लेख-समिक्षण

बड्या भूमिकेत परिपक्व नायिका

सिनेक्षेत्रात अभिनय करणार्‍या ललनांसाठी सौंदर्य हा घटक सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. आकर्षक, मनमोहक चेहरा, बांधेसूद फिगर आणि तारुण्यपणा दर्शवणारी त्वचा यांसारखी वैशिष्ट्ये असतील तर सुमार दर्जाचा अभिनय असूनही नायिका इथे कशा बशा का होईना पण तग धरून जातात. सौंदर्याला असणार्‍या या अनन्यसाधारण महत्त्वामुळेच रेखासारखी अभिनेत्री हार्मोनल उपचार घेताना दिसते. कारण एकच… काहीही झाले तरी ‘वय झाले’ हा शिक्का मारुन आपल्याला प्रवाहाबाहेर फेकले जाऊ नये. परंतु आजची स्थिती पाहिल्यास पन्नाशी पार केलेल्या प्रौढ अभिनेत्री मेनस्ट्रीममध्ये येऊन चित्रपटाचे केंद्रस्थान बनत आहेत. – सोनम परब
——–
माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्या भुलभुलैय्या-3 चित्रपटाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. वास्तविक या दोन्ही भारदस्त नायिका. माधुरीने 1990 चा काळ तर विद्याने 2000 चा काळ गाजविला. या दोघींनी अभियनाच्या जोरावर प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणले. पन्नाशी ओलांडल्यानंतरही चित्रपट निर्मात्यांकडून होणारी मागणी ही त्यांच्या दमदार अभिनयाची पावती आहे. कारण सध्याच्या काळात नव्या नायिका फारशा प्रभावी ठरत नसताना त्यांना वेगळ्या धाटणीची भूमिका करणे कठीण जाते. अशावेळी परिपक्व नायिकांना मागणी दिसून येते. साधारणपणे असा अनुभव प्रत्येक काळातील प्रौढ नायिकांना येतो.
नव्या काळातील अभिनेता कार्तिक आर्यनला ‘स्टारडम’चा मार्ग दाखविण्यात अनिस बाझमी यांच्या भुलभूलैय्या-2 चे मोठे योगदान राहिले. दुर्देवाने त्यांनंतरचे बहुतांश चित्रपट तिकीटबारीवर अपयशी ठरली आणि त्याची लोकप्रियता घसरली.परिणामी आज तो बॉक्स ऑफिसवरचा हुकुमी एक्का मानला जात नाही. अशावेळी अनिस बाझमी यांनी पुन्हा त्याला हात दिला. अनिस बाझमीचा भुलभुलैय्या-3 मध्ये त्याची मुख्य भूमिका आहे. भुलभुलैय्या-2च्या यशात मंजुलिका झालेल्या तब्बूचा महत्त्वाचा वाटा होता. पण आता एक नाही दोन दोन मंजुलिकाने त्याला मदत केली. अनिस म्हणतात, पहिली मंजुलिका विद्या बालनला नव्या चित्रपटातील फ्लॅशबॅकमध्ये बर्‍यापैकी फुटेज दिले. तसेच मंजुलिकाच्या एका रुपातून माधुरी देखील काम करत आहे. या दोन्ही भूमिकेसाठी मला परिपक्व नायिकांचीच गरज होती.
तब्बू यांचा दमदार अभिनय
कुशल अभिनेत्री तब्बूने अनेक चित्रपटात अभिनयाची छाप पाडली. माधुरी, जुही चावला, श्रीदेवीच्या जमान्यात तब्बूने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले होते. विरासत, माचीस चित्रपटातील तिच्या भूमिकेची आजही आठवण काढली जाते. तिची सर्वात उजवी बाजू म्हणजे भूमिका. या कारणामुळे परिपक्व नायिका म्हणून तिला अधिक मागणी राहताना दिसत आहे. दृश्यम, भुलभुलैय्या-2 याचे उदाहरण देता येईल. आता काही उडाणटप्पू, फुटकळ चित्रपटांत ती अधिक दिसते, तिच्या अभिनयाची व्याप्ती अधिक असून तिला कमी लेखता येणार नाही.
माधुरीचे वलय
परिपक्व माधुरी दीक्षित ही अतुलनीय उदाहरण म्हणून समोर येते. भूमिकेतील आव्हान स्वीकारणे ही तिच्यासाठी किरकोळ बाब. 1990 च्या दशकांत श्रीदेवीला मागे टाकणार्‍या माधुरीचे वलय आजही कायम आहे. नव्या नायिकांपेक्षा माधुरीला पाहण्यास प्रेक्षक पसंती देतात. म्हणून नव्या जमान्यातही तिला भूमिका मिळत आहेत. डबल धमाल, कलंकसारख्या चित्रपटात तीने खूपच साध्या भूमिका केल्या आणि सहजपणे निभावल्या. ती निवडकच भूमिका स्वीकारते. अनिस यांच्या नव्या चित्रपटात फार मोठी भूमिका नाही. तरी तिच्या दमदारपणाचा चित्रपटाला लाभ मिळाला आहे. माधुरी सध्या नृत्य शाळेवरून बरीच व्यग्र राहाते. म्हणून ती चित्रपटात फारशी दिसत नाही.
विद्या बालनने आखलेली चौकट
विद्या बालन ही नायिकाप्रधान चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. मात्र ‘शकुंतला देवी’ चित्रपटानंतर तिची ही प्रतिमा अस्तंगत झाली. तरीही काही दिग्दर्शक अजूनही तिच्या अभिनयाचा आवाका विसरलेले नाहीत. या कारणांमुळेच खरी मंजुलिका परत आणण्यासाठी अनिस बाझमी यांनी तिच्याशी थेट संपर्क केला. साहजिकच चित्रपटाभोवतीचे वलय आणखीच वाढले. वास्तविक विद्या बालनने सुरुवातीपासूनच मध्यवर्ती भूमिका करण्यास प्राधान्य दिले आहे. आगामी ‘दो और दो प्यार’ या चित्रपटातही तिची कॅरेक्टर भूमिका आहे.
शो पीसमध्ये अडकल्या नव्या तारका
नव्या काळातील नव्या तारकांना चांगल्या भूमिका मिळताना दिसत नाही आणि त्यासाठी त्या खूप उत्सुक असल्याचेही दिसत नाही. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे आदींनी सुरुवातीला हवा केली खरी, परंतु त्या केवळ शो पीस राहिल्या. एकुणातच बहुतांश नायिकांनी समकालिन नायिका अलिया भट्टकडून काहीही धडे घेतलेले दिसत नाहीत.
कियारा, कृतिला हव्यात चांगल्या भूमिका
नव्या काळातील नायिकांत कृति सेनन आणि कियारा अडवानी या चांगल्या उदाहरण ठरू शकतात. परंतु काही खराब चित्रपटांमुळे त्यांची ओळख केवळ स्टार म्हणून राहिली. कियाराने भुलभूलैय्या-2 नंतर धुमाकूळ घातला. नंतरच्या काही वाईट चित्रपटांमुळे ती आघाडीची नायिकाऐवजी सहअभिनेत्री म्हणून वावरू लागली. याप्रमाणे अभिनेत्री कृति सेनन ही ओटीटीवरचा चित्रपट ‘मिमी’ नंतर चांगली नायिका म्हणून दिसली खरी, परंतु तिही उडाणटप्पू चित्रपटांच्या गल्लीतच हरविल्याचे दिसून येते. बहुतांश नव्या नायिका विस्मरणात जाण्याचे बरीच कारणे आहेत.

Check Also

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *