कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत करण्याची तयारी असली की यश दूर नसते, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील मुलीने विपरीत परिस्थितीत यश मिळवले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेवालवाडी हे गाव. या गावात अर्जुन चिखले आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्यांकडे फक्त 30 गुंठा शेतजमीन आहे. यामुळे तीन मुले अन् पत्नी अशा कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर शक्यच होत नाही. मग अर्जुन चिखले हमाली करतात तर त्यांची पत्नी संगीता शेतात मजुरीसाठी जाते. मुलांचे शिक्षण पूर्ण करणे त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते. परंतु मुले हुशार निघाली अन् त्यांनी यशाची शिखर गाठने सुरु केले. अर्जुन चिखले यांचे शिक्षण फक्त सातवी झाले होते. त्यांची पत्नी संगीताही पाचवीपर्यंत शिकली होती. शिक्षण नसल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे अर्जुन चिखले मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली करु लागले. संगीता शेतात जाऊन शेतमजुरी करु लागली. आपले शिक्षण नसल्यामुळे आपणास नोकरी किंवा रोजगार मिळू शकला नाही, ही खंत अर्जुन चिखले यांना नेहमी होती. त्यामुळे त्यांनी मुलांना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
सीएची परीक्षा ही देशातील प्रमुख आव्हानात्मक परीक्षांपैकी एक. या परीक्षेचा निकालही केवळ पाच ते दहा टक्के लागतो. अर्जुन चिखले यांची मुलगी पल्लवी चिखले हिने या परीक्षेसाठी तयारी सुरु केली. तीन वर्षात नियमित सीए कोर्स केला. त्यानंतर परीक्षा दिली. ती पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. पल्लवीचे प्राथमिक शिक्षण शेवालवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंत मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेतले. बारावी मंचर येथील अन्नासाहेब आवटे कॉलेजमधून केले. त्यानंतर सीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
घरातील आर्थिक विवंचना, कुटुंबात कोणाचे उच्च शिक्षण नाही, परंतु मुलीने पहिल्याच प्रयत्नात सीएचा टप्पा यशस्वी करुन पालकांच्या कष्टांचे चीज केले. ही बाब वरील संघर्षाथेवरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
वार्धक्य रोखायचंय?
वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके …