लेख-समिक्षण

बहुगुणी लस

देवी, गोवर, ट्रिपल, पोलिओ अशा अनेक लसी आपल्याला पालकांनी लहानपणीच दिल्या. स्वतः जाऊन लस घेऊन येण्याचा अनुभवच आपल्याला नव्हता. ती वेळ कोविडने आपल्यावर आणली आणि बरेचजण घाबरले. ही लस खरंच ‘फुलप्रूफ’ आहे का? याचे काही दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, अशा चिंतेनं अनेकांना ग्रासलं होतं. सोशल मीडियानं नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतून लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची यादी थेट मृत्यूला नेऊन भिडवली होती. काहीजणांनी तर ‘कोविडने मरण्यापेक्षा लसीने मरू,’ अशी निर्वाणीची भाषा करून सुई टोचून घेतली. दोन-तीन वर्षांतच लसीचे दुष्परिणाम विशिष्ट व्यक्तींवर होत असल्याची अधिकृत माहिती आली आणि आपण पुन्हा घाबरलो. पण अशा केसेस ‘लाखात एक’ असल्याचं समजल्यावर जरा आराम वाटला. सध्या अनेक ठिकाणी दोन दिवसांच्या तापानंतर हातापायाचे सांधे दुखण्याचा विचित्र आजार दिसून येतोय. पावलं, मनगटं, बोटं, अनेकांचे गुडघेही अनेक दिवस दुखत राहतायत. काहींच्या पायांवर सूज येतीये. सामान्यतः ही चिकुनगुणियाची लक्षणं मानली जातात. परंतु या व्यक्तींची केवळ चिकुनगुणियाचीच नव्हे तर डेंग्यूची चाचणीही ‘निगेटिव्ह’ येत असल्यामुळं गुंता वाढलाय. डॉक्टर पेनकिलर देतात. तेवढ्यापुरत्या वेदना थांबतात. कोर्स संपल्या की पुन्हा सुरू होतात. या अनाकलनीयतेमुळं अनेकांच्या संशयाची सुई पुन्हा कोविड लसीच्या कथित दुष्परिणामांकडे वळली आहे. अशा वातावरणातच एक चमत्कारिक लस चर्चेत आली आहे.
ही लस आहे लठ्ठपणा कमी करण्याची! ऐकायला काहीसं विचित्र वाटत असलं, तरी ब्रिटनमध्ये एका कंपनीनं अशी लस तयार केलीये आणि चाचण्यांची परवानगीही मागितलीये. पुढच्या पाच वर्षांत या चाचण्या केल्या जातील, अशी घोषणाही तिथल्या सरकारने केलीये. वजन कमी करण्यासाठी लोक काय-काय करतात! चालतात, धावतात, जिमला जातात, डाएटच्या नावाखाली उपाशी राहतात आणि सडपातळ करण्याचा दावा करणारी औषधंही काहीजण मागवतात. ब्रिटनमध्ये अनेक युवक केवळ लठ्ठपणामुळं बेरोजगार आहेत. त्यांना कार्यक्षम बनवण्यासाठी ‘मॉन्जेरो’ नावाची ही लस उपयोगी पडेल, अशी सरकारला आशा आहे. ब्रिटनमध्ये स्थूलत्वाची समस्या फार मोठी आहे. प्रौढांपैकी 64 टक्के लोक प्रमाणापेक्षा अधिक ‘वजनदार’ आणि 29 टक्के लठ्ठ आहेत. स्थूलतेमुळं शरीरात अनेक आजार घर करतात आणि त्यामुळं आरोग्य व्यवस्थेवरही ताण येतो. तो कमी करण्याच्या दृष्टीनंसुद्धा ही लस उपयुक्त ठरेल, असं सरकारला वाटतं. स्थूलत्वामुळं मधुमेहींची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्यावरील उपचारापोटी दरवर्षी तब्बल दहा अब्ज पौंड खर्ची पडतायत. त्यापेक्षा 28 कोटी पौंड गुंतवणुकीची लस सरकारला अधिक जवळची वाटणं स्वाभाविकच नाही का..?
खर्च कमी करण्याबरोबरच उत्पादकता वाढवणं हाही या लसीचा उद्देश आहे. लठ्ठपणामुळं होणारे आजार, त्यासाठी लागणार्‍या अतिरिक्त रजा आणि त्यामुळं होणारं नुकसान ही साखळी टाळण्याची सरकारला इच्छा आहे. शिवाय जी कामं स्थूलत्वामुळं करता येत नाहीत, ती जमली तरी उत्पादकता वाढेल, हा हिशोब आहे. अर्थात, स्थूलत्व कमी करणार्‍या औषधांप्रमाणंच या लसीचेही दुष्परिणाम असणं स्वाभाविक आहे. अर्थात ते सगळ्यांनाच जाणवणार नाहीत. त्यामुळं स्थूलत्वाचे तोटे आणि संभाव्य दुष्परिणामांची भीती यापैकी एकाची निवड संबंधितांना करावी लागेल.

Check Also

खेळू नका!

खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्‍याचदा यामागे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *