्याशी संबंधित असणार्या समस्यांवर देखील प्रकाश पाडला जातो. परंतु हिंदी चित्रपटात मार्गदर्शनपर बाल चित्रपटांचा पूर आलेला दिसतो. आतापर्यंत प्रदर्शित बहुसंख्य चित्रपट मुलांना उपदेश देणार्या कथानकावर बेतलेले आहेत.मुलांनी चित्रपटातून चांगला संदेश घ्यावा, असा दिग्दर्शकांचा प्रयत्न असतो.
संदेश दिले जातात
स्वातंत्र्यानंतर जवळपास प्रत्येक दशकांत समाजाला दिशा देण्याचे आणि समाज प्रबोधन करणार्या चित्रपटांची निर्मिती झाली. या प्रयत्नांत मुलांवर केंद्रीत चित्रपटांचाही समावेश आहे. त्याचा उद्देश मुलांशी संबंधित मुद्दे, प्रश्न, आव्हाने पडद्यावर आणणे. मात्र आतापर्यंत त्यादृष्टीने परिणामकारक प्रयत्न झालेले नाहीत. मुलांवर तयार झालेल्या चित्रपटातून केवळ संदेश देण्याचे काम केले गेले. बालमनाचे मनोरंजन करण्याचे प्रयत्न खूपच कमी झाले आहेत. मुलांसाठी सत्यजित रे यांनी बंगाली चित्रपट साकारण्याचा प्रयत्न केला होता.
बालमनाचा ठाव घेणारे चित्रपट
ताजा संदर्भ पाहायचा झाल्यास कोणी जर प्रत्यक्षात बालमनाला छेडत चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो कवी गुलजार यांनी. चित्रपट परिचय (1972) आणि किंताब (1977) मध्ये मुलांचे सकारात्मक चित्र दाखविले गेले आहे. ’परिचय’ हा अशा कुटुंबाची कहानी असून तेथे मुलांच्या मनांच्या ठाव घेतला जात नव्हता. जोपर्यंत तुम्ही मुलांजवळ जात नाहीत, तोपर्यंत ते जवळ येणार नाहीत. एवढेच काय तर स्वत: कुटुंबातील सदस्यच मुलांना ओळखण्यात असमर्थ ठरतात. या चित्रपटात दाखविले की, मुलांचे मानसशास्त्र समजल्याशिवाय त्यांना समजून घेणे कठीण आहे. अशा स्थितीत त्यांचे शिक्षक (जितेंद्र) हे मुलांच्या हालचालींवरून त्यांना शिकविण्यात यशस्वी ठरतात. त्याचवेळी या बच्चेकंपनीने यापूर्वीच्या अनेक शिक्षकांना पळवून लावलेले असते.
चित्रपटांऐवजी गाणे गाजले
मेहबुब खान यांनी मुलांसाठी 1962 मध्ये ‘सन ऑफ इंडिया’ चित्रपट तयार केला. हा चित्रपट चालला नाही, परंतु त्याचे गीत ‘नन्हा मुन्ना राही हु, देश का सिपाही हु.’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. सत्येन बोस यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 1964 मधील ‘दोस्ती’ हा केवळ मुलांचा चित्रपट म्हणता येणार नाही तर तो सर्वांसाठीच प्रेरणादायी चित्रपट आहे. शेखर कपूर यांनी 1983 मध्ये ‘मासूम’ आणला हा तर विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलांमुळे होणारा कौटुंबीक संघर्ष यात दाखविला आहे. 1992 मध्ये गोपी देसाई यांचा ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटात एका मुलाच्या स्वप्नातील जगाविषयी चित्रण होते. अर्थात लहान मुलांवर चित्रपट आला खरा, परंतु त्यात मोठ्या वयाच्या प्रेक्षकांवरच अधिक लक्ष केंद्रीत केले गेले.
मासूम चित्रपटात मुलांचे मांडले मुद्दे
मुलांवर केंद्रीत जागृति 91954) या चित्रपटातील गीत ‘हम लाए है तुफान से किश्ती निकाल के’ हे गाणे आजही ऐकावयास मिळते. याचवर्षी साकारलेला चित्रपट ‘बुटपॉलिश’ देखील बाल मानसशास्त्रीयवर आधारलेला. एक सन्यासी आणि एक अनाथ बालिका यांच्यातील स्नेह संबंध दाखविणारा व्ही .शांताराम यांचा तुफान और दिया (1956) देखील कौतुकास्पद आहे. सत्येन बोस यांनी 1960 मध्ये मुलांवर आधारित ‘मासूम’ चित्रपट आणला. यात मुलांशी संबंधित अनेक प्रश्न मांडले. मुलांवर अनेक चित्रपट आले, परंतु ते मुलांचेच होते, असे म्हणता येणार नाही. बाल कलाकार म्हणून नीतू सिंह यांचा ’दो कलिया’ हा लहान मुलांचा चित्रपट म्हटला गेला, परंतु तो मुलांसाठी नव्हता.
तारे जमीं पर
2005 मध्ये विशाल भारद्वाज यांनी मुलांसाठी ‘ब्लू अम्ब्रेला’ आणला. परंतु तो चालला नाही. रवी चोप्रा यांनी एकत्र कुटुंबाची ताटातूट होण्याच्या स्थितीवर ‘भूतनाथ’ (2008)आणि ‘भूतनाथ रिटर्न’ आणला. परंतु विशाल भारद्वाज यांच्या ‘मकडी’ चित्रपटाने बाल चित्रपटांसंदर्भात निर्माण झालेली संकल्पना मोडीत काढण्याचे काम केले. 2007 मध्ये आमीर खान याने बाल मानसिकतेवरचा ‘तारे जमी पर’ आणला आणि तो प्रेक्षकांना भावला. कुटुंबातील उपेक्षित असणारा अणि डिस्लेक्सियाग्रस्त मुलांची कहानी पाहून मोठ्या लोकांना देखील अश्रू आवरले नव्हते. अमोल गुप्ते यांचा स्टॅनली का डब्बा (2011) याला देखील मुलांसाठीचा चांगला चित्रपट म्हणता येईल. गरीब राजस्थानी मुलगा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याशी भेटण्याच्या प्रयत्नावर साकारलेला ‘आय अॅम कलाम’ देखील चांगला प्रयत्न म्हणता येईल. पण अल्बर्ट लेमोरीसे यांनी दिग्दर्शित केलेला फ्रेच सिनेमा ‘रेड बलून’ आणि इराणी निर्मार्त्यांनी सांकारलेला ‘व्हाईट बलून’ आजही सिनेमासाठी मैलाचा दगड आहे. शेवटी आपण मुलांसाठी ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’ सारखा एकही चित्रपट का तयार करू शकलो नाहीत, हा एक प्रश्न आहे.
1955 मध्ये मुलांसाठी चित्रपटांची निर्मिती आणि निखळ मनोरंजन करण्याच्या दृष्टीने बाल चलचित्र समितीची स्थापना करण्यात आली. त्याचे काम मुलांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करणे, वितरण आणि प्रदर्शन करणे. 1979पासून ही समिती दर दोन वर्षाला बाल चित्रपट महोत्सव आयोजित करते. त्यात मुलांवर केंद्रीत चित्रपटांचे प्रदर्शन होते. परंतु आतापर्यंत बाल सिनेमाच्या इतिहासात एकही दर्जेदार चित्रपट या समितीकडून तयार होऊ शकला नाही.- सुचित्रा दिवाकर
Check Also
लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …