विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळूनही महायुतीच्या सरकार स्थापनेला झालेल्या विलंबामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले; परंतु अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी धूमधडाक्यात पार पडला. दरम्यानच्या काळात निर्माण झालेला गतिरोध हा मंत्रीपदांबाबतची रस्सीखेच कायम असल्याचे दर्शवणारा आहे. परंतु भक्कम बहुमत आणि महायुतीला मिळालेली लोकमान्यता यामुळे या सरकारच्या स्थैर्याबाबत कसलीही चिंता करण्याचे कारण दिसत नाही. तथापि विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतलेल्या योजना मार्गी लावण्याबरोबरच जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना सरकारचा कस लागणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 11 दिवसांनी भाजपचे नेते 54 वर्षीय देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले. अर्थात विधानसभेच्या निकालाचा कल पाहता फडणवीस हेच मुख्यमंत्री होणे अपेक्षित होते. त्यासाठी इतके दिवस काथ्याकुट करण्याची गरज नव्हती. परंतु गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारणातील चढउतार पाहिले तर याही वेळी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते, असे वातावरण निर्माण झाले होते. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होताच राज्याचे राजकारण आता स्थिर होण्याकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा आहे. विधानसभा निकालानंतर सर्वांच्या नजरा फडणवीस यांच्याकडेच लागल्या होत्या. महायुतीचे सूत्रही तसेच ठरलेले होते. 2014 मध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. मात्र 2019 मध्ये अचानक ग्रहण लागले. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र 161 जागा जिंकल्या होत्या आणि बहुमत मिळवले होते. परंतु शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दावा ठोकला. इथूनच महाराष्ट्रातील राजकारणाला अनैसर्गिक, अनैतिक आणि अस्थिरतेची लागण सुरू झाली आणि राजकीय विचारांचा कल्लोळ उडाला. पण गेल्या चार ते पाच दशकांपासून हिंदुत्वाचे राजकारण करणार्या शिवसेनेने सत्ता मिळवण्यासाठी 2019 मध्ये ज्या पद्धतीने रंग बदलला, त्याला जनतेकडून मान्यता मिळणे कठीण होते. 2014 पासून भारतात भाजपच्या नेतृत्वाखाली मोदी पर्व सुरू झालेले असताना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनाकलनीय घटना घडली होती. अखेर आताच्या निकालातून महाराष्ट्राचे राजकारण एकाच नैसर्गिक विचारांवर आल्याचे दिसून आले.
एक जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंड झाले. या बंडातून राज्यात अनैसर्गिक युती कोणीही मान्य करणार नाही, असा संदेश दिला गेला. पण जेव्हा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महांयुतीत सामील झाला तेव्हा महाराष्ट्राच्ंया सत्ता समीकरणात काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षात स्थिरता नसल्याचे उघड झाले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत भाजप- शिवसेना या नैसर्गिक आघाडीला आणि राजकारणाला धक्का दिला. मात्र हा एक तात्पुरता परिणाम ठरला. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारे अनेक घटक होते. त्याचे चित्र महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि अन्य ठिकाणी दिसून आले. साहजिकच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यासारख्या दोन मोठया राज्यातील भाजपचे संख्याबळ कमी झाल्याने ‘एनडीए’च्या केंद्रात जागा कमी झाल्या. कालांतराने मतदारांनाच चूक झाल्याचे वाटू लागले. भाजपनेही लगेचच बाऊन्सबँक केला. अगोदर हरियाणा आणि नंतर महाराष्ट्रात मतदारांनी अनुकूल परिस्थिती आणि सुलभ समीकरणाला कौल दिला.
निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन करताना दोन आंठवडे गेले. कारण फडणवीस यांना नेता या रुपातून स्वीकार करण्यास एकनाथ शिंदे तयार नव्हते. विधानसभेच्या निकालातून एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेली जनमान्यता. त्यांनी वलयांकित असलेल्या कुटुंबापासून पक्षाला वेगळे केले आणि या पक्षाला पुन्हा नैसर्गिक विचारांवर आणण्यासाठी बरीच मेहनत घेतली. जून 2022 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार असणे गरजेचे होते आणि त्यासाठी शिंदे यांच्यावर कमान सोपविण्यात आली. अर्थात तत्कालिन काळात राजकीय वाटाघाटीत भाजपच्या नेतृत्वाने त्यांना कायमस्वरुपी मुख्यमंत्री होण्याचे एखादे आश्वासन दिले असते तर आता त्याची नक्कीच चर्चा झाली असती. शिंंदे समर्थक हे त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित होते; परंतु अशा प्रकारचे चित्र निर्माण करणे हे महाराष्ट्रातील राजकारणाला पुन्हा अस्थिर होण्यास कारणीभूत ठरले असते. शिंदे यांनाही सध्या उमटणार्या प्रतिक्रियांचे आकलन झाले आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला असता तर, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी करून निर्माण केलेल्या स्वत:च्या सशक्त प्रतिमेला सरकार स्थापनेत अडथळे आणल्याबद्दल दोषी धरले गेले असते. महाराष्ट्राच्या राजकारणात काम करताना शिंदे यांच्या शिवसेनेसोबत दीर्घकाळ राहणे आवश्यक असल्याचेही भाजपच्या श्रेष्ठींना चांगलेच ठाऊक आहे. दुसरीकडे अजित पवार यांची राजकीय परिपक्वता दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुढचा विचार करत आपल्या घटक पक्षांना आणि दोन्ही भागिदारांना कोणत्याच पातळीवर असमाधानी आणि नाराज होण्याची संधी दिली नाही. संघाची प्रभावी सक्रियता देखील राहिली. या कारणांमुळेच जागा वाटपात आणि उमेदवार निवडीत देखील किरकोळ मतभेद असतानाही तिन्ही पक्ष आणि नेत्यांनी एकत्र येत निवडणूक लढली. एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत बाहेर पडले तेव्हा भाजप आपल्यावर सत्तेची कमान सोपवतील याची सुतराम कल्पना नव्हती. कारण त्यावेळी भाजपकडे 105 जागा होत्या. पण यावेळी भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी भाजप हाच पहिला दावेदार असणे स्वाभाविक होते. असो, शिंदे-फडणवीसांमधील पेल्यातील वादळ अखेर शमले ते महाराष्ट्रासाठी हिताचे आहे. आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात होत आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणांत हिंदवी स्वराज्यापासून अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख करत राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट केली. तसेच आता बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करणार असे सांगत त्यांनी विकासात्मक कार्याबाबतचा आपला अग्रक्रम स्पष्ट केला आहे. महायुती ही निवडणुकीपूर्वीची आघाडी असून विचारांवर आणि विकासाच्या मुद्यावर हे पक्ष एकत्र आलेले आहेत. त्यामुळे या सरकारच्या स्थैर्याला यत्किंचितही धोका नाही. अशा प्रकारचे स्थिर व भक्कम सरकार विकासाभिमुख कठोर निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचे ठरते. तरीही घटक पक्षांना सोबत घेऊन चालण्याची आणि कोणत्याही स्थितीत असंतोष निर्माण होणार नाही, याकडे महायुतीचे प्रमुख नेते म्हणून आणि सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. अर्थात पहिले आव्हान मिंंत्रमंडळातील खातेवाटपाचे आहे. ते समाधानपूर्वक मार्गी लावावे लागेल. त्यानंतर आर्थिक आव्हानांचा डोंगरही समोर आहे. फडणवीस हे अर्थशास्र, कायदे, प्रशासन, सुशासन यांसह विविध क्षेत्रांवर पकड असणारे नेते आहेत आणि त्यांनी गेल्या 15 वर्षांत ही बाब सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे नवे शासन राज्याला विकासाच्या नव्या क्षितिजाकडे घेऊन जाणारे ठरावे हीच अपेक्षा.
– विश्वास सरदेशमुख, ज्येष्ठ पत्रकार
Check Also
राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …