लेख-समिक्षण

पुन्हा हाथरस!

शाळेत शिक्षण मिळतं. शिक्षणामुळं अज्ञानाचा अंधकार दूर होतो. सत्य दिसू लागतं आणि त्यामुळं मनातल्या वेडगळ, जुनाट अंधश्रद्धा दूर होतात. अमानवी रूढी संपुष्टात येतात, असा सर्वसाधारण प्रवास आहे. पण शाळा काढणार्‍याच्याच डोक्यातून वेडगळ समजुती जात नसतील, तर काय घडतं? हाथरस… पुन्हा एकदा हाथरस! 14 सप्टेंबर 2020 रोजी घडलेलं सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरण, काही महिन्यांपूर्वी भोलेबाबाच्या सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 121 लोकांचा मृत्यू अशा घटनांनंतर उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा आता शाळेतील कथित नरबळी प्रकरणामुळं चर्चेत आलाय. आनंददायी शिक्षणासाठी 2009 मध्ये शिक्षणाधिकार कायदा करण्यात आला. परंतु उत्तर प्रदेशात शाळांच्या संदर्भात सातत्यानं अशा बातम्या येतायत, ज्यामुळं शिक्षण आनंददायी नव्हे तर भीतीदायक ठरू लागलंय. अगदी ताज्या तीन घटनांचा विचार करून मुलं शाळेत जायला आणि पालक त्यांना शाळेत पाठवायला घाबरू लागलेत. कौशांबी जिल्ह्यातल्या मंझनपूर गावात चौथीत शिकणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकांनी दांडकं फेकून मारलं. मुलाच्या डाव्या डोळ्याला ते लागलं आणि डोळा कायमचा निकामी झाला. अलिगढमध्ये दप्तर घरी विसरल्याबद्दल मुलाचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि ‘इलेक्ट्रिक चेअर’वर बसवून शॉक देण्याची धमकीही देण्यात आली. हाथरसच्या रसगव्हाण गावात घडलेल्या घटनेमुळं तर संपूर्ण देश हादरलाय, कारण या घटनेत चक्क शाळेची भरभराट व्हावी, म्हणून विद्यार्थ्याचा बळी दिल्याचं समोर येतंय.
सामान्य घरातला दुसरीत शिकणारा मुलगा. आईवडील म्हणायचे, याला कलेक्टर करायचं. मुलगा हुशार. घरापासून दूर शाळेच्या होस्टेलमध्ये राहणारा. शाळाचालकाचा वडिलांना अचानक फोन येतो. मुलाला ताप आल्याचं कळतं. वडील नेहमीप्रमाणं नोएडामध्ये कारखान्यात कामाला जाण्याच्या तयारीत. पण मुलाला आराम करण्यासाठी घरी आणावं, असा विचार करून कामावर जाण्याऐवजी शाळेत जातात. शाळाचालकाला फोन करतात, तेव्हा तो शाळेपासून 20 किलोमीटर अंतरावर असल्याचं समजतं. तिथे जाऊनसुद्धा वडिलांची ना मुलाची भेट होते, ना शाळाचालक भेटतो. त्यानंतर शाळाचालक मुलाच्या वडिलांचे फोनच घेणं बंद करतो आणि त्यामुळं वडिलांना शंका येऊन प्रकरण पोलिसात जातं. तपास सुरू केल्यावर शाळेपासून 25 किलोमीटरवर शाळाचालकाची कार सापडते. मागच्या सीटवर मुलाचा मृतदेह. गळ्यावर काळ्या-निळ्या खुणा. मुलाचा खून झाल्याचं निष्पन्न झाल्यावर कारणांचा शोध सुरू होतो आणि भयानक सत्य समोर येतं. उच्चशिक्षित शाळाचालकाचा बाप मात्र जादूटोणावाला. शाळेपासून काही अंतरावर असलेल्या दोन खोल्यांमध्ये भुतं उतरवण्याचं, काळी जादू वगैरे करण्याचं काम करणारा. स्थानिक लोक त्याला ‘भगतजी’ म्हणतात. त्याच्या चौकशीतून मुलाचा बळी दिल्याची घटना उघड झाली.
शाळेला परवानगी पाचवीपर्यंत. तरी आठवीपर्यंतचे वर्ग दामटून चालवले जात होते. शाळेला होस्टेलची परवानगी नसतानाही ते चालवलं जात होतं. शिक्षणाधिकार कायद्यांतर्गत शाळेची चौकशी सुरू होती. शाळा उभारण्यासाठी चालकाने कर्ज काढलं होतं. अनेकांकडून हातउसनेही घेतले होते. पण शाळेला यश मिळत नव्हतं. भरभराट होत नव्हती. यासाठी पूर्वीही एका मुलाचा बळी देण्याचा प्रयत्न झाला होता, असं सांगतात. अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात जिथून व्हायला हवी, त्या शाळेची भरभराट नरबळीने होणार असेल, तर मामला अवघड आहे.

Check Also

खेळू नका!

खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्‍याचदा यामागे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *